माणुसकीचा ओलावा कमी झाला.!
बदल, आपण बरेचदा बोलुन जातो की अमका फार बदलला, तमका फार बदलला, अमका लग्नानंतर फार बदलला, माणसा माणसा मधे काळानुसार, त्या त्या वेळेनुसार बदल घडुन येतात, ऋतु बदलतात तशी काही माणसं पण बदलतात, त्यांचे स्वभाव बदलतात, गाव बदलतात, शहर बदलतात, जग बदलत चाललंय, मी बदललो असेन, तुम्ही बदलला असाल. काळानुसार लाईफ स्टाईल बदलत चाललीय. संडास ते शौचालय ते टॉयलेट ते वॉशरूम असा हा शब्दरूपी बदल अन् मोरी ते बाथरूम हा शब्दरूपी बदल नकळत घडून आला. पूर्वी मोरी वेगळी असायची अन् संडास वेगळे असायचे, आता दोघांना एकत्रित करून ते washroom झाले, केवढा हा बदल. हल्ली “संडास” शब्द उच्चारायला माणसं कचरतात, तो रांगडा शब्द वाटतो, त्या ऐवजी टॉयलेट / वॉशरूम हे सभ्य शब्द वाटतात म्हणुन त्यांची चलती जास्त आहे.
शहरीकरण झाल्यानंतरचे एकंदरीत बदल आधुनिक सुख सोयी तर देतात पण एकंदरीत वाट पण लावून जातात असच म्हणावं लागेल कारण माणुसकीचा ओलावा कमी झाला, निसर्गाची वाट लागली / लावली, सुख सोयी जेवढ्या जास्त तेवढे श्रम कमी तेवढी स्वास्थ्य हानी जास्त.
नाश्ता, आजचा प्रचलित शब्द, भारतात कानाकोपऱ्यात वापरात येणारा शब्द, हा पठ्ठ्या आहे पारसी पण कधी भारतात येऊन मिसळला ते कळलंच नाही. लहानपणी न्याहरी हा शब्द माहीत होता, त्या न्याहरीचा “नाश्ता” किंवा गोऱ्यांचा “ब्रेकफास्ट” हा बदल कधी झाला ते कळलच नाही. आज खेडेगावात पण न्याहरी ऐवजी “नाश्ता” च संबोधले जाते. आता नाश्त्या भोवती घुटमळत असल्याने त्यावर थोड खोलात जायलाच हवं. न्याहरी म्हणुन मी शिळी ज्वारीची भाकरी, ठेचा / चटणी पुड, मेतकूट ह्याचे दह्यातील मिश्रण, त्यावर थोड तेल, कांदा ह्यालाच प्राधान्य देईन. सकाळचा नाश्ता म्हणुन चपाती भाजीचा स्वाद लहानपणापासून ते २०१४ पर्यंत घेतला, मग का कोणास ठाऊक त्याला बगल दिली गेली, आता कधी कधी अस वाटत की त्याला बगल का दिली म्हणुन, हा बदल काही योग्य नव्हे अस आता मला वाटू लागलंय, पण त्याला काही कारण होती. काही बदल गरजेनुसार, सोयीनुसार करायचे असतात, त्यातलाच हा बदल. आता रोजचा नाश्ता म्हणजे मऊ पोहे तर कधी लावलेले पोहे, कधी उप्पीट / उपमा तर कधी इडली, कधी पोळ्यांचा कुस्करा तर कधी फोडणीचा भात( दोन्ही आदल्या दिवशीच उरलं असल्यास), काहीच नाही सुचलं तर दलिया. पण ह्या बदलाचा कधी कधी कंटाळा येतो. वर गृहिणींना प्रश्न पडतो की आज नाश्त्याला काय करायचे? घरोघरी हाच प्रश्न गृहिणींना भेडसावत असणार.
एकंदरीत जीवन शैली बदलली, त्याचे दुष्परिणाम सर्वश्रुत आहेत. बरेचदा काही बदल पचनी नाही पडत, त्यास अंगीकृत करायला वेळ लागतो. कुठलेही चांगले बदल, सामाजिक बदल हे स्वागतार्ह आहे. काळानुसार बदला पण माणुसकी जिवंत ठेवा, माणुसकीचा, भावनांचा ओलावा कमी होणार नाही ह्याची काळजी घ्या, त्यात बदल मुळीच नको. बदल सुधारणेसाठी हवा, पण प्रगतीच्या नावाखाली अधोगती होता कामा नये जे आज दुर्दैवाने आढळून येते. काळानुसार शैक्षणिक बदल हवा, पण त्याचे बाजारीकरण निषेधार्थ, देशाच्या उन्नतीसाठी आर्थिक बदल गरजेचे, पण समाजातील आर्थिक विषमता वाईट, सामाजिक बदल आवश्यक, पण सामाजिक विषमता वाईट.
– सुरेश कौलगी