Osteoarthritis : संधिवात
बदललेली जीवनशैली यामुळे आजकाल संधिवाताचा त्रास हा अनेकजणांना आहे. संधिवातमध्ये सांध्यांच्या ठिकाणी सूज व अतिशय वेदना होत असते. त्यामुळेच या त्रासाला सांधेदुखी असेही म्हणतात. सांधेदुखी कशामुळे होते, त्याची लक्षणे आणि संधिवात वरील उपचार याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी या लेखात सांगितली आहे.
दोन हाडे एकत्र येऊन सांधे किंवा joints बनत असते. सांध्यांची हालचाल होताना तेथे असलेली दोन हाडे एकमेकांना घासू नयेत यासाठी तेथे कार्टीलेज नावाचा घटक असतो. या कार्टीलेजमुळे हाडे एकमेकांना न घासता सहजरीत्या सांध्याची हालचाल होत असते. मात्र जेंव्हा काही कारणांनी सांध्यातील कार्टीलेजची झीज होते तेंव्हा दोन्ही हाडे एकमेकांना घासू लागतात. अशावेळी तेथे सूज येणे, वेदना होणे, सांध्याची हालचाल योग्यरीत्या न होणे असे त्रास होऊ लागतात. या त्रासाला संधिवात असे म्हणतात.
तसे पाहिले तर, संधिवात हा उतारवयात होणारा आजार आहे. कारण या काळात शरीराची तसेच सांध्यातील कार्टीलेजची सुद्धा झीज झालेली असते. त्यामुळे वयाच्या 50 शी नंतर सांधेदुखी होणे ही सामान्य बाब आहे. मात्र आजच्या बैठ्या जीवनशैली व व्यायामाच्या अभावामुळे अगदी तरुण वयातसुद्धा सांधेदुखीचा त्रास अनेकजणांना होत आहे.
*संधीवात होण्याची कारणे :
अनेक कारणांमुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. संधीवाताची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
*(१)* उतारवयामुळे सांध्यातील कार्टीलेजची झीज झाल्याने संधीवात होऊ शकतो.
*(२)* वजन जास्त वाढल्याने संधिवात होऊ शकतो. कारण वजनाचा जास्त भार हा गुडघे किंवा खुब्याच्या सांध्यावर पडल्यामुळे तेथे सांधेदुखी होऊ लागते.
*(३)* बैठे काम व व्यायामाचा अभाव,
*(४)* फ्रॅक्चर झाल्याने किंवा सांध्याच्या ठिकाणी दुखापत झाल्याने.
*(५)* Joint dislocation मुळे ही स्थिती होऊ शकते. यामध्ये सांधे हे त्यांच्या मुळ ठिकाणापासुन निसटतात.
*(६)* शरीरातील हार्मोनल बदल, रजोनिवृत्ती यांमुळे कॅल्शियमची कमतरता होत असल्याने पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ओस्टियोआर्थराईटिस होण्याची जास्त शक्यता असते.
*(७)* कुटुंबातील व्यक्तींना संधिवात असल्यास अनुवंशिकतेमुळेही संधिवात होण्याचा धोका अधिक असतो.
* संधिवाताची लक्षणे Symptoms of Arthritis in Marathi :
संधिवाताच्या प्रकारानुसार आणि रोगाच्या स्वरुपानुसार लक्षणे असू शकतात. संधिवातात प्रामुख्याने खालील लक्षणे जाणवतात.
◆सांधे दुखू लागतात,
◆सांध्यांवर सूज येते,
◆सांध्यांच्या ठिकाणी स्पर्श केल्यास वेदना अधिक जाणवते,
◆सांध्यांची हालचाल योग्य प्रकारे होत नाही,
◆सांधे जखडणे,
◆सांध्यातील कार्टीलेजची झीज झाल्यामुळे हाडे एकमेकांवर घासल्यामुळे त्यातून कट-कट असा आवाज येणे,
◆सांध्यात पाणी होणे,
◆अधिक दिवस संधिवाताचा त्रास असल्यास सांधे वेडीवाकडी होऊ शकतात.
यासारखी लक्षणे संधिवातामध्ये प्रामुख्याने असतात.
*संधीवाताचे प्रकार Types of Arthritis In Marathi :
संधीवाताचे 200 पेक्षा अधिक वेगवेगळे प्रकार असतात. त्यातील काही प्रमुख प्रकारांची नावे खाली दिलेली आहेत.
१) Inflammatory अर्थराइटिस (सांधेसुज)
२) रूमेटॉयड अर्थराइटिस (आमवात)
३) गाऊट अर्थराइटिस (वातरक्त)
४) सोरायसिसमुळे होणारी Psoriatic arthritis
५) इन्फेक्शनमुळे होणारी रिएक्टिव अर्थराइटिस
६) स्पोंडिलायटिस
* सांधेदुखीचे निदान असे केले जाते :
पेशंट हिस्ट्री, असलेली लक्षणे आणि शारीरीक तपासणीद्वारे आपले डॉक्टर संधिवाताच्या त्रासाचे निदान करू शकतात. याशिवाय निदान अधिक स्पष्ट होण्यासाठी खालिल वैद्यकीय चाचण्याही करायला सांगतील.
◆सांध्यांचा एक्स-रे किंवा MRI Scan, रक्त तपासणीमध्ये CBC चाचणी केली जाते तसेच रक्तातील युरिक एसिडचे प्रमाण तपासले जाते. सांधेदुखीवर वेळीच योग्य न केल्यास हा त्रास पुढे वाढतच जातो. यासाठी संधिवाताच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते.
◆सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी आयुर्वेदात Maharasnadi Kadha, योगराज गुग्गुळ, महानारायण तेल, निर्गुंडी तेल, Ajmodai churna अशी अनेक प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. या आयुर्वेदिक औषध उपचारामुळे संधीवाताची समस्या कायमस्वरूपी दूर होण्यासाठी मदत होते. त्यामुळे या त्रासावरील उपचारासाठी आपल्या जवळच्या आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.
◆घरगुती उपाय करूनही अनेकदा संधीवात आजार कमी होत नाही. कारण सांधेदुखी हा एक अतिशय त्रासदायक असा आजार आहे. त्यामुळे त्याची लक्षणे जाणवू लागल्यास त्यावर वेळीच योग्य उपचार करून घ्यावे लागतात.
– डॉ.सतीश उपळकर
संकलन : प्रविण सरवदे,
कराड