आता श्रीरामाचे आदर्श जोपासण्याची गरज.!
प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा
युगायुगाच्या प्रवासात राम मंदिराची महिमा आणि प्रतिष्ठान शिगेला स्पर्श करत राहिली आणि सत्य शेवटी तब्बल ४९२ वर्षानंतर अखेर तो दिवस आला आणि राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली या दिवसाची वाट राम भक्त बघत होती तो मुहूर्त संपन्न झाला अयोध्यातील भाग्यश्री राम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी पाच शतकांची प्रतीक्षा अखेर संपली आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला.राम मंदिर स्थापन करण्याचे प्रण आपण पूर्ण केले आता खरी गरज आहे.रामाचे आदर्श जोपासण्याची.आपल्यात आदर्श राम निर्माण झाला पाहिजे.राम आदर्श होते.आदर्श राजा होते.आदर्श पिता,कुशल संघटक, आदर्श पती,आदर्श भाऊ होते.हाच आदर्श आता आपल्या प्रत्येकाच्या अंगी निर्माण करण्याची गरज आहे.आजच्या आधुनिक युगात प्राचीन काळाच्या तुलनेत विज्ञान आणि सुखसोयींचा विस्तार झाला असला तरी माणसाचे नैतिक पातळीवर पतनही झाले आहे. नाती आता औपचारिक झाली आहेत. सर्व गोष्टी स्वार्थ आणि पैशांच्या सभोवताल फिरतात. धर्माचाही ऱ्हास होऊ लागला आहे. राज्यकर्ते भ्रष्ट्राचारी झाले आहेत.आजच्या युगात राम सापडणे कठीण आहे पण रावण सर्वत्र दिसत आहे. अशा परिस्थितीत या आधुनिक युगात भगवान श्रीरामांची प्रासंगिकता अधिकच वाढते आहे.
श्रीरामांचे समुज्ज्वल चरित्र म्हणजे साक्षात जगन्नियंत्या परमेश्वराकडून समग्र जगाला लाभलेले एक अभूतपूर्व वरदान. या निर्मल व्यक्तिमत्त्वाच्या उदात्त जीवनाचे कोणत्याही नेत्रभिंगातून अवलोकन करा. चहुकडून दृष्टीस पडेल, तो फक्त आदर्श मानवी मूल्यांचा अथांग सागर. त्यांच्या आद्योपांत जीवनगंगेतून सतत खळाळत राहतो तो पावन निर्झर. असंख्य युगे लोटली, काळ बदलला, नवपरिवर्तने घडून आली, तरी पण श्रीरामांचे मर्यादापूर्ण जीवन या समग्र विश्वाला सतत सतत प्रेरणा देत राहील. म्हणूनच की काय, या पुण्यप्रद प्रेरक रामकथेविषयी एका सुभाषितकाराने तितक्याच दृढ विश्वासाने म्हटले आहे-
यावत्स्थास्यन्ति गिरय: सरितश्च महीतले। तावद्रामायण-कथा लोकेषु प्रचरिष्यति॥
म्हणजेच जोपर्यंत या भूमंडळावर पर्वत उभे असतील आणि नद्या वाहत राहतील, तोपर्यंत रामायण कथा लोकांमध्ये प्रसारित होतच राहील.
सध्याच्या संक्रमण युगात प्रभू श्रीरामांचे पावन जीवन हेच समग्र विश्वाच्या नवनिर्मितीसाठी सर्वाधिक उपयुक्त ठरणारे आहे. अगदीच बालपणापासून ते जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांच्या जीवनपटावर दृष्टिक्षेप टाकला, तर आपणांस असे लक्षात येते की, त्यांनी कधीही आपल्या मर्यादा ओलांडलेल्या नाहीत. त्यांचा ब्रह्मचर्य आश्रमाचा म्हणजेच विद्यार्थीजीवनाचा काळ घ्या की, गृहस्थाश्रमाचा, पुत्राच्या रूपातील आई-वडिलांचा आज्ञापालक असो की, राजाच्या या रूपातील आदर्श प्रशासक असो अथवा त्यांचे इतर कोणतेही रूप डोळ्यासमोर ठेवा, त्यांच्या आद्योपांत जीवन प्रवासातील सर्वच बाबी उत्तमोत्तम असल्याचे निदर्शनास येते. आज्ञाधारक पुत्र, सेवाभावी शिष्य, कर्तव्यपरायण पति, प्रजावत्सल राजा, प्राणप्रिय भ्राता, जीवश्च कंठश्च मित्र. अहो, इतकेच काय तर उदार व गुणग्राही शत्रूदेखील, अशा विविध गुणवैशिष्ट्यांमुळे श्रीरामांचे जीवन अखिल मानवसमूहासाठी प्रेरणेचा वटवृक्ष वाटतो. आयुष्याच्या कोणत्याही क्षणी ते कर्तव्यापासून कधीही दुरावले नाहीत. परिस्थिती अनुकूल असो की प्रतिकूल, कर्मनिष्ठेच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत. म्हणूनच त्यांना प्रदान करण्यात आलेले ‘मर्यादापुरुषोत्तम’ हे विशेषण हे आजतागायत इतर कोणालाही लागू पडत नाही. इतक्या उच्च आदर्शांनी समग्रर भूमंडळावर शोभिवंत ठरणारे दिव्योत्तम व्यक्तिमत्व म्हणजे फक्त आणि फक्त श्रीरामच!
खरेतर जगातील पहिले आर्ष महाकाव्य कोणाच्या नावाने रचले गेले असेल? तर ते श्रीरामांच्याच नावाने. महर्षी वाल्मिकींसारखे तपस्वी ऋषी हे आद्यकवी. त्यांच्यात जेव्हा काव्यनिर्मितीची दिव्य प्रतिभा जागृत झाली, तेव्हा त्यांना प्रश्न पडला की, आपण कोणाचे काव्य रचावे? मग त्यांनी असंख्य सत्पुरुषांचा धांडोळा घेतला. यासंदर्भात अनेकांना विचारपूस केली. त्यातच मुनिश्रेष्ठ नारद भेटले. त्यावेळी त्यांना वाल्मिकी आपल्या चरित्रनायकाविषयी विचारणा करीत म्हणतात-
को न्वस्मिन् साम्प्रतं लोके
गुणवान् कश्च वीर्यवान्
धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रती ॥
म्हणजेच सध्या या जगात गुणसंपन्न, शौर्ययुक्त, धर्मज्ञानी, कृतज्ञ, दृढव्रती, सत्यवादी, चारित्र्यसंपन्न, सर्व प्राणिमात्रांचे हित साधण्यात कार्यतत्पर, विद्वान, क्रोधावर विजय मिळविणारा, सर्वसामर्थ्यवान, कोणाची निंदा न करणारा आणि प्रियदर्शनी व्यक्ती कोण आहे? ज्ञातुमेवविधं नरम्? म्हणजेच अशा व्यक्तीला मी जाणू इच्छितो, जो की वरील गुणांनी परिपूर्ण आहे.
रामाचे हे रूप सनातन आहे. राम – कृष्ण – हरि या मंत्रातील प्रत्येक अक्षर सकारात्मक आणि कल्याणकारी आहे. राम म्हणजे रमवितो तो. कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा आणि हरि म्हणजे राम आणि कृष्णाच्या पलीकडील सर्व विश्व. भूलोकातील आनंद देणारी सुंदर गोष्ट म्हणजे राम. या आनंददायी रामाचा प्रवास म्हणजे रामायण. रामाची ही विशेषता त्याच्यापुरती सीमित नाही आणि राम तिचा आरंभही नाही. लौकिक आणि अलौकिक उद्धाराचा मार्ग रामाच्या कुलाने सुरू केला आणि रामप्रभूंनी तो प्रशस्त केला. राजा दिलीपाच्या निमित्ताने महाकवी कालिदासाने आदर्श राजाचे जे चित्र रेखाटले आहे त्यात संपूर्ण ईक्ष्वाकू वंशाची महती येते.
प्रजानां विनयाधानात्
रक्षणाद्भरणादपि ।
स पिता पितरस्तासां
केवलं जन्महेतव: रघुवंश
‘जनतेचे पालन करणारा, पोषण करणारा, रक्षण करणारा, तिला सन्मार्गावर नेणारा तो खरा राजा. त्याचे स्थान पित्यापेक्षाही उंच. जन्म देणे हे पित्याचे काम, पण राजा प्रजेला चरित्रशील बनवतो म्हणून तो यथार्थ पिता अशी ही आदर्श राजाची कल्पना आहे. राजा दिलीप आणि गोमाता नंदिनी यांचे नाते असेच रमणीय आहे. नंदिनीची सेवा करणाऱ्या दिलीप राजाचा वारसा रामाने जपला आणि मोठा केला. रामाची ही कृती रामायणाचा अलौकिक विशेष आहे. रामायणात नर आणि वानरांचे नाते नसते तर रामायण वाचुनिया नंतर बोध कोणता घ्यावा आपण-
श्रीरामासम मिळता नायक
वानरसुद्धा मारिति रावण
हे विंदा करंदीकर यांचे शब्द या महाकाव्याची आणि महानायकाची महती सांगण्यासाठी पुरेसे आहेत. रामकथेच्या अनुषंगाने संक्षेप रामायण या नावाने राजधर्माचे विवेचन येते. हे नीतिविवेचन नारदमुनी करतात. त्यांनी आदर्श राजाचे सोळा गुण वर्णिले आहेत. नीतिमान, पराक्रमी, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवचनी, आत्मवचनी, चारित्र्यसंपन्न, सर्वभूत हितैषी, विद्वान, सामथ्र्यशील, प्रियदर्शी, आत्मवंत, जितक्रोध, अनसूयक आदी गुणांचा यात समावेश आहे. राजा दशरथाने आपल्या पुत्रांना हाच राजधर्म शिकवला.
आता गरज आहे रामाच्या राजधर्माचे पालन करण्याची आणि त्यांचा प्रत्येक आदर्श जोपोसण्याची.
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देश राममय झाला आहे.. संपूर्ण देशात एकात्मतेची भावना निर्माण झाली आहे.या ऐक्याच्या बळावर देशात ऐक्य प्रस्थापित करता येणे शक्य आहे.राष्ट्रमंदिराचीही उभारणी होऊ शकते. त्यासाठी ‘राष्ट्रभक्ती’ हे एक असाधारण असे माध्यम आहे. ही राष्ट्रभक्ती जोपासतान काही अगदी साध्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील. राज्यकारभार करताना खरंच आपण नीतिमत्तेचे पालन करतो काय.? लोक प्रतिनिधी या नात्याने आपण जनतेचे प्रश्न सोडवितो काय? सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये असे लिहिलेले असताना आपण या नियमाचे पालन करतो काय? ठिकाणीक सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये? असे फलक लिहिलेले असताना आपण या नियमाचे पालन करतो काय?. सार्वजनिक स्वच्छतेचे भान ठेवतो का? वृक्षसंवर्धन करतो का? वीज, पाणी आणि अन्य स्रोत मर्यादित प्रमाणात वापरून राष्ट्रीय संपत्ती जपतो का? वाहतुकीचे नियम, सामाजिक वर्तनाचे संकेत पाळतो का? अशा अनेक गोष्टी मनाला विचाराव्या लागतील आणि त्याप्रमाणे स्वत:मध्ये बदलही घडवावे लागतील. राष्ट्रमंदिर निर्मितीच्या या वाटेवर भ्रष्टाचारमुक्त, समरस, संपन्न समाजासाठी मानसिक परिवर्तनाची तयारी तर अभिप्रेत आहेच, शिवाय श्रीरामाचे आदर्श समोर ठेवून व्यक्तिगत आणि सामाजिक वर्तन – व्यवहारात सकारात्मक, सुनिश्चित, सातत्यपूर्ण बदलही अपेक्षित आहेत. तसे झाले तर आपल्याला स्वत:च्या अन् देशाच्याही प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर ‘राम’ गवसल्याशिवाय राहणार नाही!
– प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६