शैक्षणिक विचारांचा महामेरू – राष्ट्रसंत
संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याची ओळख असलेल्या महापुरुषांमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, डॉ. पंजाबराव देशमुख यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागते. जिल्ह्याला लाभलेले हे महापुरुष आपल्या समाज प्रबोधनातून, कृतीतून, उपदेशातून व अथक प्रयत्न करून लिहिलेल्या साहित्यातून जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला घडविण्यात अग्रेसर ठरले आहे. त्यातील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे शिक्षणतज्ञ,समाज सुधारक, समाजप्रबोधनकार,भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी यासारखी अनेक बिरुदे परिधान केलेले शैक्षणिक विचारवंत होते. ज्यांनी लोकशिक्षणाचा प्रसार आपल्या खंजिरीच्या माध्यमातुन गावागावात पोहोचविला. जनसामान्य,गोरगरीब, कष्टकरी लोकांना शिक्षणाचे महत्त्व त्यांनी आपल्या अफाट वाणीतून समाजापुढे मांडले व जणू काही एक क्रांतीच घडून आणली.
भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून शिक्षणासाठी सरकारने अनेक आयोग नेमले. शिक्षणातील समस्या निराकरणासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. पण शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीता या ग्रंथात जीवन शिक्षण या अध्यायामध्ये वर्णन केलेले आपले मौलिक शैक्षणिक विचार शिक्षण व्यवस्थेला कलाटणी देण्यासाठी महत्त्वाचे ठरले.राष्ट्रसंत म्हणतात –
विद्येअंगी व्हावा विनय |
विद्या करी स्वतंत्र, निर्भय |
शिक्षणाने वाढवा निश्चय |
जीवन जय करावया ||
राष्ट्रसंतांनी शिक्षण म्हणजे नुसते उदरनिर्वाहाचे साधन नसून आपल्या शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी व्हावा. शिक्षणाने माणूस विनयशील बनावा. विद्या घेऊन माणूस निर्भय व स्वतंत्र बनावा. आणि जीवनात जर जयजयकार करावयाचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि जे शिक्षण माणसाला खऱ्या अर्थाने मानवता शिकवते तेच खरे शिक्षण होय.हे राष्ट्रसंतांनी आपल्या या जीवन शिक्षण अध्यायामधून समाजापुढे मांडले.
समाजाला व राष्ट्राला सशक्त व समर्थशाली बनवण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. आपण घेत असलेल्या शिक्षणामधून राष्ट्राचा विकास साध्य झाला पाहिजे म्हणून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी राष्ट्रसंतांनी जीवन शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धती असावी असा आग्रह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी धरला. शिक्षण प्रत्येकाला निर्भयपणे घेता आले पाहिजे. शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली असली पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी सक्षम बनवायचे असेल तर कृतीयुक्त शिक्षण देणे गरजेचे आहे हे राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगीतेत नमूद केले आहे. जर कौशल्यावर आधारित शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले तर त्यातून आजचा तरुण एक शिक्षक, संशोधक, कवी, साहित्यिक, उद्योगपती, प्रगत शेतकरी,कलाकार, कलावंत,नेता इत्यादी क्षेत्रात उत्कृष्टरित्या तयार होऊ शकतो हे राष्ट्रसंतांनी आपल्या काव्यातून समजासमोर मांडले.
गावासि कैसे आदर्श करावे |
याचेचि शिक्षण प्रामुख्ये द्यावे |
सक्रियतेने करावयासि लावावे |
विद्यार्जनी ||
गाव जर आदर्श करायचे असेल तर सर्वांना शिक्षणाचे महत्त्व समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे जीवन शिक्षण या अध्यायाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी समाजापुढे मांडले.महाराजांवर पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव होता. तसेच त्याकाळी समाज जागृतीचे कार्य करणारे अनेक समाजसुधारक यांनी संपूर्ण देशाला नवी दिशा दिली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा,डॉ पंजाबराव देशमुख यांच्यासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा शिक्षणाचे शिल्पकार ठरले. जीवनात शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व आहे यासाठी राष्ट्रसंत म्हणतात –
ऐसे जीवन आणि शिक्षण|
यांचे साधावे गठबंधन |
प्रथमपासूनचि सर्वांगीण |
शिक्षण द्यावे तारतम्ये ||
म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितलेल्या जीवन शिक्षण या युक्तीप्रमाणे चालल्यास व देशाचा विकास नक्की होईल. आणि याच मार्गावर चालणे हीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना खरी श्रद्धांजली ठरेल.!
– श्री अविनाश अशोक गंजीवाले (स. शि.)
जि प प्राथ शाळा करजगाव पं. स. तिवसा
जि. अमरावती