मोती साबण..!
सत्तरच्या दशकात टॉमको अर्थात टाटा ऑइल मिल्सने मोती साबणाची निर्मिती केली. हा साबण अनेक अर्थाने वेगळा होता. चौकोनी वड्यांच्या आकारात येणाऱ्या साबणांच्या काळात मोती आकाराने मोठा आणि गोल होता. हा आकार त्याला जाणीवपूर्वक देण्यात आला होता. गुलाब, चंदन सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवाती पासून शाही थाट दाखवला. त्याची २५ रु किंमत त्या काळाच्या तुलनेत अधिक होती.
या साबणाने सतत स्वत:ला उच्च आवडी निवडीशी, दिव्यानुभवाशी आणि मोती या संकल्पनेशी जोडून ठेवलं. ऐंशीच्याा दशकातील मोतीच्या छापील जाहिरातीत समुद्रकिनारी भल्यामोठ्या शिंपल्यात विराजमान मोती साबण कित्येकांना आठवत असेल. एकूण हा साबण बऱ्यापैकी लोकप्रिय होता. मात्र १९९३ साली टॉमको कंपनी हिंदुस्थान लिव्हर कंपनीत समाविष्ट झाली आणि हिंदुस्थान लिव्हरने हा साबण विशिष्ट प्रसंगी वापरायलाच हवा अशा मंगल, उत्सवी, पवित्र संकल्पनेशी जोडला.
दिवाळी आणि मोती हे नातं नव्वदीत दृढ झालं. पण त्यापलीकडे या साबणावर मधल्या काळात फारसं लक्ष दिलं गेलं नाही. काहींनी तर आठवणीतील ब्रॅण्ड या सदरात त्याची भरती केली. अनेक विश्लेषकांनी हा ब्रॅण्ड अपयशी ठरल्याचा शिक्का मारला. २०१३ मध्ये जाहिरातीतून केलेला वापर ग्राहकांना भूतकाळातून वर्तमानात आणलं होतं आणि मोती साबण ही आपली जणू एक परंपरा आहे असं वातावरण तयार केलं गेलं.
याच काळात सोशल मीडिया प्रभावी झाला होता. वर्षभर गुडूप असलेला मोती साबण दिवाळीत मात्र सतत तेजीत आला. एखादं उत्पादन जाहिरातीमुळे पुन्हा कसं चर्चेत येऊ शकतं याचं मोती साबण हे उत्तम उदाहरण आहे. मोती साबणा शिवाय स्नान अपूर्ण वाटावे इतपत या ब्रॅण्डने दिवाळीशी घरोबा केला आहे.
* संकलन : मिलिंद पंडित,
कल्याण*
(संदर्भ : इंटरनेट)