पांडुरंगाच्या भक्तिरसात चिंब भिजलेला अभंग संग्रह – “आस तुझी रे लागली”
बारवाड, ता निपाणी जि बेळगाव कर्नाटक येथील मराठी भाषिक कवी रंगराव बन्ने , यांचा “आस तुझी रे लागली” हा पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तिरसात चिंब भिजलेला अभंग संग्रह नुकताच वाचनात आला. विविध अभंगातून त्यांनी भगवंताच्या प्रती आपली भक्ती व्यक्त केली आहे. “आस तुझी रे लागली” या अभंग कलाकृतीचे मुखपृष्ठ अतिशय सुबक आणि अर्थपूर्ण असून या मुखपृष्ठाला एक वैश्विक अर्थ प्राप्त झाला आहे. मानवी जीवनाचा व्यापक अर्थ या मुखपृष्ठावरून आपल्याला दिसून येतो. आज आपण या मुखपृष्ठावरील संदर्भाचा मानवी जीवनाशी कसा संबंध जोडला गेला याचा अभ्यास करणार आहोत.
“आस तुझी रे लागली” या अभंग संग्रहाच्या मुखपृष्ठावर गगनाला भिडणारी पांडुरंगाची उंच मूर्ती दाखवली आहे, या पांडुरंगाच्या भेटीसाठी वैष्णवांचा मेळावा रस्त्याने जातांना दाखवला आहे तर एक वयोवृद्ध म्हातारा काठी टेकवत, पाठीवर गाठोडे, कापडाने गुंडाळलेली पाण्याची बाटली पाठीवर घेऊन या मेळाव्याच्या मागे पांडुरंगाच्या भेटीसाठी जात आहे असे दाखवले आहे. यातून मानवी जीवनाचा व्यापक अर्थ मला दिसून आला आहे.
“आस तुझी रे लागली” या अभंग संग्रहाच्या मुखपृष्ठावर गगनाला भिडणारी पांडुरंगाची उंच मूर्ती दाखवली आहे यातून असा अर्थ निघतो की, मानवी जीवनात अनेक अडचणी आहेत, विश्वाच्या पसाऱ्यात सुखदुःखाला सोबत घेऊन या अडचणींवर मात करत मनुष्य आपले जीवन जगत असतो. एक ना एक दिवस आपल्याला या मानवी देहाला सोडून जायचे आहे. ज्या विधात्याने निर्मिती केली त्या विधात्याचरणी जायचे आहे. विधाता सर्वोच्य आहे , त्याच्या नंतर कोणी नाही आणि त्याचे स्थान उंच आहे. आयुष्य जगता जगता एक दिवस मोक्षाचा कळस गाठता आला पाहिजे हा कळस म्हणजे पांडुरंगाची उंच दाखवलेली मूर्ती आहे.
मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कष्ट करीत असतो, सुखाची झोप मिळावी म्हणून अहोरात्र प्रयत्न करीत असतो , या जगण्यात कधी कधी त्याला त्याला असे वाटते की, आपण कशासाठी जगतो, टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस धावाधाव करतो आणि शेवटी हाती काय राहते? प्रपंच्यात मुलांसाठी धावावे असा विचार करून जगलो तर मुले मोठी झाल्यावर आपली साथ सोडून देतात, भावांसाठी धावावे तर भाऊ लग्नानंतर विभक्त होतात, आईवडिलांसाठी धावाधाव करावी तर तेही सोडून जातात, हा सृष्टीचा नियमच आहे, मग ज्याच्यासाठी धावायचे आहे तोच जर सोबत नसेल तर मग कुणासाठी धावावे त्यापेक्षा ज्या विधात्याने निर्माण केले त्याच्या चरणी माथा ठेवून आपले गाऱ्हाणे सांगावे म्हणून मनुष्य आल्या जन्माच्या वेदना, दु:ख कुणाजवळ तरी मांडावे आणि मन हलके करावे यासाठी पांडुरंगाच्या भेटीला जातो. रोजच्या रामरगाड्यात त्या पांडुरंगाची आठवण येत नाही मात्र दरवर्षी या वारीच्या निमित्ताने त्याची आठवण येते म्हणून हा वैष्णवांचा मेळावा पांडुरंगाला भेटायला जात असतो आणि म्हणूनच “आस तुझी रे लागली” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर पांडुरंगाच्या भेटीसाठी वैष्णवांचा मेळावा रस्त्याने जातांना दाखवला आहे.
आईच्या उदरातून जन्म घेतला की, मनुष्याच्या जगण्याची लढाई चालू होते, ही लढाई एकट्यालाच लढावी लागते. जन्मापासून मृत्यूपर्यंतची जी वाट आहे ती एकट्यालाच चालावी लागते. सोबत कोणी येत नसते. आयुष्यभर केलेले कष्ट , आलेले अनुभव , सोसलेल्या वेदना, दुःख, यांची शिदोरी करून ती पाठीशी ठेवावी लागते, म्हातारपणात ही शिदोरी सोबत घेऊन ती पांडुरंगाच्या चरणी सोडून द्यावी लागते, आयुष्यभर केलेल्या कामाचा ताळेबंद, पापपुण्ण्याचा जमाखर्च पांडुरंगाच्या हवाली करावा लागतो म्हणूनच “आस तुझी रे लागली” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर हा लेखाजोखा घेऊन एक वयोवृद्ध म्हातारा म्हातारपणाचा आधार म्हणून काठी टेकवत, पाठीवर आयुष्यभर केलेल्या कामाचा ताळेबंद, पापपुण्ण्याचा जमाखर्च गाठोड्यात घेऊन, विठ्ठल भक्तीची तहान भागाविण्यासाठी कापडाने गुंडाळलेली पाण्याची बाटली पाठीवर घेऊन पांडुरंगाच्या भेटीला चालला आहे अस अर्थ यातून मला जाणवला आहे.
“आस तुझी रे लागली” या अभंग संग्रहात एकूण ७२ अभंग, आणि कविता आहेत. यातील ध्यास पंढरीचा, वारी आषाढीची, विठ्ठल माझा, विठ्ठला दर्शन दे, तुझ्या भक्तीत जीव रंगला, आलो शरण तुला मी, पांडुरंग माझा, देवा तुझ्या दरबारी , या आणि अशा या संग्रहातील सर्वच कविता आणि अभंग भक्ती मार्गावर घेऊन जाणाऱ्या आहेत. कवी रंगराव बन्ने यांनी ही कलाकृती विठ्ठलरुख्मिणी वारकरी संप्रदाय मंडळ बारवाड , कार्तिक वारी पायी दिंडी सोहळा पंढरपूर यांच्या हस्ते प्रकःस्न करून जी माऊली अशिक्षित असून जीने हाडाची काडं करून कवीवर सुसंस्कार केले ती आई कै. सत्तुबाई विरुपाक्ष बन्ने यांना अर्पण केली आहे. यातून कवीच्या मनातील आईच्या प्रती असलेला कृतज्ञता भाव दिसून येतो.
“आस तुझी रे लागली” या अभंगसंग्रहाचे प्रकाशन औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथील ताई पब्लिकेशनचे प्रकाशक चंपालाल दुर्बे यांनी केले असून बारवाड, कर्नाटक येथील प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार संजय कोने यांनी या मुखपृष्ठाला आपल्या कल्पकतेने सजवून वैश्विक अर्थ प्राप्त करून एक वेगळी ओळख करून दिली आहे. हा अभंग संग्रह वारकरी भक्तांना वाचनीय असा असून पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या वारक-यांनी संग्रही ठेवावा असा संग्रह आहे. कवी रंगराव बन्ने यांना पुढील दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा..!
परीक्षण- प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृतीचा परीचय :
कलाकृतीचे नाव- आस तुझी रे लागली
साहित्य प्रकार – अभंगसंग्रह
कवी – रंगराव विरुपाक्ष बन्ने, निपाणी
कवीचा संपर्क क्र. ९८८०६३५८७२
प्रकाशन – ताई पब्लिकेशन, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
मुखपृष्ठचित्रकार – संजय कोने, बारवाड, कर्नाटक