एकच साहेब बाबासाहेब
३१ जुलै १९५६ ची सायंकाळ. नानकचंद टपाल घेऊन बाबसाहेबांकडे आलेले. बाबासाहेब ओसरीत बसून स्टूलवरच्या उशीवर पाय ठेवून नानकचंद यांना डिक्टेशन देत होते. मधातच त्यांनी डोळे, डोके खुर्चीच्या पाठीवर टेकवले आणि त्यांना झोप लागली. थोड्या वेळाने त्यांना पुन्हा जाग आली. रत्तु यांनी वाचून दाखविलेल्या पत्रांची उत्तरे त्यांनी भराभर डिक्टेट केली. नंतर नानकचंद यांच्या खांद्यावर हात ठेवून ते झोपायच्या खोलीत गेले आणि अंथरुणावर त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या दुसऱ्या हातातील पुस्तक गळून पडले. काही वेळ ते काहीच बोलले नाही. नानकचंद घाबरले. त्यांनी डोक्याला, पायांना मसाज केले. त्यामुळे बाबासाहेब थोडे शांत वाटत होते.
गेल्या काही दिवसांपासून हे घडत होतं. शेवटी मोठया धाडसाने नानकचंद यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला, “सर, अलीकडे आपण एवढे दुःखी आणि खिन्न का दिसता ? अधूनमधून डोळ्यातून पाणी का गाळता ? मला क्षमा करा पण मला आज या प्रश्नाचे उत्तर द्याच.” काही क्षण शांततेत गेले. थोड्या वेळाने ते काहीसे उत्तेजित व सैरभैर झालेले दिसले. त्यांचा गळा भावनेने भरुन आला. मस्तकाच्या किंचित वर हाताचा तळवा ठेवून त्यांनी मौन सोडले. बाबासाहेब बोलायला लागले.
“मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाने दुःख होत आहे हे तुम्हा लोकांना माहीत नाही. माझी पहिली खंत ही आहे की मी माझे जीवनकार्य पूर्ण करु शकलेलो नाही. माझे लोक इतर समाजाच्या बरोबरीने राजकीय सत्तेचे वाटेकरी होऊन सत्ताधारी वर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती. मी आता जवळपास अपंग झालो असून आजारपणामुळे आडवा पडलेलो आहे. मी जे काही मिळविले त्याचा फायदा मुठभर सुशिक्षितांनी घेतला आहे. त्यांचे हे विश्वासघातकी वागणे आणि दलित, शोषित यांच्याबद्दलची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागेल. हे लोकं स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी जगत आहेत. या सुशिक्षितांपैकी एकही सामाजिक कार्य करायला तयार नसतो. मला माझे लक्ष खेड्यातील हजारो-लाखो निरक्षर लोकांकडे वळवायचे होते. ते अजूनही हालअपेष्टा भोगत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती मुळीच बदलली नाही. पण आता आयुष्य फार थोडे शिल्लक राहिले आहे.
मला असेही वाटत होते की माझी सगळी पुस्तके माझ्या हयातीतच प्रकाशित व्हावी. बुध्द अँड कार्ल मार्क्स, रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन इन एनशियंट इंडिया, रिडल्स ऑफ हिंदुइझम ही माझी यादगार पुस्तके प्रकाशित करण्यात मी असमर्थ आणि असहाय ठरत आहे ही कल्पना सुद्धा मला भयंकर क्लेश व दुःख देते. कारण मी मेल्यावर ही पुस्तके दुसरे कोणीच प्रकाशित करु शकणार नाही.
कोणीतरी पददलित वर्गामधून माझ्या हयातीतच पुढे येईल आणि माझ्या पश्चात ही चळवळ चालवण्याची अवघड जबाबदारी पत्करील अशीही माझी अपेक्षा होती. पण हे आव्हान पेलू शकेल असा कोणीच माझ्या डोळ्यापुढे येत नाही. माझ्या ज्या सहकाऱ्याबद्दल ते ही चळवळ चालवतील असा मला विश्वास होता ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी भांडत आहे. हा देश आणि येथील लोक यांची मला आणखी काही काळ सेवा करण्याची संधीही मला हवी होती. ज्या देशातील लोक एवढे जातीग्रस्त आणि पूर्वग्रहदूषित आहेत तेथे जन्माला येणे हे पातक आहे. विद्यमान चौकटीत या देशाच्या कारभारात आपला रस टिकवून ठेवणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे कारण प्रधानमंत्र्याच्या मताशी न जुळणारे दुसरे कोणतेच मत ऐकूनही घेण्याची येथील लोकांची तयारी नाही. किती गाळात चाललाय हा देश !
बाबासाहेबांच्या गालावरून अश्रू ओघळत होते. डबडबल्या डोळ्यांनी त्यांनी नानकचंद यांच्याकडे पाहिले. नानकचंद यांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्यांनी भक्तिभावाने हात जोडले व बाबासाहेबांचे पाय धरले. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर वेदना होती. थोडे थांबून डोळ्यातील आसवे पुसून बाबासाहेब बोलू लागले, नानकचंद, तू माझ्या लोकांना सांग की मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते मी एकट्याच्या बळावर मिळवले आहे. ते करतांना पिळवटून टाकणाऱ्या संकटांचा आणि अनंत अडचणीचा मुकाबला मला करावा लागला. सगळीकडून विशेषतः हिंदू वृत्तपत्रसृष्टीकडून माझ्यावर शिव्याशापांचा वर्षाव सतत होत राहिला.! जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला, माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले, त्यांच्याशीही मी दोन हात केले.
मी माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत या देशाची आणि पददलितांची सेवा करीतच राहीन. हा काफ़िला आज जेथे दिसतो तेथे त्याला आणता आणता मला खूप कष्ट घ्यावे लागले.हा काफ़िला असाच त्यांनी पुढे नेला पाहिजे. वाटेत अनेक अडथळे येतील, अडचणी येतील, अकल्पित संकटे कोसळतील, पण वाटचाल सुरुच ठेवावी. त्यांना जर सन्मानाने प्रतिष्ठापूर्ण जीवन जगायचे असेल तर हे आव्हान त्यांनी पेलायलाच पाहिजे. जर माझे लोक, माझे सहकारी हा काफ़िला पुढे नेण्यास असमर्थ असतील तर किमान तो आज जेथे आहे तेथे तरी ठेवावा. पण कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या काफ़िल्यास परत फिरू देऊ नये. हा माझा संदेश आहे. बहुधा शेवटचा संदेश आहे. मी तो अत्यंत गंभीरपणे देत आहे आणि या गांभीर्याला नजरेआड केले जाणार नाही अशी मला खात्री वाटते. जा आणि सांग त्यांना…. जा आणि सांग त्यांना…. जा आणि सांग त्यांना.
असं तीनदा त्यांनी पुनरुच्चार केला. बोलून होताच बाबासाहेबांना हुंदके फुटले. अश्रू डोळ्यातून घळाघळा वाहू लागले. चेहऱ्यावर असह्य वेदना आणि तीक्ष्ण यातना स्पष्ट दिसत होती. बाबासाहेबांचा हा अखेरचा संदेश ठरेल याची थोडी देखील कल्पना नानकचंद यांना तरी कुठे होती ?
प्राचार्य वसंत वावरे