अक्षर सुधारण्यासाठी कुणी कविता लिहीत नसतो
माती मागतेय पेनकिलर
देठापासून कांदा
मारतोय पीळ
पातही झालीय
करपून पिवळी
अन ह्युमिक शिवाय
आतली नाही वाढत
पांढरी मुळी
केमिकलचा पाजला
ओव्हरडोस
अशक्त झालंय
वाफ्याचं पोट
अटळ आहे गर्भपात
तुंबलीय मातीवर
बुरशीची साय
उचलायचा अंकुर
सोयाबीनचा
बाहुबलीच्या खांद्यावरील
पिंडीसारखा
फॉस्फरस सोडलं बुडाला
वेदनेचा झाला गर्भात जाळ
माती मागते पिनकिलर
कन्हू लागलाय
हिरवा माळ
■
संग्रहातील ही एक शीर्षककविता जरी आपण वानगीदाखल वाचली, तरीही या कवितेचा पोत आणि कवीची भूमिका आपल्या ध्यानात यावी.
सागर जाधव जोपुळकर यांची वेगळ्या अशा धाटणीची आणि त्यातील चिंतनगर्भ कवितांनी *माती मागते पेनकिलर* हा पहिला वहिला काव्यसंग्रह येथील कितीतरी महत्वाच्या प्रश्नांकडे आपलं लक्ष सहजपणे वेधून घेतो.
काव्यसंग्रहाचे, त्यातील कवितांची आणि त्यातील आयमांची शीर्षकं हा सुद्धा एक स्वतंत्र लेखाचा विषय व्हावा. इतकी विविधता आणि ताजेपणा त्यात दिसून येतो.
सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांचं कल्पक मुखपृष्ठ आणि कवीचित्रकार असलेले विष्णू थोरे यांच्या चित्रसंकल्पनेतुन धुळे येथील अथर्व पब्लिकेशन्सने हा बहुप्रतीक्षेत
असलेला काव्यसंग्रह सुंदर रुपात प्रकाशित केलेला आहे.
या संग्रहाला पाठराखण लाभलीय, ती कविवर्य पी. विठ्ठल यांची .सागर जाधव जोपुळकर यांच्यासारख्या एखाद्या आश्वासक कवीच्या पहिल्या-वहिल्या आणि स्वतःच्या भाषेत भाष्य करणाऱ्या काव्यसंग्रहाचा नेटका नि अचुक परिचय पी. विठ्ठल यांनी करून दिला आहे.एखादी नवीन कविताही किती सखोल आणि गांभिर्याने
अभ्यासावी ! याचा एक सुंदर वस्तुपाठ या पाठराखणमधून दिसून येतो. संग्रहाची व्यापकता तसेच प्रामाणिकता त्यातून अधोरेखित झाली आहे.
प्रथमतः या संग्रहाचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो.
कवी सागर जाधव जोपुळकर यांच्या या संग्रहाला आणि त्यांच्या आगामी काव्य लेखनाला मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
विषन्न करून सोडणाऱ्या या वास्तवात आपण जगतो आहोत आणि कवीला पडलेले महत्वाचे प्रश्न ! हे या कवितेचे सूत्र आहे. खत आणि कीटकनाशकांच्या विक्रीच्या व्यवसायाच्या माध्यमातून कवी शेतकऱ्यांच्या एकूणच जगण्याशी,त्यांच्या विविध प्रश्नांशी अतिशय जवळून परिचित आहे.’ कवी बोलतो बळीराजाच्या मुखातून… ‘ असे काही या संग्रहातील कवितांबाबत म्हणता येईल.
जमिनीत उगवुन येणारा प्रत्येक कोंब धास्तावलेला आहे. त्याला लागणारी बुरशी किंवा त्याच्यावर पडणारे जुने-नवे रोग हे कसे कमी करता येईल. हे कोंब जिवंत,शाबूत कसे राहतील ! या विचारात एक महत्त्वाचा प्रश्न येथे विचारला जातो. तो प्रश्न काळजाला घरं पाडणारा आहे.
मातीच नाही जनली
तर खायचं काय ?
धतुऱ्या
आणखी सिमेंटचा दगड या कवितेत ते लिहितात
आता मला प्रश्न पडलाय
न पेरताच कसा आलाय
उगवून हा
सिमेंटचा दगड
बेभरवशाच्या या परिस्थितीत शेतकरी आणि सामान्य माणसाने येथे ऑरगॅनिक जगण्याचा अट्टहास तरी कसा करावा! येथील मुरमाड मातीत तगुन राहणं अवघड झालेले असतानाही वावरं बारोमास वहीती ठेवण्याच्या स्वप्नापर्यंत कवी वाचकाला घेऊन जातो.आणि हे या कवितेचं मुख्य प्रयोजन किंवा यश आहे ! असं म्हणता येईल.
जगणही सुटत नाही. प्रश्न वाढत वाढत जातात. कधी काळची हिरवीगार शेती आता बदललेल्या परिस्थितीमुळे एन. ए. करून प्लॉट पाडून विकली जातेय. शेतीतले बेसुमार कष्ट तेथील बेभरवशाचं वास्तव ,त्या वेदना एकदाच्या संपवून कर्जात मरण्यापेक्षा प्लॉट पडलेल्या एखाद्या नगराला आपलं नाव लावणाऱ्या शेतकऱ्याबद्दलची एक भयंकर चीड आणणारी *अँमुनिटी नगरामध्ये* शिर्षकाची एक कविता या संग्रहात आहे.
ती कमालीच्या
परिणामकारतेने व्यक्त झालेली आहे.कवीने मांडलेलं हे कटू वास्तव दुर्दैवाने कुणीही अमान्य करणार नाही.
कवीने उत्तम असं साहित्य वाचलेलं आहे. डॉ. भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, आसाराम लोमटे,राजन गवस,ऐश्वर्य पाटेकर आदींच्या साहित्याचाही प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो.
आपली वेदना कळकळीने वेशीवर टांगताना कवीची भूमिका रोखठोक किंवा अधिकची टोकदार होताना दिसते. त्यामुळे झ झबल्याचा आता कुठे ?
गुरुजी आता सगळंच बदललंय. वाईट पद्धतीने
बदललंय ! हे सांगताना कवीची हतबलतेपेक्षा प्रामाणिकता येथे जाणवते. कवीला वाटणारी खंत वेदनेत परावर्तित होते.
पुढे कवी अशाच काही मनातल्या प्रश्नांना दणकटपणे वाचा फोडताना दिसतो. यात वयात येणाऱ्या अल्लड मुली अचानक गायब होतात. राजकीय पक्ष आपल्या भूमिका बदलताय. कार्यकर्त्यांचं गोंधळलेपण, वाढती बेरोजगारी, मुलांची होणारी फरपट ,भाऊबंदकी, खेड्यांचं होणारं शहरीकरण इतकं कमी आहे की काय म्हणून गावागावातून माणुसकी हद्दपार होते आहे. समाज माध्यमांचं आक्रमण. सत्ता, सबसिडी, उन्हाळझळा या सर्वांचा परिणामस्वरूप माणसं कोरडीठाक आणि आळशी झालेली आहेत.असं कवीचं निरीक्षण आहे.ते सर्व या संग्रहात वाचायला मिळते.
अस्सल शेतीमातीचा आणि आपल्या थोर संस्कृतीचा होत असलेला दगड आणि त्या अनुषंगाने कवीची होणारी उलघाल किंवा काळजी ही कविता अधोरेखित करते .पाच आयामांमध्ये व्यक्त झालेली ही कविता हा केवळ फ्लॅशबॅक नाही. ते एक जाणिवांचं सखोल असं कनेक्शन आहे .या कविता वाचून कोणाही संवेदनशील माणसाच्या मनावर ओरखडला उमटल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी कधी स्वतःला, कधी विठ्ठलाला, कधी व्यवस्थेला काही बिनतोड प्रश्न कवी बेधडकपणे विचारतो. या प्रश्नांचा चक्रव्यूह भेदणं तसं अवघड असलं, तरी अशक्य नाही.
याच कवितेतून पवित्र मातीच्या, शेणाच्या, हिरव्या धनाच्या निरांजनी प्रज्वलित करण्याची आस कवीला लागून राहिली आहे.
या संग्रहातील भाषा आजच्या तरुणाईची बोलीभाषा आहे. त्यामुळे या कवितेतील भाषा कुठे ती भेदक,कुठे कटू,कधी थेट अंगावर येणारी वाटू शकेल. महानगरीय किंवा विद्रोही कवितेत अशा प्रकारची भाषा आपण वाचलेली आहे. परंतु ग्रामीण कवितेमध्ये कवीने अशा पद्धतीचा एक रास्त आणि खडा उद्गार येथे व्यक्त केलेला आहे.आणि तो गरजेचाच होता.असे म्हणता येईल.
आजच्या वर्तमानातील येत असलेल्या कितीतरी जीवघेण्या, वाईट,दुःखद अनुभवांना ही कविता अधोरेखित करते. ठळकपणे सांगायचं तर या कवितेला दुःखाचे, वेदनेचे पदर आहेत .
तरीही ही कविता पराभूत मानसिकतेची नाही .या संग्रहातील जीत सत्याचीच या कवितेत
कवी असे म्हणतो
कशाला उगीच
खेळू डावपेच
जीत सत्याचीच
होईल रे
किंवा
माहेरची पोर या कवितेचा शेवट बघा
हळू हळू काटे
बोचती उराला
साबर बोंडाला
गोड चव
असा आशावाद ही कविता नकळतपणे पेरत अपेक्षित परिणाम साधते.’रडायचं नाही, लढायचं !’ ही कवीची मुख्य भूमिका आहे. हे ठळकपणे जाणवतं.
वास्तविक या संग्रहातील बहुतांश
कविता म्हणजे व्यथा वेदनांची शब्दचित्रेच आहेत. ती वाचकांना आतून हलवतात.अस्वस्थ करतात.
आमच्या भुकांचा
सी डी रेशो
त्याच्या डोक्यात
फिट्ट असतो
म्हणून तर
ताळेबंद आयुष्याचा
नीट जुळतो
अशी एक वेगळ्या धाटणीची आणि अस्वस्थ मनाला एक विचारप्रवृत्त करणारी ही कविता मला महत्त्वाची वाटते. वर्तमानाशी लढण्यासाठी ती भागच पाडते.
या कवितेमध्ये स्वतःचं अस्तित्व शोधू पाहणाऱ्या युवकांना ,शेतीत कष्टणाऱ्या बळीराजाला,परिस्थितीने वैतागलेल्या समाजमनांना अनुषंगुन ही कविता जे प्रश्न विचारते. ते जगण्याचे ,अस्तित्वाचे मूलभूत प्रश्न आहेत. ते वाचताना माणूस आतून हलतो.वेदनेतूनच क्रांती घडते. माणूस विचारशील होतो. म्हणून त्यातून काही चांगलं घडेल ! अशी उमेद कळत-नकळतपणे ही कविता देते.
या वेगळ्या अनुभवांच्या कवितांचं सर्वदूर स्वागत होईल !असा विश्वास वाटतो. आशा करूयात की “माती मागते पेनकिलर” हा ,
कवी सागर जाधव जोपुळकर यांचा नवाकोरा संग्रह वाचून आपल्या आजूबाजूचा भवताल अधिक हिरवागार आणि माणुसकीने ओथंबलेला झालेला असेल !
■ *शीर्षक* 🙁 कालकथीत कवी *अरुण काळे* यांच्या कवितेचं शीर्षक)
अक्षर सुधारण्यासाठी कुणी कविता लिहीत नसतो
विवेक उगलमुगले
नाशिक
9422946106