माझे सिनेमा प्रेम…
आमच्या लहानपणात चित्रपट पाहणे सुद्धा वाईटच मानल्या जायचं. फक्त धार्मिक चित्रपट ह्याला अपवाद . ‘ संत सखू ’, ‘ सखू आली पंढरपुरा ’ इत्यादी चित्रपट पाहण्यासाठी खेड्यापाड्यातील लोकांची झुंबड उडायची. शिक्षक आणि थोडे शिकलेले लोक ‘ कुंकू ’ सारखे सामाजिक चित्रपट बघायचे. तसेही खेड्यातल्या लोकांना सिनेमा केवळ यात्रेच्या निमित्तानेच पाहायला मिळायचा. मी केंव्हातरी कौंडण्यपूरच्या यात्रेत ‘ गौरी ’ पाहिल्याचं आठवते. ‘ मोर बोले, चकोर बोले , आज राधाकी नयनोंमें शाम डोले ’ हे त्यातलं प्रसिद्ध गाणं अजून एखादया वेळी रेडिओवर वाजतं. मला थोडाफार कळलेला आणि आवडलेला सुद्धा पहिला सिनेमा म्हणजे ‘ हा माझा मार्ग एकला ’ एकोणीसशे चौसष्ट पासष्ट साली कधीतरी धुळीत गोणपाटावर बसून पाहिला. त्यापूर्वीही असेच धुळीत बसून काही मुके सिनेमे पाहिले होते. तेव्हा ग्रामीण भागातून ‘ विकास ’चे सिनेमे दाखविले जायचे. शासनाच्या विकास योजनांच्या डॉक्युमेंटरीज असायच्या त्या. फिल्ड पब्लिसिटी किंवा प्रसिद्धी खात्यामार्फत दाखवल्या जायच्या. अचानक रात्री आठ साडेआठच्या दरम्यान गावात जीपगाडी यायची. मग कॉम्रेड भुरे गावात भोंगा फिरवायचा म्हणजे दवंडी द्यायचा. जुन्या सतरंज्या, गोणपाट वगैरे घेऊन लोक गर्दी करत. पडद्याजवळ आणि सरळ बाजूने जागा मिळावी यासाठी ही सारी धडपड. हो पडद्याच्या दुसऱ्या बाजूने बसल्यास दृष्य आरशातल्यासारखे उलटे दिसायचे. तरीही दोन्ही बाजूने तुडूंब गर्दी असायची. ‘ शेजारी ’, ‘ तांबडी माती ’, ‘ एक माती अनेक नाती ’ इत्यादी सिनेमे त्या काळात खाली धुळीत बसून पाहिले. सिनेमा या दृष्य माध्यमाचचं मला कधीच आकर्षण नव्हतं. अजूनही नाही. वर्षभर नागपुरात राहूनही मी केवळ तीन सिनेमे पाहिले होते. एक ‘ मौसम ’ लिबर्टी मध्ये पाहिला आणि ‘ शामची आई ’ व ‘ दो आंखे बारा हाथ ’ होस्टेलमध्ये. तेव्हा नुकताच ‘ शोले ‘ लागला होता पण मी नाही पाहिला. अमरावतीला आल्यावर मात्र मित्रांच्या आग्रहाखातर मी सिनेमाला जाऊ लागलो. पण सिनेमाचा शौक काही मला परवडणारा नव्हता. विदर्भ महाविद्यालय ते जयस्तंभ सिटीबसची तिकीट पंधरा पैसे होती पण तेवढेही जड वाटायचे म्हणून पायीच जायचो. अमरावतीला मी पाहिला सिनेमा पंचाहत्तर पैसे तिकिटात पाहिला. थर्डक्लासमध्ये राजकमल टाकीजवर. माझ्या एका कवितेत –
“ थर्डक्लासमध्ये पिक्चर पाहतांना आसपास हमाल असतात ,
बाल्कनीत वळून बघता आवडणारे माल असतात !
समोरचा माणूस सफरचंद खातो तेंव्हा तिचे गाल आठवतात !
मी दहा पैशाचे फुटाणे खातो तेंव्हा घरचे हाल आठवतात. !
अशा ओळी आहेत. ह्या ओळी मला त्याकाळातच सुचल्या. अलंकार थियेटर आमचे फेव्हरेट. तिथे ‘ ए ‘ प्रमाणपत्र असलेले इंग्रजी, मल्याळम, तामिळ सिनेमे लागायचे. चुकून कुणी हटकलेच तर इंग्रजी सुधारण्यासाठी, तामिळ, मल्याळम भाषा शिकण्यासाठी हे सिनेमे बघतो असली कारणं सांगायचो. ह्याच थियेटरमध्ये डॉ. काठोळे आणि मी आचार्य रजनीशांच्या जीवनावर आधारित ‘ भोग सम्राट ‘ हे वादग्रस्त अश्लील नाटक पाहिले. नागपूरला ह्या नाटकाचा कडक पोलीस बंदोबस्तात प्रयोग झाला होता मात्र अमरावतीत काहीही घडले नाही. उलट काही महिला देखील प्रयोग पाहायला आल्या होत्या. तर असे हे ‘ पंचशील – अलंकार ’ जुळे थियेटर. मला एकेकाळी लीना चंदावरकर ही नटी आवडत असे. कधीतरी अनपेक्षित ‘ आर्ट फिल्म ’ ची ओळख झाली नि मग झपाटल्यासारखे शाम बेनेगलांचे सारेचे सारे सिनेमे पाहून टाकले. त्यातील सामाजिक आशय मनाला भिडणारा होता. कलाकार लोकप्रिय नव्हते पण ताकदीचे होते. अमरीश पुरी, कुलभूषण खरवंदा, साधू मेहेर, फारुक शेख, दीप्ती नवल ही काही महत्वाची नावं. आणि नसरुद्दिन शहा, स्मिता पाटील, शबाना आझमी ही दिग्गज मंडळी. अशी आलटून पालटून टीम असायची. हंसा वाडेकर यांच्या ‘ सांगते ऐका ’ ह्या आत्मचरित्रावर बेनेगलांनी एकोणविसशे सत्त्याहत्तर साली ‘ भूमिका ’ हा अप्रतिम सिनेमा काढला. तो पाहिल्यावर मी स्मिता पाटीलच्या प्रेमातच पडलो. तिचे ‘ आक्रोश ’, ‘ मंथन ’, ‘ चक्र ’, ‘ मंडी ’ असे त्यावेळचे सारे सिनेमे पाहून टाकले. नंतरचे ‘ अर्थ ’, ‘ उंबरठा ’, ‘ सर्वसाक्षी ’ सुद्धा. स्मिताचा एक सुंदर अभिनय असलेला ‘ रावण ‘ हा सिनेमा होता. अनेकांना हे नावही ठाऊक नसेल. कुणी फारशी दखलही घेतली नाही त्याची पण रस्त्यावर खेळ करुन पोट भरणाऱ्या जमातीची कथा त्यात मांडली आहे. सागर सरहद्दीचा ‘ बाजार ’ अमरावतीच्या शाम टाकीज मध्ये लागला होता एकोणविसशे ब्यांशीची गोष्ट असेल. शेवटचा शो बघायचा होता. सुनील यावलीकर यावलीवरुन तीस किलोमीटर अंतर सायकलने पार करुन होस्टेलला आला. मग आम्ही डबलसीट जाऊन ‘ बाजार ’ पाहिला. नंतर स्मिता आणि नसिरुद्दीनच्या अभिनयावर खूप दिवस बोलत राहिलो. अलीकडे ‘ जोगवा ’ ‘ झेंडा ’, ‘ बालगंधर्व ’ असे काही सिनेमे पाहिले पण समांतर चित्रपटाची मजा यात नाही. माझे हमखास झोप लागण्याचे ठिकाण म्हणजे थियेटर. सिनेमा बोअर असल्याचा किंवा मी अरसिक असल्याचा एवढा भक्कम पुरावा दुसरीकडे कुठे मिळणार ?
– अशोक विष्णुपंत थोरात
(‘माझ्या खिडकीतून’ दै. सकाळ नागपूर वरून साभार)