“अरे सुखांनो थांबा थोडे दु:खाशी मी करार केले.”
कवी संतोष आळंजकर हे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शहापूर या छोट्याश्या गावात राहणारे शेतकरी कुटुंबातील कवी. लहानपणापासून शेतात कष्ट करायचे एवढेच त्यांना ठाऊक. यांचा काही दिवसांपूर्वी “मातीत हरवल्या कविता” हा कवितासंग्रह वाचनात आला. कवीने आपल्या शब्दांची नाळ मातीशी जोडलेली आहे. शेतकऱ्यांच्या वेदना, हालअपेष्टा त्यांनी अनुभवल्या आहेत. त्यांच्या या संग्रहातील सर्वच कविता दर्जेदार आहेत त्यापैकी या कवितासंग्रहातील “करार” ही कविता खूप आवडली.
कवी संतोष आळंजकर, गंगापूर यांच्या “मातीत हरवल्या कविता” या संग्रहातील एका कवितेचं केलेलं रसग्रहण
करार
दु:खे सारे चालत आले वादे कसमे हजार केले.
अरे सुखांनो थांबा थोडे दु:खाशी मी करार केले.
उजेडवाटा जरी न माझ्या भीती न मजला काळोखाची
हृदयामध्ये तेवत आहे त्या पणतीशी करार केले.
येईल वादळ तरी येऊ द्या झडेल पाने तरी झडू द्या
वसंत येता पुन्हा पुन्हा मी बहरण्याचे करार केले.
भूक पेरली पिढ्यांपिढ्यांची मातीमध्ये दबून गेली
पोटामध्ये जाळत आलो त्या सूर्याशी करार केले.
हरलो असेल त्याचे गाणे कधी जिंकलो त्याचे गाणे
एकसुराने गायिल दोन्ही त्या शब्दांशी करार केले.
येणे जाणे चुकले कोणा मातीचे ते माती झाले.
लळा लावून रुजेन पुन्हा मातीशी मी करार केले.
रसग्रहण
माणसाचं आयुष्य हे अनंत दु:खाने भरलेले आहे. जन्म आणि मृत्यू यांच्या मध्ये जे जीवन आहे ते जगत असताना मनुष्याला अनंत यातना सहन कराव्या लागतात. जगी सर्व सुखी असा कोणी सजीव प्राणीमात्रात सापडणार नाही. आणि ह्या यातना एकाएकी येत नाहीत त्या संक्रमण करीत आलेल्या असतात. कवी संतोष यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झालेला आहे. शेतकऱ्याचे दु:ख त्यांनी अनुभवले आहे. त्यांच्या व्यथा, वेदना, भोगलेल्या आहेत. त्याचं ते जगणं संतोष यांच्याही वाट्याला आले. यांच्या आयुष्यातही अनेक संकटे आली, लहानपणापासून वाट्याला आलेले कष्ट त्यांना सुखाशी भेट घेऊ देत नाही. त्यांच्याही जीवनात हे दु:ख परंपरेने चालत आले आहे. आणि या दु:खाचा सामना करण्यासाठी ते अतिशय नम्र होतात. जो पर्यंत दु:खाशी सामना सुरु आहे तोपर्यंत ते सुखाला स्वीकारायला तयार नाही. ते सुखाला सहज सांगतात कि, जो पर्यंत माझे कष्ट संपत नाही तोवर मी प्रयत्न करत राहणार आणि तोपर्यंत मी सुख मिळाले हे मानणार नाही. कारण या जीवनातल्या दु:खांशी आयुष्यभराचे करार केलेले आहेत. ते पूर्ण करू द्या हे दु:ख न संपणारे आहेत. म्हणून कवी संतोष म्हणतात की,
दु:खे सारे चालत आले वादे कसमे हजार केले.
अरे सुखांनो थांबा थोडे दु:खाशी मी करार केले.
कवी संतोष प्रगतीच्या वाटेवर चालत आहेत मात्र सुख मिळेलच याची खात्री त्यांना खात्री नाही. म्हणून ते म्हणतात की, मी ज्या वाटेने चालले आहे त्या वाटा मला प्रकाशाकडे घेऊन जातीलच असेही नाही, या वाटा जरी माझ्या नसल्या तरी मी या वाटेवर अविरत चालत राहणार. या उजेडवाटा मला अनोळखी आहेत तरीही या वाटेवर कितीही कष्ट असू द्या, कितीही दु:ख असू द्या मला त्यांची भीती वाटत नाही. मी त्यावर मात करून तोवर चालत राहणार. जो पर्यंत माझ्या हृदयात आशेची पणती तेवत आहे, जो पर्यंत माझ्या हृदयात प्रयत्नाची पणती तेवत आहे तो पर्यंत मी या दु:खाशी लढत राहणार कारण त्या पणतीशी मी आयुष्यभराचे करार केले आहेत. म्हणून कवी म्हणतात की.
उजेडवाटा जरी न माझ्या भीती न मजला काळोखाची
हृदयामध्ये तेवत आहे त्या पणतीशी करार केले.
आयुष्यात कितीही संकटे येवू द्या, कितीही जीवनाची पडझड झाली ती होऊ द्या, ज्या प्रमाणे चैत्रात झाडांची पाने गळून नवीन पालवी फुटते तसे मी पुन्हा पुन्हा नव्या उमेदीने, नव्या ताकदीने उभा राहील, वसंत ऋतूत झाडांना जसा बहर येतो तसा माझ्या जीवनात बहर आणीन. मी नाउमेद होणार नाही . पुन्हा पुन्हा या संकटांशी सामना करील आणि पुन्हा बहरून येण्यासाठी मी कटिबद्ध आहे. दरवर्षी मी या कष्टातून मार्ग काढत राहील आणि पुन्हा नव्या दमाने बहरून येईल. म्हणून कवी म्हणतात की,
येईल वादळ तरी येऊ द्या झडेल पाने तरी झडू द्या
वसंत येता पुन्हा पुन्हा मी बहरण्याचे करार केले.
टीचभर पोटासाठी शेतकरी काबाडकष्ट करीत असतो. पोटाची भूक भागविण्यासाठी अहोरात्र कष्ट करीत असतो शेतात घाम गाळून मोती पिकवत असतो मात्र निसर्गाचा समतोल बिघडला आणि हे सारे कष्ट मातीत जिरून गेले. शेतकऱ्याच्या पिढ्यापिढ्यांचे कष्ट असेच मातीत दबून चालले आहे पण पीकपाणी व्यवस्थित येत नाही. पोटाची भूक भागविण्यासाठी शेतात राब राब राबायचं आणि मोबदला काहीच नाही अशी शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे. ही पोटाच्या भुकेची आग आहे ती सूर्याच्या आगीपेक्षा दाहक आहे. या दाहक आगीशी सामना करण्यासाठीचा करार केला आहे. म्हणून कवी म्हणतात की,
भूक पेरली पिढ्यांपिढ्यांची मातीमध्ये दबून गेली
पोटामध्ये जाळत आलो त्या सूर्याशी करार केले.
शेतकरी प्रत्येक वेळी जिंकतोच असे नाही. पण ज्यावेळी त्याच्या हातात समाधानकारक पिक येते तेव्हा आंनद गाणे गात असतो पण ज्या वेळी त्याच्या हातात काहीच येत नाही त्यावेळी त्याचे गाणे बेसूर होऊन जाते. अशा दोन्ही परिस्थितीत तो वावरत असतो. कधी कधी शेतकरी हवालदिल होतो. हतबल होतो, नाउमेद होतो त्या परिस्थितीला सावरण्यासाठी तो मनाची समजूत घालत असतो. म्हणून कवी संतोष अशा व्दिधा मनस्थितीत म्हणतात की,
हरलो असेल त्याचे गाणे कधी जिंकलो त्याचे गाणे
एकसुराने गायिल दोन्ही त्या शब्दांशी करार केले
प्रत्येक सजीवाला जन्म आणि मृत्यू अटल आहे. जन्माला येणे , जीवन जगणे आणि मृत्यूला हसत हसत सामोरे जाणे हे कुणालाच टळले नाही. माझं माझं म्हणणारे एक दिवस जाणारच असतात. ज्या मातीत आपण जन्मलो त्याच मातीत आपण मिसळणार आहोत. आपल्या देहाची मातीच होणार आहे मात्र या मातीतुनही पुन्हा एखादं बीज रुजावं आणि त्यानं पुन्हा जन्म घ्यावा. कवी संतोष हे आशावादी , ध्येयवादी आहेत. त्यांच्याजवळ चिकाटी आहे, कष्ट करण्याची जिद्द आहे. या मातीत मिसळल्यानंतर त्या मातीशी लळा लावून पुन्हा उगवून या मातीचे ऋण फेडण्यासाठी कटिबध आहे. म्हणून कवी म्हणतात की,
येणे जाणे चुकले कोणा मातीचे ते माती झाले.
लळा लावून रुजेन पुन्हा मातीशी मी करार केले.
कविने केलेले करार कष्टाशी , या मातीशी , शेतक-यांशी , त्यांच्या वेदनेशी नाळ जोडणारे आहेत.
प्रशांत वाघ
संपर्क- ७७७३९२५०००