निरीक्षण ,परीक्षण आणि आस्वाद
(आस्वाद क्र.४६)
” जग सुंदर आहे,माणूस सुंदर आहे,त्यापेक्षा माणुसकी अधिक सुंदर अशी शिकवणार देणारा ‘मनाचे किनारे ‘ हा कविता संग्रह होय” रोहिदास पोटे.गझलकार.वाय.के हे साहित्यक्षेत्रातील दर्जेदार, कसलेले,अनुभवी, आणि अभ्यासू अशा सर्व अंगानी परिपक्व असे नाव तेही सन्मानाने घेतले जाते.कवितेचा वारसा हा घरातूनच मिळाला आहे.
भीमा नदी परिसरातील वातावरण,निसर्ग सौंदर्य, बारमाही हिरवेगार व नवचैतन्य निर्माण करणारे वातावरण,पारगावच्या ठिकाणी दुकानात मिळणारा अनुभव,विविध साहित्याचा सतत केलेला अभ्यास,साहित्य संमेलनातील त्याचा वावर,नवीन शिकण्याची त्यांची प्रवृत्ती, स्वभावात मनमिळाऊपणा,माणसे जोडण्याची त्यांची विशिष्ट लकब,प्रेमळपणा, नविन स्विकारण्याची वृत्ती,अफाट वाचन,शिवाय घरातील वातावरण या सर्वांच्या अनुभवाच्या मुशीतून सलाखूण निघाले असल्याने त्यांच्या लेखणीने मनाचे किनारे अस्सल अनुभवतीने परिपक्व झाली आहेत म्हणून वाय. के हे नाव साहित्यक्षेत्रातील मानाने,सन्मानाने घेतले जाणारे नाव आहे .शिवाय कवितेतला वेगळेपणा त्याची वेगळी छाप पाडून जाते.त्यांची कविता,गझल वेगळे अनुभव घेऊनच विराजमान होतात.
कवी मनाचे विविध रंग, भीमा नदीचा हिरवळ,गारवा,प्रवाहाचा खळखळाटपणा,मानवी मनाचा उदारपणा,नाद,लय,रंग,ओलावा,बंधुभाव या भावना प्रत्येक कवितेतून जाणवतोच,माणुसकीवरील कविता,कष्टकरी, शेतकरी,कामकरी,सर्वसामान्य मजूर, खेड्यातील निसर्ग तसेच साधी सोपी भाषा सर्वसामान्य वाचकांना समजणारी ,मानवतेची शिकवण देणारी त्यांची कविता साधेपणातून ‘मनाचे किनारे,अनेक विषय घेऊन येताना विषयातील नाविन्य ते सिध्द करतात.
९८ कवितेचा ऐवज घेऊन ते काव्याचे विविध विषय,कवितेच्या विषयी वाय. के म्हणतात,”कवितेबरोबर अभंग, गझल,हायकू,प्रेमगीत,जात्यावरील ओवी,गाणी,अंगाई गीत,बाळगीत,निसर्ग कविता,शामलाक्षरी रचना, लावणी, अष्टाक्षरी, पंचाक्षरी,शेती मातीच्या कविता, देशप्रेम गीत तसेच भारतीय संस्कृतीचे दर्शन विविध सणावाराच्या कवितेतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.समाज प्रबोधनही केलेले आहे अशी चौफेर टोलेबाजी करत मनाचे किनारे हा रसभरीत काव्यसंग्रह बहरलेला आहे. हे काव्यसंग्रह वाचतांना लक्षात येतेच. पहिलीच कविता रमजान महिन्यातील पावित्र्य सांगून जाते.पाच वेळची नमाज,तराविह,रोजा,सदका,पवित्र कुरानचे वाचन, हज यांचा महिमा अप्रतिम शब्दात मांडतांना म्हणतात,(पा.क्र.१)
अन्न, पाण्याची किमंत तुम्हा कळू दे
पंचेद्रियांना तुमच्या रे सन्मार्गी वळू दे.
शांतीचा आदेश जगाला जुळू दे
‘कुरआन’ संदेश मानवा कळू दे.
चिखलाच्या गोळ्यास पंख देत आतड्याला पिळ आईच देते. दु:खातही रानातील काळीज फुल जपते. ज्ञानाची ज्योती होऊन फातीमा अनाथ मुलींची आई होते,दलित लेकीना आपल्या मायेच्या पदरात सहारा देतांना शेणगोळे,खडे,समाज कंटकाचे बोल ती सहन करते.कारण तिला अज्ञानाच्या शृंखला तोडून ज्ञानाचा प्रकाशात प्रकाशमान करीत अनेक मुलींचा उध्दार करत आपले आयुष्य खर्ची घातले. अशा फातीमा शेखचे गुणगौरव फारच अप्रतिम शब्दांत वाय के. करतात.
काळ्या मातीमध्ये राबणारी सखूबाई शेतात काम करतांना माहेराची गाणी गाते.(पा.क्र.५१)
तिच्या गोड गाण्यावर
पशु-पक्षी बोलती
अन् नाजूक बोटांसवे
फुलवेली डोलती.
तिच्या चाहुलीने गाय वासरे हंबरतात,वाटसरुसाठी दारी पाण्याचे रांजण भरते.अशी सखू ते उत्तम रेखाटतात.आई कुठे काय करते ? असे उपरोधाने विचारत आईने केलेल्या कामाची यादीच कवी देतो.(पा.क् ७१) दळण दळणे, पाणी शेंदणे, दारी रांगोळी काढणे,गाय म्हशीची धार काढणे,घरातील सर्वासाठी चहा,नाष्टा,धुणी -भांडी, दळण कांडण,बाळासाठी अंगाई गाणे,अशी कामे करतांना आईचा पदर प्रेमळ वात्सल्याने भरलेल्या आईसाठी वाय.के.म्हणतात (पा.क्र.७३)
दयेचा झरा ह्दयात झरावा म्हणूनी
मातेचे मुलायम पीठ मळते आई.
अशा शब्दात आईचे महत्व सांगून ते थांबत नाहीत तर जीद्दीने पेटलेली सौ.लता भगवान करे ,बारामतीत यांच्या जीवनातील सत्यकथा कवितेत चित्रित करतांना कवी तसुभरही कमी पडत नाहीत.चौ-याऐंशी ओळींची कविता मनाचा ठाव घेते. डोळे भरून येतात वाचतांना प्रत्येक परिच्छेदातील लता करेची जीद्द प्रभावीपणे मांडणी करतात.अशी जिद्दीनं पतीसाठी पळणारी लता करे म्हणते,(पा.क्र.९९)
नका करु कोणाचा हेवा
जिद्द मनात कायम ठेवा
जीद्द मनात कायम ठेवा.
अशी जिद्द मनाच्या ह्दयपटलावर ठेवणारी सीता,द्रोपदी,सावित्री, फातीमा शेख,इंदिरा,मीरा,गांधारी,आहिल्या,याचे जीवनातील जिद्दीचे मोल कोणासही करता येणार नाही.म्हणूनच वाय. के म्हणतात (पा.क्र.६३)
त्या कळ्यांचं फुलणं
त्या वा-याचं वागणं
तुझ्याशिवाय जगणं म्हणजे
श्वासाचं थांबणं
म्हणूनच कवी आईचं जीवनातील स्थान, ह्दयातील ओल, हे फक्त नाळ सांगत असते. मनाचे किनारे(पा.क्र.५०) कविता अतिशय बोलकी आणि विचार करायला लावणारी आहे.अंहकाराने मन भरले तर मनाचे घुमारे सैरभैर होतात,राग लोभ हे मनाच्या तटबंदीमध्ये बंदिस्त करुनच सुखाचा झुला,ताटव्यातील फुले आनंदाने डोलतांना मनाचा मोकळेपणा, हळुवारपणा उत्साहाने भरून जातो.अशा वेळी काट्यांतून चालतांना काहीच वाटत नाही.समोर विठू भक्तासाठी दोन हात पससरुन उभा आहे .विठूच निर्नुर्णी रुपात समोर येतो.सासर माहेर काशी मक्का होत असल्याचा भास होतो.(पा.कर.५०)
मनाच्या किनारी
भक्तीने नहावे
पंढरी भाविका
माहेर ते व्हावे.
कर्ज (पा.क्र.४९)कविता अतिशय मार्मिक अन् विचार करायला लावणारी आहे आई म्हणते.
कर्ज कितीही असू दे
मनी हिम्मत धरावी
पोशिंद्याने जगाच्या रे
फाशी कधीच न घ्यावी.
जगूनच संकटाशी सामना करता येतो यातच खरे पुरुषार्थ आहे.लावणीत पायात चाळ बांधून नाचणारी स्त्री, उसाच्या फडामध्ये कोयता सपासप चालवणारी बाई म्हणते. (पा.क्र.४२)
दिन ढळला ढळला
बोले दगडाची चूल
दिस येतील सुखाचे
तुझं शिकव गं, मूल.
आपल्या लेकरानं शिकावं हीच जिद्द व अपेक्षा असते. सहज सोप्या शब्दात आईची माया ममता वाय.के आपल्याकवितेच्या केंद्रस्थानी ठेवतात व तिचा गौरव करतात.तिच्या जिद्दीला सलाम करतात .सर्व कविता संग्रहाचे अवलोकन करतांना आपणास असे वेगवेगळे कप्पे लक्षात येतील बापावरील श्रद्धा कौतुकास्पद अशीच आहे. बाप वेगवेगळ्या रुपात भेटतो.तो कधी शेतकरी असतो,कधी कामगार तर कधी मजूर,कधी पोष्टमनच्या रुपाने समोर येतो. आबालाल रहमान कुंचल्याचा जादूगार व्यक्ती चित्राने ह्दयाचा ठाव घेतो. वीस हजार चित्रे त्यांनी रेखाटून आपला वेगळा ठसा उमटवला.कवी म्हणतात (पा.क्र.६)
रंग रंगवून निसर्गाचे,जीवनात रंग भरले
चित्राच्या प्रेरणेने जगण्यासाठी बळ दिले
महान चित्रकार तुझा देशाला अभिमान
अशा शब्दात गौरव करतात.माणसाने नेहमी प्रगती करावी,मंदिराचा कळस होतांना पायरीशी विसरू नये.सदैव शूर सैनिकाप्रमाणे असावे,बापाची माया रसाळ नारळापरी असते,आतड्यास पिळ देवून काम करत असतो,बापाची व्यथा बापासच माहित असते.हाच बाप शेतकऱ्यांच्या रुपाने समोर येतो,(पा.क्र२०)
तण काढता शेतात
हाती येतात रे फोड
म्हणे जेवता सखीस
लई पिठलं गं गोड
अशा प्रकारे संकटे आली तरी सकारात्मक राहवे,लव्हाळ्यासम झुकावे,ध्येय मनात ठेवून शिखरापर्यंत जावे. मनाचे किनारे या कविता संग्रहात वाय.के.समाजातील समाजजीवनातील अनेक पैलूचा व विषयाचा आपल्या साहित्यात वापर करतात. व्यक्तीजीवन,सामाजिक घडामोडी, आर्थिक घडामोडी, बदलते गावे स्वरूप,सण, उत्सव,सासर माहेर,स्त्रीजीवनातील दु:,ख,सुख अवतीभोवतीचा निसर्ग,पाऊस,पूर,शेती जीवनातील वास्तवता,त्यांच्या समस्या, स्वतःला खटकणाऱ्या घटना,समाजातील जीवनातील मुल्ये फारच अप्रतिम शब्दात कवितेत मांडून आपली चौफेर नजर,लेखनी याची झलक ते दाखवतात.वैद्यकिय विषयावरील त्याचे भाष्य विचार करण्यासारखेच आहे.किडणी विकणे आहे असे म्हणत शरीराच्या प्रत्येक अवयवाचा ते लिलाव उपरोधाने करतात.समतेच्या देशात विषमतेची दरी पाहून त्यांचे मनाचे किनारे अस्वस्थ होतात,विश्वास ,एकात्मता,बार मधील धिंगाणा,लाच, भेसळ, गल्लीतील दुर्गंधी वाहून नेणारी गटार,या सर्वामुळे कवी व्यथित होतात आणि लिहितात ( पा.क्र.५२)
सुजलाम सुफलाम माझ्या देशात
ओल्या डोळ्यांनी हे पाप पहातो आहे
कृपाळू कनवाळू दयाळू करुणाकर
देशाचा भाग्यविधाता शोधतो आहे.
असे असले तरी असंख्य संकटाशी कवी हसत हसत समोर जात आहे.वाय. के यांना माहित आहे की ,(पा.क्र.६०)फुलासारखे हसणे सोपे नाही,गर्द अंधारात काजव्याने रस्ता दावणे सोपे नसते,दुस-यासाठी वातीसम जळणे सोपे असते का ? ,अंकुरणे,बाप होणे सोपे नसते हो,असे म्हणता म्हणता ते लिहून जातात,(पा.क्र.६०)
हिमालयाच्या
शिखरावरती बर्फामध्ये
देशासाठी
शहीद होणे सोपे नसते.
असे मनाला स्पर्श होणाऱ्या ओळी कवी सहज लिहून जातात.’खोर’ गावचा मामा अप्रतिम वर्णन करतात.कधी ‘परतीचा पाऊस’ सृष्टी बहरून सोडतो.जुन्या वाटेवरच्या आठवणी सतावून जातात,दुष्काळ जीवघेणा पापणी भिजवून जातात.कधी मनाचं पाखरु प्रीतीचा इंद्रधनु फुलवून जातो.दुस-याच्या जीवनात सोनफूल झावळ्या जीवन गाणे गातात,तीच्या पदस्पर्शाने चिमण्या बोलायला लागतात,रोमारोमात संसाराचा सरीपाठ संसारवेलीवर निवांत विसावतो,(पा.क्र.९२) श्वासात,नभात,मनात,नावात,गावात,दवात,डोळ्यात,खळ्यात,मळ्यात,ममतेत,समतेत,लीनतेत,वा-यात,पावसात,मोग-यात,समोर,माघार,आधार,फुलांत,नयनात,अंतरात, उन्हात,सुखात,दु:,खात ती बसलेली,भिजलेली,फुललेली,भरलेली,सजलेली,असलेली,बसलेली आणि शेवटी हसलेली रानपाखरासारखी तुरूतुरू चालतांना घर वैभवाने भरून जाते.
कवी काळजावर नाव गोंदत राहतो.अशा अनेक मोहक प्रसंगाने कवितासंग्रह भरून गेला आहे.आई,फातिमा शेख,मनियार,पानगळ,राखी,सैनिक,नंदादीप, शिखर,पायवाट,झाडे लावू , किडण्या विकणे आहे,ध्वज,कर्ज,मनाचे किणारे,बनारसी पान,जुल्फे,आई,मनाचं पाखरु,जिद्द अशा अनेक कविता पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत.कविता संग्रहाचे वाचतांना एक वेगळा आनंद देवून जातो.म्हणूनच अे.के.शेख सर पाठराखण करतांना म्हणतात,”वाय.के.च्या कविता खूप काही सोसलेली ,पचवलेली शब्दांशब्दांत ओथंबलेली प्रीत,माया घेऊन उमलणारी अशी आहे. आई वडिलांना दैवत मानणारी त्यांची कविता रसिकांवरही भरभरून प्रेम करते.सहज,सोपी भाषा,शब्दांचं अवडंबर नाही,त्यांची कविता म्हणजे आत्म्याच्या गाभ्यापासून रसिकांशी साधलेला संवाद होय.आशयानुरुप घेणारी, स्वयंभू रुप असणारी त्यांची कविता प्रासादिक अशीच आहे.
कविता संग्रहाची अर्पणपत्रिका सौ.परविन भाभी,मुली डाॅ.सामिया शेख,समीना मुजावर,मुले अस्लम असिफ यांना समर्पित आहे.नेहा महाजन यांनी महाजन पब्लिशिंग हाऊस,पुणे (मो.९८२२९७७७२६)नीलम आर्टस् यांचे मुखपृष्ठ अप्रतिम आहे.स्वागत मुल्य २२५ रुपये मात्र आहे.मी माझ्यापरिने आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला.वाय.के शेख यांना त्यांच्या साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…!
कविता संग्रह : मनाचे किनारे
कवी : वाय. के शेख
मो : ९८६०२९९४९१.
प्रकाशक : महाजन पब्लिशिंग हाऊस,पुणे.
मो : ९८ २२ ९७ ७७ २६.
मुखपृष्ठ.: नीलम आर्टस्
स्वागत मुल्य : २२५ रुपये.
आस्वादक : मुबारक उमराणी,
सांगली
मो.9766081097