वर्षानुवर्ष एकच टॉवेल वापरताय काय ?
एक टॉवेल जास्तीत जास्त किती दिवस वापरलेला चांगला?
आपण सगळेच सकाळी उठल्यावर दात घासणे, आंघोळ करणे या क्रिया करतो. काही जण तर संध्याकाळी ऑफीसमधून किंवा बाहेरुन घरी आल्यावरही पुन्हा आंघोळ करतात. आंघोळ झाली की अंग पुसण्यासाठी आपण टॉवेल वापरतो. हे टॉवेल टर्किस, कॉटन, पंचा अशा विविध कापडाचे, आकाराचे आणि रंगांचे असतात. लहान मुलांसाठी नेहमीपेक्षा थोडे सॉफ्ट टॉवेल वापरले जातात तर काही जण आवर्जून जास्त खरखरीत असणारे टॉवेल वापरतात. काही जण रोजच्या रोज हा टॉवेल धुवायला टाकतात तर काही जण २ ते ३ दिवस वापरुन टॉवेल धुतात हॉस्टेलमध्ये राहणारी किंवा बॅचलर मंडळी तर ८ दिवस एकच टॉवेल वाळवून पुन्हा पुन्हा वापरतात.
आरोग्याच्या दृष्टीने हे फारसे चांगले नसते कारण त्यामुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. टॉवेल धुणे आणि मग वापरणे ही एक बाब झाली पण काही जण टॉवेल चांगला टिकला म्हणून वर्षानुवर्षे एकच टॉवेल वापरत राहतात. पण अशाप्रकारे अनेक वर्ष एकच टॉवेल वापरल्याने आरोग्यावर त्याचे काय परीणाम होतात आणि १ टॉवेल किती काळ वापरावा याविषयी
* टॉवेल आणि त्वचेचा एकमेकांशी कसा संबंध असतो? : आपल्या प्रत्येकाच्या त्वचेच्या पृष्ठभागावर बॅक्टेरीया, विषाणू आणि बुरशीजन्य घटक असतात. हे सर्व घटक अतिशय लहान आकारात असतात आणि ते असणे अगदी सामान्य असते. त्वचेचे मायक्रोबायोम तयार करुन हे रोगजंतूंपासून त्वचेचे संरक्षण करण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे हे घटक त्वचेवरुन घासून काढण्याची आवश्यकता नसते, आपल्या त्वचेच्या पेशी आणि त्यावरील ओलावा हे सूक्ष्मजंतूंसाठी अन्न असतात, या दोन्हीमुळे सूक्ष्मजंतुंची वाढ होते. त्यामुळे टॉवेल ओलसर किंवा खूप जुना असेल तर त्वचेवरील सूक्ष्मजंतूंची वाढ होण्याची शक्यता असते.
* टॉवेल किती दिवसांनी बदलावा? : एक टॉवेल तितका लवकर खराब होत नाही तरीही टॉवेल ६ ते ८ महिन्यांनी बदलायला हवा, जास्तीत जास्त १ टॉवेल वर्षभर वापलेला ठिक आहे. पण त्यापेक्षा जास्त टॉवेल वापरु नये. अनेकदा टॉवेल धुतल्यानंतरही त्यातील काही मळ, घाण कापडात अडकून राहण्याची शक्यता असते हल्ली आपण सगळेच मशीनमध्ये कपडे धुतो त्यामध्ये कपडे तितके स्वच्छ निघण्याची शक्यता नसते. त्यामुळे एकदा वापरायला काढलेला टॉवेल खूप जास्त दिवस वापरत राहू नये. तसेच टॉवेल शक्यतो कडक उन्हात वाळवावा म्हणजे त्यावर काही सूक्ष्मजंतू असतील तर ते उन्हामुळे मरण्याची शक्यता असते.