गोरबंजारा अकादमी : बंजारा भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी ऐतिहासिक ठेवा
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून बंजारा साहित्य, संस्कृती व कला ही भारतीय विविधतेला समृद्ध करणारी एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बंजारा लोकसाहित्य टिकून आहे. बंजारा भाषिकांची संख्याही राज्यात मोठयाप्रमाणात आहे. राज्यात सिंधी, ऊर्दू, गुजराती अकादमी स्थापन केल्या गेली, परंतु बहुसंख्येने असलेल्या व समृद्ध लोकसाहित्य व संस्कृती असणाऱ्या बंजारा भाषिकांसाठी अकादमी नसल्याची वेदना प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार यांनी पुसद येथील एका बैठकीत बोलून दाखवली होती. त्यासाठी साहित्य संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक सभा आयोजित करण्याचे त्याचवेळी ठरविण्यात आले. बंजारा साहित्य संस्कृती व कलेसाठी एक शाश्वत मंच असावे. भारतीय विविधतेत इतर भाषिकासह सुसंवाद साधत बंजारा साहित्य समृद्ध व्हावे. गोर बंजारा भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी प्रोत्साहन आणि बंजारा भाषेतील वाड्.मयीन कृती प्रकाशित करण्यास तरतूद असावी यासाठी गोर बंजारा साहित्य अकादमीची संकल्पना त्यांनी सर्वप्रथम मांडली.
गोर बंजारा अकादमीची पायाभरणी, घोषणा , पाठपुरावा आणि शासन निर्णय हा प्रवास अतिशय प्रेरक आणि संघर्षमय आहे. ज्याप्रमाणे एखाद्या निर्माण कार्याचे भिंत, सजावट , कळस जितके महत्वपूर्ण असते, तितकेच महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी स्वतः ला गाडून घेणारा पाया आणि या पायाचे शिलेदार देखील महत्त्वाचे असतात. कारण संकल्पना, प्रारुप शिवाय कोणत्याही बाबींचा प्रवास सुरू होत नसतो. या संकल्पनेला खऱ्याअर्थाने मोठे पाठबळ ना.संजयभाऊ राठोडांचे मिळाले. हे विशेष. ना.संजय राठोड हे संस्कृती प्रिय व धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून बहुजन समाजात ओळखले जातात. त्यांच्या प्रयत्नांने श्रीक्षेत्र पोहरागड येथे ऐतिहासिक नगारा वास्तूसंग्राहालय भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन ३ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले होते. या निमित्ताने अकादमीसाठी अतिशय सुंदर योग जुळून आले. जिथे बंजारा अकादमीची संकल्पना, पायाभरणी झाली. मान्यवरांची अभिमत मिळाली. त्याच पवित्र ठिकाणी लाखोंच्या जनसागरापुढे तत्कालीन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक, मंत्री ना. पंकजा मुंडे, मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार , मंत्री ना.दादासाहेब भूसे , आमदार हरिभाऊ राठोड यासह अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी महोदयांच्या उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा अकादमी स्थापन करण्याची ऐतिहासिक घोषणा केली. हा दिवस खरंतर सर्वांसाठी अतिशय आनंदाचा क्षण ठरला. खऱ्याअर्थाने बंजारा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाणारी ही एक गौरवपूर्ण बाब म्हणता येईल.
* संजयभाऊ राठोडमुळे अकादमीचे स्वप्न साकार
बंजारा अकादमीची घोषणा झाल्यानंतरही तडफदार नेतृत्व संजयभाऊ राठोड , माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि अकादमीची संकल्पना मांडणारे सर्जनशील साहित्यिक एकनाथ पवार यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला. तत्कालीन आमदार हरिभाऊ राठोड आणि आमदार राजेश राठोड यांनी विधानपरिषदेत अकादमीचा मुद्दा देखील मांडला होता. त्यामुळे अकादमी विषयी साहित्य वर्तुळात चर्चाही होत असे. सिंधी, गुजराती अकादमीच्या धर्तीवर स्वतंत्रपणे बंजारा अकादमी स्थापन व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि एकनाथ पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची बंजारा भाषेला दर्जा , संवर्धन आणि बंजारा अकादमीसाठी भेटही घेतली. त्यावेळी मी बेलापूर ठाणे येथे होतो, काही तांत्रिक कारणांमुळे मला निवेदनासाठी जाता आले नाही, परंतु माझी सदिच्छा त्यांच्यासोबत होती. सहा -सात वर्ष उलटली परंतु अकादमी स्थापनेला मुहूर्त लाभत नव्हता. परंतु ना. संजय राठोड स्वतः बंजारा संस्कृती आणि सामाजिक प्रश्नांच्या संदर्भाने शासन दरबारी प्रयत्नशील असल्याने अखेर त्यांच्या पुढाकाराने १६ मार्च २०२४ रोजी गोर बंजारा अकादमी स्थापन करण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी घेतला. गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन करण्याचा शासन निर्णय येताच प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ पवार यांनाच नव्हे तर साहित्य वर्तुळातील साहित्यिक , कवी , लेखक , समिक्षक, विचारवंत, नाटककार, गितकार या सर्वांना हर्ष झाला. विशेष म्हणजे अकादमी स्थापनेत ज्यांचा पुढाकार होता त्या सर्व शिलेदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बंजारा भाषा, साहित्य, संस्कृती व कलेला शाश्वत मंच मिळण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ पवार यांनी अकादमीची जी संकल्पना मांडली होती, ते प्रत्यक्षात अवतरल्याचे आनंद होणे स्वाभाविकच होते. कारण बंजारा अकादमी ही बंजारा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाणारी एक ऐतिहासिक ठेवा ठरली. अखेर ना.संजयभाऊ राठोडमुळे अकादमीचे स्वप्न साकार झाले. आणि गोर बंजारा अकादमीचे खऱ्याअर्थाने साहित्यिक एकनाथ पवार शिल्पकार ठरले आहे.
* गोर बंजारा अकादमीची ऐतिहासिक पार्श्वभूमी
वैभवशाली संस्कृती जोपासणाऱ्या बंजारासाठी
बंजारा भाषा, साहित्य, संस्कृती , कलांचे संवर्धन व्हावे. इतर भाषिकांच्या साहित्य अकादमी प्रमाणेच बंजाराचा समृद्ध वारसा अबाधित रहावे. भारतीय विविधतेत बंजारा साहित्य संस्कृतीची प्रचिती यावी, बंजारा भाषेतून साहित्य निर्मितीला चालना मिळावी यासाठी श्रीक्षेत्र पोहरागड, भक्तीधाम येथे सन २०१५ मध्ये पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी विशेष करून उद्योजक तथा समाजसेवी किसनराव राठोड यांनी पुढाकार घेऊन उपस्थित सर्व मान्यवराच्या आदरातिथ्याची व्यवस्था केली होती. काही महत्त्वाच्या कामामुळे त्यांना येता आले नाही म्हणून त्यांनी फिल्म निर्माते समाजसेवी ॲड.पंडीत राठोड यांना पाठविले होते. बंजारा अकादमीसाठी किसनराव राठोड प्रोत्साहित करीत असे. सभेत बंजारा साहित्य संस्कृतीचे अभ्यासक तथा साहित्यिक एकनाथ पवार यांनी बंजारा अकादमीची संकल्पना मांडून उद्दिष्टे, प्रारुप व स्वरूप मांडले होते. या प्रारुपवर प्रबोधनकार प्रेमदास महाराज वनोलीकर, महंत जितेंद्र महाराज, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.मोतीराज राठोड आणि ज्येष्ठ साहित्यिक पंजाब चव्हाण यांनी अभिमत मांडून सहमती दर्शवली होती. या पायाभरणीच्या सभेला साहित्य संस्कृती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात प्रसिद्ध प्रबोधनकार प्रेमदास महाराज वनोलीकर, महंत जितेंद्र महाराज, रमेश महाराज, जि.प. उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक, ॲड. पंडीत राठोड, ज्येष्ठ साहित्यिक पंजाब चव्हाण पुसद, प्रसिद्ध कवी रतन आडे हिंगोली, प्रा.नरेंद्र जाधव, संपादक गोविंदराव चव्हाण, नांदेड, प्रा.विलास राठोड कारंजा , अशोक पवार , डॉ.शांतीलाल चव्हाण, पत्रकार अवी चव्हाण , पत्रकार शंकर आडे , पत्रकार अनिल राठोड , अरविंद पवार यवतमाळ यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी अकादमीच्या उद्दिष्टावर विस्तृत चर्चा करून शासन स्तरावर अकादमी स्थापन करण्यासाठी हालचाली करण्याचे ठरविण्यात आले. पुढे अकादमीसाठी साहित्यिक एकनाथ पवार यांनी पाठपुरावा सातत्याने सुरू ठेवला. संकल्पना ,पायाभरणी, पाठपुरावा आणि प्रसार या चौफेर पातळीवर योगदान दिल्याने गोर बंजारा साहित्य अकादमीचे खऱ्याअर्थाने साहित्यिक एकनाथ पवार हे शिल्पकार ठरले आहे. नगारा वास्तूसंग्राहालय भूमीपूजन सोहळ्याचे ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी अकादमीसाठी केलेल्या घोषणांचा फॉलोअप मंत्री संजयभाऊ राठोडांनी अतिशय पोटतिडकीने सुरु ठेवले. त्यांच्या पुढाकाराने साहित्यिक -भाषिक आदान – प्रदानातून राज्याचा सांस्कृतिक विकास साधून
राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या हेतूने महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन करण्याच्या निर्णयामुळे बंजारा साहित्य क्षेत्राला एक स्वर्णिम भेट मिळाली. हे विशेष.
* गोर बंजारा अकादमीची प्रेरक उद्दिष्टे
राज्यातील बहुभाषिकांच्या म्हणजेच मराठी भाषिकांचे संस्कृती, साहित्य, भाषा व लोकजीवनाशी सुसंवाद साधून सांस्कृतिक सुसंवाद साधण्याची कला या भाषिकांना अल्पसंख्यांकांना अवगत व्हावे. गोर बंजारा भाषा, साहित्य, कला व संस्कृती यांचे जतन व संवर्धन करणे. गोर बंजारा भाषा, साहित्य आणि कला क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कृत करणे. गोर बंजारा भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी प्रोत्साहन देणे. गोर बंजारा भाषेतील वाड्.मयीन कृती प्रकाशीत करण्यास सहाय्य करणे. गोर बंजारा भाषिक अल्पसंख्याकांनी केवळ त्यांच्या भाषेतील कार्यक्रम आयोजित करुन मर्यादित सुसंवाद ठेवण्याऐवजी त्यांच्या भाषेतील कार्यक्रमांसोबतच मराठी व इतर भाषिक कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यामध्ये मराठी भाषिकांनाही सहभागी करुन सामाजिक सुसंवाद निर्माण करणे. तसेच गोर बंजारा या भाषेसोबतच मराठी भाषेतही परीसंवाद, चचासत्रे, कवीसंमेलने आयोजन करणे. अशी महत्वपूर्ण उद्दिष्टे महाराष्ट्र राज्य गोर बंजारा अकादमीची आहे. भविष्यात बंजारा साहित्य, संस्कृती ,भाषा व कलेसाठी अकादमी एक ऐतिहासिक ठरणार असून या ऐतिहासिक अकादमीसाठी विशेष योगदान देणाऱ्या सर्व शिलेदारांचा नाव बंजारा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जातील. बंजारा भाषा साहित्य संस्कृती व कलेला अकादमीच्या माध्यमातून एक स्वर्णिम भविष्य लाभेल असा आशावाद या निमित्ताने दिसून येते.
– पंजाबराव चव्हाण,
ज्येष्ठ साहित्यिक,
पुसद ,
९४२१७७४३७२