मुन्नाभाई वडेवाले…
सेमाडोह, धारणी जाताना घटांग हे गाव लागते. खरं म्हणजे तो रेस्ट स्टॉपच आहे पर्यटकांचा. प्रत्येकाची गाडी इथे थांबल्या शिवाय राहत नाही. कारण काय तर गरम गरम वडे खायला. या गावात अगदी रस्त्यावर काही छोटी छोटी हॉटेल्स आहेत. यामध्ये मुन्नाभाई चे एक हॉटेल आहे.
आजूबाजूला तट्टे बांधलेले.पाऊस आला की उभे राहायची अडचण.मात्र मुन्नाभाई चे हॉटेल दिवसभर हाऊसफुल्ल असते.त्याचे एकमेव कारण म्हणजे इथे मिळणारे गरम गरम वडे. वडे सर्वत्र मिळतात मात्र घटांगचे वडे जिभेला वेड लावणारे. एरवी वडा म्हटल की मुगाचा असतो. त्यातही मुगाच्या डाळीचे वडे तेलात पूर्ण तळले पण जात नाही.गरम असताना ही बाब लक्षात येत नाही. मात्र घटांग येथे तयार होणारे हे वडे मूग डाळ कमी अन् बरबटी डाळ जास्त प्रमाणात वापरून केले जातात. बरबटीचे वडे ही अफलातून रेसिपी आहे. मला वाटते ही येथील लोकांनीच शोधली असेल. अत्यंत चवदार अन् एकाच वेळी चार पाच खाल्ल्याशिवाय तृप्तीचा ढेकर देता येत नाही अशी या वड्याची जादू आहे.
मुन्नाभाई दिवसभर कढई समोर बसून असतात. ग्राहक वेटींग वर हे नेहमीचे दृश्य. बरबटीचा हा वडा या भागातील ओळख झाली आहे. पर्यटनासोबतच वडे खाण्याचा मोह आवरत नाही. बारा रुपयाला एक अन् पंचवीस रुपयाला दोन वडे विकले जातात. दिवसभर आठशेचे वर वडे विकले जातात. म्हणजे जवळपास दहा हजार रुपयाची रोजची वडे विक्री. यातून जे काही उरत असेल तो नफा जगण्यासाठी पुरेसा आहेच. गेली वीस वर्ष मुन्नाभाई हा व्यवसाय करीत आहेत. आज त्यांचा बरबटी वडा मेळघाटचा ब्रँड झाला आहे. कोसळणारा पाऊस अन् चवदार वडा हे समीकरण आता तयार झाले आहे. बरबटीचा वडा हा प्रयोग सर्वत्र व्हायला पाहिजे. बाकी टेस्ट एकच नंबर ना हो भाऊ.
– संतोष अरसोड,
नेर, जि. यवतमाळ