अमरावतीची करीना थापा : शौर्याचा जाज्वल्य प्रकाश
अमरावतीतील १७ वर्षीय करीना थापा हिच्या साहसाने आणि धाडसाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. अमरावतीच्या कठोरा परिसरातील जय अंबा अपार्टमेंटमधील आग लागलेल्या घटनेत ७० कुटुंबांना प्राण वाचवण्यासाठी तिने दाखवलेल्या धैर्याबद्दल तिला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
घटना आणि धाडसाची कहाणी
१५ मे २०२४ रोजी, अमरावतीतील जय अंबा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये अचानक आग लागली. आग पसरत असल्यामुळे संपूर्ण अपार्टमेंटमधील रहिवासी घाबरून पळापळ करू लागले. त्या स्थितीत करीना थापा ही धाडसाने पुढे सरसावली. ती परिस्थितीचा अंदाज घेत फ्लॅटचे कुलूप तोडून आत गेली आणि गॅस सिलिंडर बाहेर काढला. सिलिंडरच्या स्फोटामुळे होऊ शकणारा मोठा अनर्थ तिने टाळला. करीनाच्या या धाडसामुळे ७० कुटुंबांचे प्राण वाचले आणि गंभीर वित्तीय हानी होण्यापासून अपार्टमेंट वाचले.
राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार
करिनाच्या या साहसामुळे, केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने तिची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार भारतातील १८ वर्षांखालील मुलांना त्यांच्या अपूर्व कार्यासाठी दिला जातो. या पुरस्कारामध्ये प्रशस्तीपत्र, सुवर्णपदक, आणि रोख बक्षिसाचा समावेश असतो. २६ डिसेंबर २०२४ रोजी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रपती भवनात तिला हा पुरस्कार प्रदान केला. करीनाचे कुटुंब, शिक्षक, आणि स्थानिक नागरिक या सन्मानाने आनंदित झाले आहेत.
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
करीना थापा हिचे कार्य केवळ तिच्या साहसाचेच नव्हे, तर समाजासाठीच्या सेवाभावाचेही उदाहरण आहे. तिने संकटसमयी दाखवलेली तात्काळ कृती आणि निडरपणा इतरांसाठी प्रेरणादायी आहे. आजच्या युवापिढीला करीनाच्या कार्यातून नक्कीच एक सकारात्मक संदेश मिळतो की धाडस आणि सेवा भावना यांचा संगम समाजासाठी किती महत्त्वाचा आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार २०२२ पासून २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून दोन्ही साहिबजादा बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांना अभिवादन व शौर्याचे स्मरण करण्यासाठी पाळला जातो. शिख धर्मातील दहावे गुरु, गुरु गोबिंद सिंग यांचे सुपुत्र बाबा जोरावर सिंग (वय ९) आणि बाबा फतेहसिंग (वय ५) यांच्या अव्दितीय शौर्याला समर्पित या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून हे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाएवजी वीर बाल दिवस म्हणजेच २६ डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतात.
अमरावतीच्या करिना थापा हिने दाखवलेले साहस आणि कर्तव्यदक्षता यामुळे ती आज संपूर्ण देशासाठी आदर्श ठरली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाल्यानंतर तिचे कार्य अधिक व्यापक प्रमाणावर पोहोचेल आणि ती अनेकांसाठी प्रेरणा बनेल. करिनाच्या कृतज्ञतेला सलाम !
● हे वाचा –Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – ‘ध्येयवेडा डॉक्टर’