मानवी जीवन…
“व्यक्ती तितक्या प्रकृती” सर्वांचे गुणधर्म वेगळे, स्वभाव वेगळे, जसे निसर्गात उमललेल्या प्रत्येक फुलांचा रंग, गंध वेगवेगळा असतो पण प्रत्येक आपापल्या वेगळ्या रंगरुपाने गंधाने आपले अस्तित्व टिकवून असते. सर्वच जर गुलाब असते तर प्रकृतीत उमलणाऱ्या प्रत्येक फुलांचा वेगळा गुणधर्म आपल्याला कळला नसता; तेव्हा गुलाबच सुंदर आणि रानात उगवणारी रानफुले ही सुंदर नसतात, किंवा त्यात काहीही चांगला गुणधर्म नसते असे नाही, फक्त त्यांच्यातील सुप्त गुणधर्मांना समजून घेण्याची आपल्याकडे मानसिक दुष्टी हवी.
जसे नानाविध रंगाची गंधाची फुले आहे तशीच सृष्टीवर नानाविध स्वभावाची, स्वरूपाची माणसे सुद्धा आहेत. जेवढे गुण तेवढे दोष असे गुणदोषांचे समीकरण म्हणजे मानवी जीवन आणि त्यांच्यातील विविधांगी स्वरूपानुसार बनलेला स्वभाव; स्वभावानुसार जगण्याचे विशिष्ट गुणदोष प्रत्येक व्यक्तीत असते, परिपूर्ण असा कुणीच नसतो! आपल्याच हाताची पाच बोटे सारखी नसतात तिथे माणसे कशी काय सारखी असणार.. आपण नेहमी दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवितो तेव्हा चार बोट आपल्याकडे बघून हसत असतात. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ आपल्याला बरोबर दिसते; पण आपल्या डोळ्यातील मुसळ आपल्याला दिसत नाही, ही स्वभावाची एक कुमकुवत बाजू आहे. म्हणून कदाचित आपल्याला आपल्यातील दोष दिसत नाही. दुसऱ्यांना नावे ठेवतांना आपण पहिल्या रांगेत उभे असतो; पण समजून घेतांना मात्र शेवटच्या रांगेत उभे असतो आणि स्वतःला हुशार समजतांना अहंम पणाच्या कळसावर उभे असतो!
एका घरात राहून एकदुसऱ्यांमध्ये वैचारिक मतभेद होतात आणि प्रत्येकाला वाटतं मीच योग्य याच कारणाने घरात रुसवे फुगवे होतात. त्यामुळे आपलीच माणसे आपल्यापासून दुरावतात पण आपला मीपणा बाजूला ठेवून कधी नमतं घेतलं, समोरचा काय म्हणतो ते ऐकून घेतलं तर, वैचारिक पातळीवर विचारविनिमय करून मतभेद मिटविता येतात. आनंदावर, सुखावर विरजण टाकणारा मीपणा कायम दूर ठेवला की, खऱ्या जगण्याच्या आनंदाला भरभरून लुटता येतं. प्रत्येकच आपापल्या परी योग्य असतो. फक्त समोरच्याला समजून घेण्याची बुध्दिमत्ता आपल्या स्वभावात असायला हवी.
विचार केला तर परिपूर्ण असा कुणीच नसतो, गुणदोष प्रत्येकात असतात, त्याच्या गुणांवर प्रेम केले की, होणाऱ्या वैचारिक मतभेदांचा मानसिक त्रास अर्धाअधिक कमी होऊन संसार सुखाचा होईल. जे आहे ते स्विकारता यावे! सौजन्याने वागता यावे! जीवनाकडे बघतांना आनंदाला वेचता यावे! माणूस म्हणून माणसाशी माणसासम वागता यावे! प्रत्येकातील दोष सोडून गुणावरती प्रेम करता यावे! हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या अंतर्मनात डोकावून आत्मपरीक्षण करू, मानवी स्वभावातील विविध प्रकारची कमतरता स्वतःमध्ये शोधून बदल करण्याचा प्रयत्न करू, आणि दुसऱ्यांना समजून घेऊ..
खरे तर हेवेदेवें, मत्सर, उनीदुणी हे माणसाला जडलेले स्वभावातील सर्वात मोठे व्यसन आहे. म्हणून व्यसनाधीन होण्यापेक्षा यापासून स्वतःला दूर ठेऊन बघा.. स्वतःचेच पारदर्शी नितळ मनाचे प्रतिबिंब पाण्यात बघतांनाही हेलकावणार नाही. ते स्थिर आणि शांत असेल! विचारात सकारात्मकता निर्माण होईल दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, आणि आपले सकारात्मक विचार माणूस म्हणून माणसाशी ओळख निर्माण करून देईल!
माणूस हा कधीही वाईट नसतो वाईट असते त्याची परिस्थती अवतीभोवतीचे वातावरण त्याला घडविणारा समाज त्याला लोकांकडून येणारे वाईट अनुभव आणि त्यानुसार त्याच्या जगण्याचे निकष तयार होतात.
एखाद्या झाडाच्या बुंध्याशी तण वाढले तर त्याची वाढ खुंटते. तेव्हा त्याला खुरपणाची गरज असते. तेव्हाच ते नवीन पालवी फुटून बहरते. अंगोपांगी हिरव्या फांद्यांचा साज लेवून मोठ्या दिमाखात वाऱ्याच्या मंद झुळके बरोबर आनंदानी डोलत असते; तसेच मानवाचे पण असते, जेव्हा कुविचारांचे तण त्यांच्या अवतीभोवती वाढते, तेव्हा त्याला चांगल्या विचारांच्या खुरपणाची गरज असते! त्याच्या खुंटलेल्या विचारांना नवीन दिशा देण्यासाठी, त्याच्या बुद्धीच्या अवतीभोवती जे विकार वाढतात त्याची मशागत केल्याशिवाय मनाचे उकार आकार घेत नाही. वेळीच योग्य विचारांची फवारणी झाली तर, मनाला लागलेल्या किडीने कुरतडलेल्या विचारांची पाने नव्याने हिरवीगार करण्यासाठी त्यांच्याकडे प्रथम माणूस म्हणून बघा! कुणामध्ये बदल घडवायचा असेल तर प्रथम आपला दृष्टिकोन आणि समजून घेण्याची दृष्टी बदला..
स्वभाव गुणधर्म, प्रत्येकाची वैचारिक पातळी, सुसंस्कारा चा अभाव, अयोग्य मार्गदर्शन, हे सर्व कुठे ना कुठे समाजकडूनच व्यक्ती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अनुभवत असतो. आणि त्याचप्रमाणे घडत असतो. माणसाच्या जडण घडणीचा मुख्य प्रवाह म्हणजे समाज. आणि या समाजातील जगण्याच्या प्रकृतीनुसार होणारे मानवी मनाचे जडणघडन म्हणून जीवनप्रवाहात परिपूर्णता कधीच नसते! बदल घडायला वेळ लागतो. जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशादर्शक मिळाले की, स्वभावात असलेले अनावश्यक तणकट हळूहळू कमी होते. “योग्य विचारांची पेरणी, सदृढ पिकाची हमी” याप्रमाणे एक योग्य माणूस बनण्यास प्रेमाने साधलेला सवांद आणि प्रेमानेच सांगितलेले दोष उपयोगी ठरते. म्हणूनच दोष वगळून गुणांवर प्रेम केलेकी, जगता येईल, जगवता येईल आणि आपलीच सामाजिक, सांसारिक वाटचाल सुखाची आणि समाधानकारक आनंदाची होईल..
संस्काराची वाट /आनंदाची लाट
जगण्याचा थाट/ विवेकात//
नैतिकते घरी / सात्विक आगर
विचारांचा गर/ हृदयी नांदे//
प्रेमाचा आगर/ फुलावा अंतरी
मानवता उरी/ नांदो सदा//
पालथी घागर/ द्वेष, मत्सराची
पारख गुणांची/ नयनात//
ऐसे हे जीवन/ जगावे सुंदर
सद्गुण घर/ विचारात//
-सौ निशा खापरे
नागपूर