नाशिक येथे ११ फेब्रुवारी रोजी खान्देश विभागीय गझल संमेलन
संमेलनाध्यक्षपदी डॉ. शिवाजी काळे यांची निवड डॉ. आशिष मुजुमदार यांच्या हस्ते उद्घाटन होणार
प्रशांत वाघ
नाशिक, (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था गझल मंथन साहित्य संस्था, खान्देश विभागीय कार्यकारिणी आणि नाशिक जिल्हा कार्यकारिणीतर्फे नाशिक येथे दि. ११ फेब्रुवारी रोजी खान्देश विभागीय एक दिवसीय गझल संमेलन आयोजित केले आहे. सुप्रसिद्ध गझलकार डॉ. शिवाजी काळे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार डॉ. आशिष मुजुमदार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
गझल मंथन साहित्य संस्था राज्यात सदैव गझलेचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत आहे. नवोदित गझलकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी विभागीय स्तरावर गझल संमेलन आयोजित केले जात आहेत. नाशिक येथे ११ फेब्रुवारी रोजी खान्देश विभागीय गझल संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून राशीन (जि. नगर) येथील सुप्रसिद्ध गझलकार डॉ. शिवाजी काळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा नुकताच अकरावी दिशा हा गझलसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील अनेक नवोदित गझलकार गझलेचे धडे गिरवत आहेत. संमेलनाचे उद्घाटन पुणे येथील सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार डॉ. आशिष मुजुमदार यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. मुजुमदार हे कार्यशाळेच्या माध्यमातून गझलकारांना गझल सादरीकरणाबाबत मार्गदर्शन करीत असतात. गझलचे तंत्र, मंत्र, आशय, विषय आणि सौंदर्य यावर भाष्य करणारी त्यांची सुरेल शब्द मैफल ‘आशयाना गझल’ खूपच लोकप्रिय आहे. या संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील सुमारे ७० गझलकार सहभागी होणार आहेत. सहभागी गझलकारांना आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
हे गझल संमेलन दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत तूपसाखरे लॉन, मुंबई नाका, नाशिक येथे होणार आहे. गझल रसिकांनी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्था, खान्देश विभागीय कार्यकारिणी आणि नाशिक जिल्हाध्यक्षा सौ मृणाल गिते आणि नाशिक कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.