“आयुष्याचे मर्म” सांगणारा कवितासंग्रह- “आठवांचे लक्ष मोती”
नाशिक जिल्ह्याला जाज्वल्य साहित्यिक वारसा आहे. अनेक दिग्गज साहित्यिकांनी नाशिकच्या साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करून मोलाचे योगदान दिले आहे. नव्या दमाच्या साहित्यिकांत कवी, सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर यांचे नाव विशेष करून घेतले जाते. त्यांची नुकतीच “आठवांचे लक्ष मोती” ही काव्यकलाकृती वाचनात आली. एक नववधू मुंडावळ्या बांधून भाऊक चेहऱ्याने दाराच्या मागे उभी असलेली मुखपृष्ठावर दिसत आहे. हिरवा चुडा, हाताला मेहंदी लावलेली आणि ज्या दाराच्या मागे ती उभी आहे; त्या दरवाज्याच्या फळ्या दिसत आहेत. अशा प्रकारचे मुखपृष्ठ पाहिले आणि मन क्षणभर गंभीर झाले, गहिवरून आले… यावरून या कवितासंग्रहात काय असेल; याचा अंदाज घेता येतो.
“आठवांचे लक्ष मोती” या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर थोडा प्रकाश टाकावा म्हणून सूक्ष्म निरीक्षण करता असे लक्षात आले की, हे मुखपृष्ठ एका ग्रामीण म्हणजेच गावखेड्यातील नववधूचे प्रतिनिधित्व करत असल्याचे जाणवते. ज्या दरवाज्याला धरून नववधू उभी आहे; त्या दरवाज्याला फट पडलेल्या फळ्या दिसत आहेत. यावरून येथील ग्रामीण राहणीमान आणि अर्थव्यवस्थेचे वास्तव चित्रण दिसून येते. या नववधूच्या चेहऱ्यावर उदासी भाव आहेत. हे भाव माहेर सोडून जाताना लेकीची जी अवस्था असते, ज्या मायबापाने अत्यंत गरिबीत दिवस काढून लहानाचे मोठे केले, त्यांच्यापासून आता दुरावणार आहे. कदाचित लहानपणाच्या साऱ्या आठवणीने तिच्या मनाची घालमेल झाली असावी… हा संदर्भ घेऊनच मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी हे मुखपृष्ठ सजवले असावे आणि म्हणूनच कवी रवींद्र मालुंजकर त्यांच्या “आठवांचे लक्ष मोती” या कवितेते म्हणतात की-
‘सोनियाच्या पावलांनी, जिने उजळले घर
आज चालली सोडून, सोन्यासारखे माहेर!’
अतिशय गहिवर यावा… अशा या पंक्ती मुखपृष्ठाला साजेशा आहेत. या मुखपृष्ठावरच्या शीर्षकाचा आकारदेखील जसा कंठ दाटल्यावर स्फुंदत-स्फुंदत थरकाप होतो; तसे या शीर्षकातील शब्ददेखील स्फुंदत आहेत, असा भास होतो. इतका गर्भीत अर्थ मला यातून जाणवला.
“आठवांचे लक्ष मोती” हा काव्यसंग्रह कवी मालुंजकर यांनी आपल्या तीर्थरूप आईवडिलांना आणि काव्यजिव्हाळा जपणाऱ्या रसिक गणगोतास अर्पण केली आहे. यावरून कवीची आईवडिलांवरची प्रीती दिसून येते. तर कवी आपल्या इतर साहित्यिक मित्रांना जपण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.
कोणतीही प्रस्तावना अथवा मनोगत न घेता या कवितासंग्रहाची बांधणी करून “आठवांचे लक्ष मोती” या संग्रहात एकूण ६८ कवितांचा समावेश करून कवीने या कलाकृतीला वाचकांच्या हाती सोपवले आहे. कवितासंग्रहात एकूण सहा विभाग केले असून प्रत्येक विभाग स्वतंत्र विषय-आशय घेऊन आपली अनुभूती प्रकट करताना दिसून येतो.
स्री ही कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची पत्नी तर कुणाची लेक असते. ती नानाविध नात्यात हळवेपणा जपून एकमेकांना जपत असते. दोन नात्यांना मातेच्या ममतेने सांधणारी ती एक सांधणदरी असते. म्हणून कवी ‘काळीजअंगण’ या विभागातील “सुख” कवितेत म्हणतात की-
‘फक्त नसते मुलगी, कुणी राबणारी बाई
एक असते तिच्यात, जीव लावणारी आई.’
ज्या घरात लेक आहे; त्या घरात सदैव चैतन्य असते. कधी पावसाची थंडगार सर, तर कधी संगीताचा सप्तसूर, तर कधी-कधी सुखाची तुतारी वाजत राहते आणि म्हणूनच कवी “लेक”या कवितेते म्हणतात की-
‘लेक काळीजअंगण,जसा अमृताचा सडा
संगीताचा सप्तसूर,नित्य आनंदाचा घडा.’
कवितासंग्रहातील कविता अत्यंत साध्या आणि मनाला जशा भावल्या; तशा आल्या आहेत आणि ग्रामीण जीवनाशी निगडित असल्याने मायबापाच्या जिव्हाळ्याचा गहिवर असल्याने आणि मायमातीचा अंश असल्याने या संग्रहातील जीव लेकीचा, लेक चालली सासरी, लेक गुणी सोनपरी, बापाचं बापपण… या कविता वाचकाच्या ह्रदयाशी संवाद साधताना दिसून येतात आणि म्हणूनच या कविता मनाला भावतात.
संग्रहातील कविता सहज भाव घेऊन येतात. कधी देहगाभारा भेदून मनातल्या भावनांना शब्दांत गुंफून तर कधी जगाचे दुःख पाहून तर कधी तान्हुल्याचे हसणे पाहून कविता येते. कवितेतून नवनवीन आव्हाने शोधायचे, कधी हीच कविता ज्या माउलीने आपल्यावर संस्कार केले; त्या संस्कारांची आठवण करून देत असते. तर कधी आपल्या अडचणीच्या काळात बापाने आधार दिल्याची आठवण करून देत असते. म्हणून कवी आपल्या “कविता माझी” यात म्हणतात की-
‘माऊलीच्या संस्कारात,माझी रांगते कविता
वडिलांच्या आधाराचा,अर्थ सांगते कविता.’
संग्रहातील ओंजळ, सुखाची आळंदी, अनमोल, देणे कवितेचे, कविताच झाली, कवितेची वेळ, येत सर पावसाची, आनंदाची वारी, एकच मागणे… या कविता मनाला कवितेच्या प्रांतात फिरून आणतात आणि म्हणूनच कवी म्हणतात की-
‘माझ्या मनीचा श्रावण,गातो आनंदाचे गाणे
सुख-समृद्धी येऊ दे, माझे एकच मागणे…!’
समस्त सृष्टीत सुखसमृद्धी यावी; ही प्रामाणिक इच्छा कवी आपल्या कवितेतून व्यक्त करतात. त्याचबरोबर कवी शिक्षणाला महत्त्व देताना दिसून येतात. ग्रंथ, पुस्तके वाचल्याने ज्ञान प्राप्त होते, जीवन सुविचारी होते. तर शाळा शिकल्याने ज्ञानरूपी विचारांचे भांडार मिळते, शाळा सुदृढ आणि संपन्न करते. म्हणून कवी आपल्या “सांगतात ग्रंथ” या कवितेत म्हणतात की-
‘सांगतात ग्रंथ | जगा सत्य ज्ञान
तेची देती आम्हा | मिळवून मान ||’
तर दुसऱ्या पंक्तीत म्हणतात की-
‘होई सुविचारी | आपुले जीवन
चराचर होई | सर्वथा पावन ||’
शाळा जीवनाला आकार देते, अमूल्य संस्काराचा ठेवा देते आणि म्हणूनच कवी “शाळा” या कवितेत म्हणतात की-
‘आकार जीवनाला देत असते शाळा…
अमूल्य संस्काराचा ठेवा असते शाळा!’
कवीला आपल्या गुरुजनांबद्दल अपार ममत्व आहे. गुरू हेच जीवनाचे खरे शिल्पकार आहेत. गुरूंनी संस्काराचे आकाश मुक्त करून आपल्या जीवनाला प्रकाश दिला, मनामनात माणुसकी रुजवली, इतरांबद्दल आपुलकी शिकवली. गुरू हे ज्ञान, संस्कार, मानवता यांची शिदोरी देत असतात. ती आपल्याला जपता आली पाहिजे; ही तळमळ कवीने आपल्या “लख्ख दिवा” या कवितेत व्यक्त केली आहे.
“आठवांचे लक्ष मोती” हा कवितासंग्रह मानवी जीवनाचा सारासार विचार करून सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, नैसर्गिक अशा सर्व बाजूंनी परिपूर्ण असा संग्रह आहे. पुण्याचे वैशाली प्रकाशन यांनी या कलाकृतीला प्रकाशित केले आहे. तर प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी या कलाकृतीला ग्रामीण व्यवस्थेच्या वास्तव चित्रणाची जोड देवून आपल्या कल्पकतेने कुंचल्याच्या कौटुंबिक धाग्याने रंगवले आहे. शेवटी कवीने मानवी “जीवनाचे मर्म” सांगून “आयुष्य हे सुंदर आहे, जगून घ्या…” हा मोलाचा संदेश दिला आहे. म्हणून कवी “मर्म आयुष्याचे” या कवितेत समाजाला योग्य सल्ला देताना म्हणतात की-
‘देह मानवाचा | मिळे एकदाच
वाट अर्ध्यातच | सोडता का?’
‘आनंदाचा तुम्ही | करा शिडकावा
डोके शांत ठेवा | नियमित ||’
असा मोलाचा संदेश या कवितेतून दिला आहे. कवी रवींद्र मालुंजकर यांना पुढील लेखनास खूप-खूप शुभेच्छा..!
मुखपृष्ठ परीक्षक –
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृतीचे नाव- आठवांचे लक्ष मोती
कवी- रवींद्र मालुंजकर – संपर्क- ९८५०८६६४८५
प्रकाशक- वैशाली प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ- अरविंद शेलार
किंमत- रु.१५०/-