तमाशा
मस्तावलेल्या नजरांना
नजर भिडते अंधारात.
मोगऱ्याचं चांदणं माळते मी
वेणीच्या अंबरात.
शाहीराची ती लावणी
बेधुंद ओठातुनी
कत्तल करते काळजाची
पेंगत पेंगत धांदल उडते
झाडावरच्या पाखरांची….
कधी मी राधा कृष्णाची
कधी मी मुरळी वाघ्याची
गवळणीतली मावशी होते
अन गम्मंत करते नाच्याची
मध्यानीचा चंद्र आत्ता
दूरवर भाकरीसारखा दिसत असतो…
ओल्याचिंब चोळीत माझ्या
खट्याळ वारा झोंबत असतो…
ढोलकी होते मग मुकी
घुंगरंही होतात पोरकी
हळूहळू उतरतात मग
पायामंधूनी चाळ
धावत धावत कुशीत येतं माझं भुकेललं बाळ…
उजडायच्या आत जाते ओढ्याकाठी
त्या पाणवठ्याला भेटण्यासाठी
चंद्राला पाहून वाटे लाज
मग हळूच जाते दाट
पांडुरंग मग येतो ओठी
मी हळूच सोडते चोळीच्या गाठी
अन् उतरते पाण्यात
स्वतंत्र होऊन खेळण्यासाठी……
दगडाची एक चिप घेऊन
मी खरडत बसते अंग
चिकटलेल्या नजरा काढते मी
ज्यांनी रात्रभर केला विनयभंग.
घासून घासून अंग
दगड लालभडक होतो
बोलणाऱ्या गजऱ्याचा मोगरा मुका होतो
अन् पांढरंशुभ्र चांदणं वाहवत
जातं दूरदेशी….
आत्ता सूर्य उगवतो तेव्हा
या दुनियेची बाई कमाल असते
रात्री दुनिया माझी हमाल होती
दिवसा मी छिनाल असते..
दिवस छिनालपण मिरवून संपतो
सूर्य मावळतो
अंधार होतो
नवं गाव
नवं नाव
बोलते ढोलकी
घुंगरं बेरकी
पुन्हा माळते चांदणं
नववारीचं नांदणं
मस्तीच्या नजरा
झेलू लागतो गजरा
घरात झुरतात उशा
फडात पिळतात मिशा
अन्….
सुरु होतो माझा
तमाशा…तमाशा …तमाशा
– दंगलकार नितीन चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ
जि.सांगली
7020909521