विकसित भारत संकल्प यात्रेची अंमलबजावणी प्रभावी माध्यमातून करा- प्र. जिल्हाधिकारी सुरज वाघमारे
गौरव प्रकाशन अमरावती, (प्रतिनिधी) : दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. भारत शासनाच्या फ्लॅगशीप योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय साधून विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावी माध्यमातून करावी, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे श्री. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नवी दिल्ली भारत सरकार वित्त मंत्रालयाचे उपसचिव आदित्य भोजगढिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपजिल्हाधिकारी राम लंके, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे तसेच विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.