पिंपळपान…
आम्ही फ्रेन्ड्स मिळुन पावसात अनेकवर्षे झाडे लावतो.. एका टेकडीवर एक पिंपळाचं रोप लावलं होतं.. मधेच खुप पाऊस , मधेच खुप उन्ह यात त्या झाडाचं काय होइल असं आमचं फोनवर बोलणं व्हायचं.. दोन वेळा जाऊन पाहुन आलो.. त्याला दिमाखात वाऱ्यावर डोलताना पाहुन नक्कीच आनंद झाला.. आता गेलो तर त्याला नवीन पालवी फुटली त्यामुळे जीव भांड्यात पडला.. त्याने छान मुळं धरली आणि स्वतःची काळजी घ्यायला ते पायावर उभं आहे.. ते मोठं होइल .. अनेकांना सावली देइल..
जवळ जाऊन त्याच्यावरुन हात फिरवुन फोटो काढुन आलो आणि लक्ष गेलं ते आधीच्या पानाच्या जाळीकडे.. निसर्गाच्या किमयेची कमाल वाटली.. निरखुन पाहिलं तर सुंदरजाळी तयार होताना दिसली.. हात लावला तर ती जाळी खूपच हेल्दी आणि तरुण होती.. पानाचा वरचा लेअर म्हणजे त्याची त्वचा जाऊन आतील शिरा दिसत होत्या आणि त्यातुन प्रेम वहात होतं.. त्या शिरातुन प्रेम इकडे तिकडे पसरत होतं आणि नवीन पालवीला प्रेमाचं गुपीत सांगत होतं.. त्वचा गेली तर काय झालं त्याच्या शरीरात खेळणारं प्रेम नवीन पानाना जगण्याची प्रेरणा देत होतं.. कितीही उन्ह असो कितीही वारं येवो किवा कितीही संकट येवो आपण पाय रोवुन उभं रहायचय हे त्या छोट्या रोपट्याने आम्हाला शिकवलं..
त्याच्याकडून प्रेमाचा धडा घेउन आम्ही निघालो.. निघताना विचार केला , पुढच्या पावसात आपण असच एक वडाचं झाड लावु .. जे कोणी या झाडाखाली बसतील त्यांना भरपुर ऑक्सीजन मिळेल कारण भविष्यात याचीच वानवा असण्याची शक्यता आहे.. तुम्ही सुध्दा झाडं लावत असाल तर एकदा त्यांना भेटुन या.. त्याला पाणी घाला.. त्यांच्याशी बोलुन या.. त्यांच्याकडे प्रेमाने पहा.. कुठलीही अपेक्षा न करता प्रेम काय असतं हे यांच्याकडुन शिकावं.आपण लावलेल्या झाडाची सावली कोणाला तरी मिळणार याचा आनंद खूपच मोठा आहे.. मी माहेरी लहानपणी लावलेल्या झाडाचे आंबे आता खाते तेव्हा त्याचं समाधान खूपच वेगळं आहे याचा अनुभव गेली अनेक वर्षे मी घेतेय..
– सोनल गोडबोले..