मारकडवाडीला पोलिस छावणीचे स्वरूप, ग्रामस्थ ‘बॅलेट’वर ठाम, आज मतदान
Contents hide
सोलापूर/माळशिरस : ‘ईव्हीएम’वर (EVM) आक्षेप घेत सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीने बॅलेट पेपरवर मतदान (Markadwadi Ballot Paper Voting) घेण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली होती.
प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने २ डिसेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान गावात जमावबंदीचा आदेश लागू केला असून, गावातील २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत.
मतदान आज (३ डिसेंबर) बॅलेट पेपरवर घेतले जाणार आहे. मात्र ‘आमच्यावर लाठीचार्ज झाला, गोळ्या जरी चालवल्या तरी आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहोत,’ अशी आक्रमक भूमिका मारकडवाडी ग्रामस्थांनी (Markadwadi Villagers) घेतली आहे.
दरम्यान, मारकडवाडी गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे, तर गावकरीही मतदान घेण्यावर अडून बसलेले आहेत. त्यामुळे प्रशासनापुढेही मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यावर काय तोडगा काढला जातो, याची उत्सुकता आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील (Malshiras Assembly Constituency) भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मिळालेल्या मतांवर मारकडवाडी ग्रामस्थांचा आक्षेप आहे. आमच्या गावातून आमदार उत्तम जानकर यांना जादा मतदान झाले आहे, अशी भूमिका घेऊन मारकडवाडी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. त्याचा संपूर्ण खर्च करण्याची तयारीही ग्रामस्थांनी दाखवली होती.
माळशिरसच्या तहसीलदारांकडे गावकऱ्यांनी खर्चाची रक्कम भरून फेरमतदानाची प्रक्रिया राबविण्याची विनंती केली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने ती मागणी फेटाळली आहे. जिल्हा प्रशासनाने मागणी फेटाळली असली तरी मारकडवाडी ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मारकडवाडीत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. तसेच, आमदार उत्तम जानकर गटाच्या २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत.
गावात एकूण २४७६ मतदान असून, विधानसभा निवडणुकीत १९०५ मतदान झाले आहे. त्यात राम सातपुते यांना १००३, तर उत्तम जानकर यांना ८४३ मतदान झाले आहे. आमच्या गावात १६५ मतांचा फरक झाला आहे. सातपुते यांना मताधिक्य गेल्याने आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. आतपर्यंत जानकर आणि मोहिते- पाटील यांना गावाने मताधिक्य दिले आहे, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत मारकडवाडी ग्रामस्थ म्हणाले, काहीही झाले तरी आम्ही आज (३ डिसेंबर) बॅलेट पेपरवर मतदान घेणार आहोत. लाठीचार्ज झाला, डोकी फुटली, रक्तबंबाळ झालं, गोळ्या जरी चालवल्या तरी आम्ही प्रशासनाच्या पुढे झुकणार नाही. कोणालाही त्रास न देता आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेणार आहोत. सकाळी आठपासून आम्ही मतदानाची प्रक्रिया राबविणार आहोत. या प्रक्रियेला आमदार उत्तम जानकर यांचा पाठिंबा आहे. गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मतदान घेण्यावर ठाम आहोत. प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे, आम्ही त्यांना सहकार्य करू, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले.