“मी कोरा कागद केवळ…” विनम्रतेचा अविष्कार
नाशिकचे प्रसिद्ध कवी, लेखक तथा गझलकार मा संजय गोरडे यांच्या प्रकाशित झालेल्या “मी कोरा कागद केवळ…” या कलाकृतीचे मुखपृष्ठ नुकतेच पाहण्यात आले. अतिशय साधे असलेले मुखपृष्ठ त्यावर चोवीस आडव्या रेषा आणि त्या रेषांच्या आत अस्पष्ट चोवीस रेषा असून त्यावर “मी कोरा कागद केवळ…” हे शीर्षक. त्यातील “मी” हा शब्द थोडासा ओघळता लिहला असून कोरा कागद केवळ… हे तीन शब्द एकाखाली एक लिहले असून केवळ या शब्दाच्या नंतर (…) असे तीन टिंब दिलेले आहे. तसेच या मुखपृष्ठावर ज्या रेषा आहेत, या रेषांच्या आत एका चिंताग्रस्त व्यक्तीचे चित्र रेखाटले आहे. व्यक्तीच्या गळ्यात कॉलर असलेले स्वेटर आहे. गालावर हात ठेवून ही व्यक्ती काहीतरी विचार करत बसली आहे,, एका बाजूला गडद रंगछटा आहे तर दुसऱ्या बाजूने रेषा मुखपृष्ठाच्या बाहेर एका रेषेत तोडलेल्या आहेत आणि खाली “संजय गोरडे” असे लाल अक्षरात लिहले आहे. यावरून या मुखपृष्ठाचा नेमका अर्थ काय? हे मुखपृष्ठ आपल्याला काय सूचित करीत आहे याचा अभ्यास करणे गरजेचे वाटले.
का कुणास ठाऊक , पण या मुखपृष्ठातून एका सुशिक्षित, नोकरदार, समजूतदार तितकाच संवेदनशील व्यक्तिमत्वाचे यातून दर्शन होते. प्रातिनिधिक स्वरुपाची ही व्यक्ती जरी मुखपृष्ठावर रेखाटली असली तरी स्वतः कवी संजय गोरडे यांच्या भावजीवनाशी, त्यांच्या व्यक्तिमत्वाशी या मुखपृष्ठाचा अर्थ लागू शकतो इतकं अर्थपूर्ण हे मुखपृष्ठ रेखाटले आहे. या मुखपृष्ठाला मुखपृष्ठचित्रकाराने अतिशय कल्पकतेने आणि विचारपूर्वक तयार केलेले आहे. प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार संतोष घोंगडे यांच्या कल्पकतेला हजारदा सलाम करावा इतक्या कौतुकास ते पात्र आहेत. एखाद्या कलाकृतीच्या अंतरंगात काय दडलय त्यावरून मुखपृष्ठ रेखाटणे आणि त्या मुखपृष्ठाला साहित्यिकाच्या जीवनाशी संबंध जोडणे ही कला मुखपृष्ठचित्रकाराच्या चित्राला एक वेगळे स्थान मिळवून देत असते. त्या मुखपृष्ठात जीव ओतल्याशिवाय त्याला जिवंतपणा येत नाही आणि हा जिवंतपणा आणण्याचं काम मुखपृष्ठचित्रकार संतोष घोंगडे यांनी केले आहे.
या मुखपृष्ठावरील आधी शीर्षकाचा आपण आभ्यास करू… “मी कोरा कागद केवळ…” या नऊ शब्दाचा विचार केला तर असे लक्षात येते की, कवी संजय गोरडे हे अत्यंत प्रामाणिक दिसून येतात , कारण स्वतःला केवळ एक कोरा कागद समजणे हे कवीच्या प्रामाणिकपणाचे लक्षण आहे. आपण स्वतः काय आहोत हे जगाने न्याहाळण्यापेक्षा स्वतःच प्रामाणिकपणे कबूल करून आपल्या उणेपणाची कोणी चेष्टा करून नये म्हणून आधीच आपण क्षुल्लक, साधारण माणूस आहोत हे कबूल करणे म्हणजे प्रामाणिकपणा. प्रत्येकाला कोणता ना कोणत्या गोष्टीचा गर्व होत असतो, सत्ता, संपत्ती, सौंदर्य या तीन “स”अक्षरांचा गर्व असतो, हा गर्व म्हणजे अहंपणा.. आणि हा अहंपणा कवी संजय गोरडे यांना झालेला आहे म्हणून त्यांनी हा अहंपणा ‘मी” या शब्दाला विशिष्ठ अक्षरढाच्यात घेऊन तो अधिरेखीत केला आहे. कवी संजय गोरडे यांना गर्व कशाचा झाला आहे ? हा प्रश्न आता आपल्या डोळ्यासमोर फिरला असेल. तर कवी संजय गोरडे यांना “केवळ कोरा कागद” असल्याचा गर्व झालेला आहे. कुठेही तडजोड नाही, कुठेही आक्रस्ताळेपणा नाही… अगदी सरळ सरळ स्वतःला साधारण व्यक्ती समजणे या गोष्टीचा गर्व झाला आहे म्हणून “मी” हा शब्द असा वेगळ्या ढाच्यात ओढला आहे..
जगाच्या पसाऱ्यात पावलोगणिक विद्वत्ता ठासून भरलेली असल्याचे आपल्याला दिसून येते. प्रत्येकाच्या अंगी काही ना काही गुण भरलेले असतात.. जो तो आपापल्या गुणांनी पारंगत असतो.. जरी एखादा अल्पशिक्षित असला तरी त्याच्या अंगी इतर कलागुणकौशल्य भरलेले असते आणि त्या कलागुंणाचा कौशल्याने वापर करून तो समाजात आपले वेगळेपण जपत असतो. कवी संजय गोरडे हे देखील जगाच्या पसाऱ्यात एक कलागुण जोपासणारे व्यक्तिमत्व असूनही ते स्वतः अजून कमीच आहे.. या जगाच्या पसाऱ्यात आपण अजून काहीच नाही असे समजतात.. इतरांचे कलागुणकौशल्य पाहून कवी गोरडे त्यांच्यापुढे आपली पाटी अजून कोरीच आहे असे मानतात. आणि हे खरेच आहे.
जगात आपल्यापेक्षा हुशार, सर्वगुण संपन्न शेकडोने आहेत त्यामुळे “मी हा आहे, मी असा आहे, मी तसा आहे” असा फुकाचा गर्व न करता मी अजून कोराच आहे अशी प्रांजळ कबुली ते देतात म्हणूनच मुखपृष्ठावरील शीर्षकात “कोरा” हा शब्द या अर्थाने गुंफला असावा असे मला भावले आहे.
आपल्या अवतीभोतीच्या निसर्गदत्त वातावरणात प्रत्येक वस्तूला एक अर्थ आहे. त्याचा त्या अर्थाने वापरही केला जातो, मात्र काही वस्तू अशा असतात की, त्यांची किमत त्याला कळत नाही त्यामुळे इतरही त्याला त्याची किमत कळू देत नाहीत. हिंदी कवी जफरुद्दीन जफर एका शेरात म्हणतात की, “इतना भी बे-उसूल न बनिए, गुलमोहर हो बबूल न बनिए !” जफरूद्दीन जफर यांच्या शेराचा अर्थ असा की “माणसांन इतकंही बेकार, निरुपयोगी राहू नये, निरर्थक जीवन जगू नये..की स्वतः गुलमोहर आहे हे माहिती असूनही, बाभूळ समजून राहू नये”.. मात्र कवी संजय गोरडे हे ते स्वतः उत्तम गझलकार, कवी, लेखक असूनही हे स्वतः कितीही मोठे झाले तरी ते स्वतःला एक कागदाचा तुकडा समजतात. आपल्या गुणवत्तेचा गवगवा करत फिरत नाहीत. त्यांच्यातील हा गुण अधोरेखित करण्यासारख्या आहे. समाजाच्या आपण कितीही पुढे पुढे करा पण आपल्याकडून कधीकाळी थोडी जरा जरी कसूर राहिली तरी समाज आपल्याला आपली औकात दाखवून द्यायला तयार असतात अशा वेळी समाजाने आपल्याला कसपट समजण्याआधी आपण नमते घेऊन समाजात राहिलो तर आपली औकात निघत नाही. म्हणून कवी संजय गोरडे हे स्वतःला कमी लेखतात.. कोऱ्या कागदाचा तुकडा समजतात. म्हणूनच की काय त्यांच्या शीर्षकात “कागद” हा शब्द वापरून जगाच्या पुढे आपण केवळ एक कागदाचा तुकडा आहोत. आपली लोकांनी सर्वात किमती व्यक्ती म्हणून जगात गणना करण्यासारखा अजून तरी आपण इतका मोठा नाही हा प्रामाणिकपणा यातून दाखवला आहे. हे विश्व खूप मोठे आहे, अणुरेणु प्रमाणे या विश्वाच्या पसाऱ्यात माणसाची गिणती होत असते. उंच आकाशातून जर खाली जमिनीवर पाहिले तर माणूस अगदी अणुरेणुपेक्षा क्षुल्लक दिसतो. यापेक्षा जगात त्याला स्थान नाही म्हणून त्यांनी केवळ हा शब्द वापर करून जगाच्या पसाऱ्यात आपली किमत काय आहे हे या शब्दातून दाखवून दिले आहे. कलाकृतीच्या मुखपृष्ठावरून प्रत्येकाने समाजात वावरतांना आपण नम्रतापूर्वक वागले पाहिजे, हा मोलाचा संदेश यातून दिला आहे असे मला जाणवले.
या मुखपृष्ठाचे आणिक एक वैशिष्ट्य म्हणजे “मी कोरा कागद केवळ” या शब्दाला (…) असे तीन टिंब जोडून आले आहे. याचा देखील एक अर्थ आहे. शीर्षकाला (…) तीनच टिंब का दिले असावे? हा प्रश्न आधी माझ्या मनात आला. याचा बारकाईने विचार केला तर मला असे जाणवले की, समाजात माणसाने वागताना “सहनशील, कार्यशीलता, आणि नम्रता” असे तीन गुण अंगी असले पाहिजे. सहनशीलता तुम्हाला प्रगतीच्या पथावर घेऊन जाते.. कार्यशीलता माणसाच्या कार्यकर्तुत्वाच्या आलेख उंचावतात तर नम्रता तुमच्या चारित्र्याचे पावित्र्य जपते हा महत्वाचा संदेश या तीन टिंबांतून मला जाणवला.
या मुखपृष्ठाला अजून बारकाईने बघितले तर यातून कवीच्या स्वभावाचा आणि त्यांच्या देहबोलीचा अंदाज येतो. या मुखपृष्ठावर आडव्या गडद रंगाच्या २४ रेषा आणि त्यांच्या आत प्रत्येकी एक अशा चोवीस , म्हणजेच एकूण अठ्ठेचाळिस (४८) रेषा दाखावल्या आहेत.. या रेषा कवीने त्याच्या जन्मापासून आयुष्यातील किती वर्ष जीवनसंघर्ष केला तेव्हढ्या वयाच्या रेषांचा दाखला देतात. हा माझा अंदाज कदाचित चुकूही शकतो, मात्र केवळ कोरा कागद हा फक्त रेषा मारलेला कागदाचा तुकडा नसून कवी संजय गोरडे यांनी उभ्या आयुष्याची जी वर्ष खर्च केलेली आहेत त्या खर्च झालेल्या वर्षाचा पुरावा म्हणून त्यावर अठ्ठेचाळिस रेषा उमटल्या गेल्या असाव्यात. संजय गोरडे यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत बिकट परिस्थितील दिवस काटकसरीने, वैचारिक भूमिका घेऊन भोगले आहे. आज ते जुने दिवस आठवले की ते अस्वस्थ होतात, आणि मग कधी कधी गालावर हात ठेवून चिंता व्यक्त करत बसतात.. काय होईल भविष्यात या नव्या पिढीचे.. आपण जे दिवस भोगले ते आपल्या पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये. त्यासाठी काहीतरी तजवीज करावी? कशी करावी? या विचारात कवी मुखपृष्ठावर प्रतिकात्मक दिसून येतात. हे चित्र जरी प्रातिनिधिक स्वरूपाचे असले तर ते जे जे या परिस्थितीतून गेले त्यांना लागू होते,.. मुखपृष्ठचित्रकार एखादे चित्र व्यक्तीला समोर धरून कोणतेही चित्र काढतो, तेव्हा त्यात त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याला हवे असलेले संदर्भ नकळत त्या चित्रात उमटत असतात… कवी संजय गोरडे यांनी या चित्राला म्हणूनच आपल्या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर साकारले आहे. यात जरी तार्किकता असली तरी मानवी मनाचा अभ्यास करणारे मानसशास्र भरलेले आहे आणि त्यातूनच या मुखपृष्ठाला वाचू शकतो..
कवी संजय गोरडे यांच्या या कलाकृतीचे प्रकाशन ठाण्यातील अग्रगण्य संस्था अष्टगंध प्रकाशन यांनी केलेले असून मुंबईचे श्री मुद्रण यांनी मुद्रित केले आहे तर आकर्षक व अर्थपूर्ण मुखपृष्ठ मुखपृष्ठचित्रकार संतोष घोंगडे यांनी सजवले आहे. कवी संजय गोरडे यांना या निमित्ताने भविष्यातील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा
तूर्तास इतकेच
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)