बाप मात्र सगळीकडेच उपेक्षित राहिला तरीही तो ‘आभाळमाया’ झाला.!
वडिलांच्या अनेक गोष्टींचा राग यायचा. आता ‘त्या’च गोष्टी मी अगदी तितक्याच सहजतेने करतो! मग त्या काळातल्या संतापाची आठवण झाली की अपराधीपणाची भावना दाटून येते. आईच्या मायेचे गोडवे आयुष्यभर गायलेत मात्र वडिलांच्या मायेचे काय झाले? याचे उत्तर आता अलगद गवसते आहे.
जन्मभर आईची माया तिच्या कुशीत शिरून अनुभवलेली पण बाप मात्र घाबरूनच अनुभवलेला. धाक, दरारा, दडपण यात बाप विरत गेलेला आणि मी ही त्याच प्रतिमेत गुरफटत गेलेलो. खरं तर, आता कळतं की वडिलांची माया देखील आईसारखीच स्नेहार्द्र होती, त्यातही कोमलता होती पण पाकळ्यात अडकलेला भुंगा जसा कोषात गुरफटून जातो तसं वडिलांचं झालेलं असतं.
गरजांच्या चौकटीत त्यांना कुटुंबव्यवस्थेनं असं काही चिणलंय की त्यांची दुसरी तसबीरच समोर येत नाही. गरजा पूर्ण करणारा निष्ठूर माणूस असं काहीसं भकास चित्र उभं राहतं. कुटुंबासाठी जगत असताना त्यांच्या स्वतःच्या गरजा नसतील काय.? किती म्हणून विचारावं की त्यांच्या मनाचा कोंडमारा झाला नसेल का.?
टाचेपाशी रुतणारी चुके ठोकलेली, अंगठ्यापाशी शिवलेली चप्पल घालण्याऐवजी वर्षाआड नवी चप्पल घेता येत नव्हती का.? कॉलरवर विरलेले बाहीपाशी झिरलेले शर्ट, आल्टर केलेली पँट घालताना कमीपणा वाटला नसेल का.?
आपण करतो तशा पार्ट्या करण्याचा मोह झाला नसेल का..? आवडत्या नटाचा सिनेमा लागल्यावर आठवड्याला मॅटिनीला जाणं त्यांना शक्य नव्हतं का.? नेहमी ड्रेस सर्कलचं तिकीट काढून घामेजलेल्या खुर्च्यांत ते उबून गेले नसतील का.? त्यांनाही वाटलं असेलच की एकदा तरी बाल्कनीचा थंड वारा अनुभवावा.!
तलम शर्टावर रुळणारी एखादी सोन्याची चेन घालण्याचा मोह झाला नसेल का त्यांना..? किती तरी वर्षे सायकल चालवून मग मोपेडवर स्वार होताना स्कुटर, बाईक, कार यांची स्वप्ने पडली नसतील का.?
कधीच व्यक्त न होणाऱ्या पत्नीसाठी त्यांना रोज गजरा आणावासा वाटला नसेल का..? मनातलं ओठावर जिथं आणता येत नव्हतं, खुराड्यांच्या खोल्यात राहावं लागत होतं तिथं त्यांना नेमाने शेज सजवावी वाटली नसेल का.?
आपणही एकदा तरी विमानात बसावं असं दिवा स्वप्नं तरी त्यांनी पाहिलं नसेल का.?
आईने लपवून ठेवलेले, कसेबसे जमा केलेले बचतीचे पैसे घेताना त्यांना अपराधी वाटलं नसेल का.? महिना अखेरीस फडताळातले रिकामे डबे पाहून त्यांचं काळीज भरून येत नसेल का.? आठवड्यातुन एक दिवस सुट्टी घेतल्यावर आऊटींगला जावं, अरबट चरबट खावं, मस्तपैकी भटकंती करावी असं वाटलं नसेल का.? आईला साडी घेताना ते सारखे सारखे किंमतीच्या लेबल्स कडे का बरं पाहत असावेत..? पोराबाळांना शिकवणी लावताना, शाळेची फी भरताना घायकुतीला येत नसतील का.?
झिरलेला खिसा रिकामाच असूनही, “तू पैशाची चिंता करू नकोस तुझा बाप खंबीर आहे”* असं म्हणताना त्यांना कुठलं बळ येत असावं.? कुटुंबासाठी खस्ता खाताना तीळतीळ झिजताना त्यांच्या भावनांचा कधी कडेलोट झाला नसेल का.?
काय झालं असेल त्यांच्या स्वप्नांचं?, इच्छांचं?, भावनांचं.? आपण सगळ्यांनी मिळून त्यांना दफन केलं तरी ते हसत हसत जगत राहिले, ऊनवाऱ्यात पावसात ते छत्र बनून गेले मात्र त्यांच्याच डोक्यावर छत्र नव्हतं याचा विचारच केला नाही.
आता ते नाहीत आणि आई ही नाही. आता त्यांच्या भूमिकेत मी आहे पण त्यांच्या इतका उत्तुंग उदात्त होऊ शकेन की नाही हे अजून उमगलं नाही, एक मात्र कळलं की आई जन्मभर काळजाचा ठाव बनून राहते मरणानंतर बापच काळीज होऊन जातो, अंतःकरण सोलून काढणारी एक अनोखी सल बनून राहतो…
त्यांच्या हयातीतल्या अगदी साध्या साध्या गोष्टीही राहून गेल्या, ते थकून आले की पाय, पाठ तुडवायला लावायचे तेंव्हा जाम कंटाळा यायचा..आता राहून राहून ते आठवतं. त्यांना मिठी मारायची राहून गेली, खूपच भीत राहिलो त्यांना.!
आयुष्यभर कष्ट करून घट्टे पडलेले त्यांचे खरबरीत हात गालाशी लावून घ्यायचे राहिले, मनात साचलेलं आभाळ त्यांच्यापाशी रितं करायचंही राहून गेलं..
आईला मिठी मारणारी मुलं बापाला का मिठी मारत नसावीत.? या प्रश्नाने त्यांना किती छळलं असेल याची कल्पना करवत नाही.ते पैलतीरावर नजर लावून होते तेंव्हा मृत्यूच्या दारावरही त्यांनी कष्टाचं तोरण बांधलं असेल.!
आईवर महाकाव्ये लिहिली गेली आणि बाप मात्र सगळीकडेच उपेक्षित राहिला तरीही तो ‘आभाळमाया’ झाला.! भरून आलेल्या मेघातून तो डोकावून पाहत असतो आपल्या घरात.! आपलं सुख पाहून त्याला भरून येतं. त्याचे डोळे पाणावतात.. खिडकीतून येणारे पावसाचे थेंब म्हणूनच का खारट असतात ?
बाप होणं सोपं आहे, बापपण निभावणं हे खूप खूप कठीण आहे. खूप खूप कठीण आहे…!
– समीर गायकवाड
——-
संकलन ‘RPL. प्रशांत
ReplyForward |