लोकार्पण सोहळा !
आले नेते,गेले नेते
ना पेटल्या
चुली तांड्याच्या
हातावर तुरी देऊन
गेले नेते!
षडयंत्री क्रीमिलेयरला
केराची टोपली
“जय सेवालाल”चा मुखी
गजर नकली
“वसंतराव “महानायकाची
ऍलर्जी सगळी
काढून खपली,जखमेवर चोळून मीठ
गेले नेते!
आरक्षण घुसखोरीला
वाटाण्याच्या अक्षता
घुसखोराचं नावं नाही,
एस.आय.टी.चं कुठं गांव नाही,
मतापरते गोरमाटीला
भाव नाही.
संमोहित शब्दाशब्दांत सांगून
गेले नेते!
लाडक्या बहिणीची ओवाळणी
बहिणींचाच पैसा
ऐतखाऊ भाऊ
बहिणीच्याच ओवाळणीत
कमिशन खाऊ
लेकाची परीक्षा फी
बहिणीची मरमर
हमालीच्या नाक्यावर
भाच्याचा वावर
गांजर ओवाळणीचं देऊन
गेले नेते!
हरियाणा कर्नाटक कथा
मतांच्या जोगव्यासाठी
तिसऱ्या सूचीचा जादुई विसर
गोरबोली भाषा दर्जा वाऱ्यावर
साऱ्यांचा डोळा,
तांड्याच्या निर्णायक मतावर
चावून ओठ,दावून अंगठा
गेले नेते !
गोरधाटी अस्मिता ‘नंगारा ‘
मानवतेचा डंका विश्वात सारा
डोळ्याचे पारणें फेडणारा
लोकार्पण सोहळा प्यारा
पण,
तांड्याच्या वाट्याला धत्तूरा
टाकुनी फासे, साधून डाव
गेले नेते!
अद्यापिही पूर्ण -अपूर्ण
विरसात -ए -बणजारा ‘नंगारा ‘
असत्य आश्वासने मोहरला पोहरा
तांड्या तांड्यात एकच नारा
‘झाला नंगारा, चला घरा,
ठगांचा बंदोबस्त करा,
माणसं हेरा, संविधान पेरा ‘
आंधळी कोशिंबीर खेळ सारा
सावज हेरून,टिकली मारून
गेले नेते!
एन. पी. चव्हाण,
मंगरुळपीर जि. वाशिम
संपर्क -7350377882