आंतराष्ट्रीय योगदिन
प्राचिन काल पासून ऋषी-मुनी जन योग साधनेला महत्त्व देत होते. नियमित योगाभ्यास केल्याने शरिराला लवचिकता येत असते. प्राचिन तंत्राविषयी थोडी माहिती म्हणजे:-वैदिक ज्ञानाचे चार प्रमुख वेद आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद.
या नंतर चार उपवेद म्हणजे:-आयुर्वेद, अर्थर्वेद,धनुर्वेद, आणि गंधर्व वेद. ह्या नंतर सहा घटक:-शिक्षा,कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, आणि ज्योतिष. ह्याचे परत उपघटक म्हणजे:-न्याय, वैसेशीक, सांख्य,.मीमांसा, वेदांत आणि योग.
योग हा शब्द संस्कृत मधील ‘युज’ पासून बनलेला आहे.
योग म्हणजे जुळवणे, एकीकरण. योग हा वैदिक साहित्याचा भाग आहे जो पाच हजार वर्षांपूर्वी महर्षी पातंजली द्वारा संपादित करण्यात आला. त्यांनी योगाचे आठ भाग स्पष्ट केले आहेत. त्यांची नावे अशी- यम, नियम,आसन, प्राणायाम, प्रत्याहार,धारणा, ध्यान आणि समाधी.
योगामध्ये वेगवेगळ्या तत्वज्ञानांचा समावेश आहे. जसे,
ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग, हटयोग, राजयोग, मंत्रयोग, शिवयोग, नादयोग, लययोग आणि अजून बरेच काही आहेत.
यापैकी हटयोग परंपरेचा ‘आसने’ हा एक भाग आहे.
आजकाल योगाभ्यास म्हणजे फक्त शारीरिक आसनांना महत्त्व दिले जाते. पण योगाची खरी शिकवण ही मनाची अविचल स्थिती राखण्याची आहे. भगवद्गीतेत सांगितले आहे, “योगः कर्मसु कौशलम्.” म्हणजेच ‘कर्म आणि अभिव्यक्तीतील कौशल्य म्हणजे योग’.
हटयोगात आसनांद्वारे शारीरिक व मानसिक स्तरावर प्रगती होते. योगाचे विविध प्रकार हे चाकाच्या आराप्रमाणे आहेत आणि व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे सारखेच महत्व आहे. हठयोग आपणास शारीरिक तंदुरुस्ती बहाल करतो, तर इतर प्रकारच्या योगाने आपल्यात ज्ञान आणि भक्ती इत्यादीचा उदय होतो. पूर्वी गुरुकुलातून विद्वत विशिष्ट वर्गालाच हे ज्ञान प्राप्त करून दिले जायचे. पण आज परिस्थिती संपूर्ण बदलली आहे. मागील काही दशकापासून योगाभ्यास एक प्राकृतीक उपचाराचा सर्वोत्तम पर्याय म्हणून उत्साहाने स्वागत करत आहेत. पूर्वी फक्त विशिष्ट वर्गाचाच योगाभ्यास असायचा पण आज जात, पंथ, सामाजिक स्तर असे सारे अडथळे मुळापासून उखडून फेकत आज योग घरोघरी पोहोचला आहे.आणि एवढं आवर्जुन सांगावं वाटतं कि ह्यामध्ये पुरषापेक्षा स्त्रियांचा सहभाग सगळीकडे अधिक आढळत आहेत.
भारतीय योग संस्था (पंजी) रोहिणी स्केटर 3, नवी दिल्ली गेली अर्ध शतकाहुन जास्त कालावधी झाला संपूर्ण भारतात व विदेशातही योग साधनेची केंद्रे निःशुल्क चालवत आहे. स्वर्गीय पुज्य. प्रकाशलालजीनी चालवलेली संस्था 10 एप्रिल1967 सालची आज जगभर वटवृक्षासारखी पसरून समाजाला सदृढ, सशक्त व योगाचे महत्त्व पटवून देण्यात सफल झाली आहे. मी ही ह्या संस्थेची प्रधान म्हणून कार्य केले ह्याचा मला खूप अभिमान आहे.
योगाचे फायदे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नजरेतून सुटले नाहीत आणि आता संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्याचे विधेयक मंजूर केले आहे.
योग हा केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, तर आपण किती कुशलतेने इतरांशी संबंध प्रस्थापित करतो आणि एखाद्या परिस्थितीत आपण कसे अभिव्यक्त होतो हे आहे. म्हणून इथे योगाची व्याख्या मनाची कुशलता अशी करता येईल. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, “समत्वम योग उच्यते”.- मनाचे समत्व हे योगाचे लक्षण होय. विपरीत परिस्थितीतही केंद्रित राहू शकण्याची आपली क्षमता म्हणजे योग होय. जे काही आपल्याला आपल्या मूळ स्वभावाकडे परत आणते, जो आतला सुसंवाद, आनंद आहे, तोच योग आहे. आसनांमुळे शरीर तंदुरुस्त होते, तर प्राणायाम, ध्यानामुळे मन गहरे होते. आयुष्याच्या, आपल्या अस्तित्वाच्या ह्या साऱ्या पैलूंचे एकत्रीकरण म्हणजेच योग होय.
आंतरराष्ट्रीय योग दिवस हा योगास मान्यता देणारा एक दिवस जो 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारल्यानंतर दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो.
“योग दिन” साठी पुढाकार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 2014 च्या संयुक्त राष्ट्रांच्या भाषणात घेतला होता, आणि संबंधित ठरावाला व्यापक जागतिक समर्थन मिळाले होते, 177 राष्ट्रांनी संयुक्त
राष्ट्रांच्या आमसभेत सह-प्रायोजित केले होते , जेथे तो एकमताने मंजूर झाला. त्यानंतर, पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून २०१५ रोजी न्यूयॉर्क, पॅरिस, बीजिंग, बँकॉक, क्वालालंपूर, सोल आणि नवी दिल्लीसह जगभरात यशस्वीपणे साजरा करण्यात आला. आजचा 21जून आपला दहावा आतंरराष्ट्रीय योग दिवस आहे.
प्राचीन योगविद्येचा समृद्ध वारसा भारताला मिळाला आहे. भारताने जगाला योगाची ओळख करून दिली आणि जगभरात योगाचा प्रसार केला. मी वरती उल्लेख केलेली ‘भारतीय योग संस्था’ ही तेवढीच योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळवून देणारी संस्था आहे.
जगभरातील लोकांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि योगाप्रती लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो.
२१ जूनलाच योग दिन साजरा करण्याचे कारण विशेष म्हणजे हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. ह्याला ग्रीष्म संक्रांती असे ही म्हटले जाते. या दिवसानंतर सूर्य दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. त्यामुळे, योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. त्यामुळेच, २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारतीय योग संस्थानचे ब्रीद “जीओ और जीवन दो” म्हणजे Yoga For Self And Society.
– शोभा वागळे
मुंबई
भारतीय योग संस्थान
(प्रधान) अंधेरी -जोगेश्वरी
8850466717