शेतकऱ्यांचे गाडगेबाबा…
संत गाडगेबाबानी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत प्रचंड योगदान दिले आहे.त्यांची सामाजिक क्रांती अनुयायांनी खराट्यात बंदिस्त केली. त्यामुळे त्यांनी दिलेली सामाजिक क्रांतीची हाक ऐकण्यात महाराष्ट्र अपयशी ठरला.त्यांच्या आंदोलनास वेगवेगळे क्रांतिकारी पदर आहेत. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातील महाभयानक अन् तितक्याच क्रूर टोळ्यांना त्यांनी आपल्या प्रखर वाणी अन् कृतीतून उध्वस्त केले. संत गाडगेबाबांनी ज्या वर्गासाठी लढाई उभी केली तो वर्ग इथला कृषक अर्थात शेतकरी वर्गच होता. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगात शेतकऱ्यांविषयी जो कळवळा होता तोच कळवळा संत गाडगेबाबांच्या मांडणीत दिसून येतो. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले आंदोलन हे शेतकऱ्यांच्या शोषण मुक्तीचे आंदोलन होते.शेतकरी शहाणा व्हावा, तो धार्मिक अन् आर्थिक शोषकांच्या तावडीत सापडू नये यासाठीच संत गाडगेबाबांनी जीवाचे रान केले. ज्या काळात त्यांनी हे काम उभे केले तो काळ शेतकऱ्यांच्या शोषणाचा काळ होता.एकीकडे सर्वसामान्य शेतकरी सावकारांच्या मगरमिठीत सापडला होता तर दुसरीकडे तो आध्यात्मिक क्षेत्रातील लुटारुंच्या टोळक्यांचे भक्ष्य बनला होता.
डेबू ते संत गाडगेबाबा या प्रवासात प्रामुख्याने शेतीचेच प्रश्नावर काम झाल्याचे आपल्याला दिसून येते. शेतकऱ्यांना आर्थिक,धार्मिक व मानसिक शोषणातून बाहेर काढण्यासाठीची ही लढाई तब्बल 51 वर्षे या महाराष्ट्रात सुरू होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रबोधित करून सामाजिक व आर्थिक क्षेत्रात प्रतिष्ठा प्रदान करण्यासाठीची ही लढाई होती. संत गाडगेबाबांच्या या लढाईचे नाते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या लढाईसोबत अगदी जवळचे आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्या प्रश्नांची चिकित्सा करून शेतकऱ्यांना नवजीवन देण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नासोबत नाते सांगणारी ही लढाई आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा हे केवळ संत ठरत नाही तर शेतकऱ्यांचे प्रबोधन पीठ ठरतात.
डेबूचे बालपण अत्यंत कठीण अवस्थेत गेले. देवधर्म ,नवसायास , कर्मकांड यात गुंतलेले वडील.त्यातून आलेली व्यसनाधीनता यामुळे वडिलांची संपत्ती सावकाराने हडप केली . शेती व घर सावकाराच्या घशात गेले .सावकारशाहीने डेबूचे अख्खे कुटुंब उध्वस्त झाले होते. पुढील काळात शोषणाचा हाच क्रम डेबूचे मामा चंद्रभान यांच्या वाट्याला आला. त्या काळातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन सावकारांनी प्रचंड जमिनी हडप केल्या होत्या. याचा फटका डेबूचे वडील आणि मामा यांना बसला होता . त्यामुळे या सावकारशाही डेबू चे मनात प्रचंड संताप निर्माण झाला होता. शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी जी लढाई उभी केली त्या लढाईत गाडगेबाबांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्याला दिसतात. मुर्तीजापुर तालुक्यातील दापूरा येथील मामाच्या घरी राहायला आल्यानंतर सुरुवातीच्या काळात डेबूने मामाची गुरे राखली.
माणूस गोड नसतो तर माणसाचं काम गोड असते हा संस्कार आई सखुबाईने डेबूचे मनावर केला होता. डेबू कामाला वाघ होता.शेती व्यवस्थेत गुरे ढोरे हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. या गुराढोरांवर त्याने जीवापाड प्रेम केले. डेबूचे मनात प्रचंड झरे होते करुणेचे. गावामध्ये रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये ठोकर लागून बैल पडू नये म्हणून अगदी बालपणी त्याने गावातील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली होती.गुराखी म्हणून काम करतांना डेबू नव्या क्रांतीची वाट चोखाळत होता. विविध जातीच्या गुराखी मित्रांच्या मनातील जात ,धर्म व रूढी परंपरा यांना धक्का देत होता . शेतकऱ्यांचं शोषण का होते हे सांगत होता.
वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी डेबूचा मामाच्या शेतीत शेतकरी म्हणून प्रवेश झाला. शेती मातीवर आणि जनावरावर काळजागत प्रेम करणाऱ्या डेबूचा शेतकरी म्हणून सुरू झालेला हा प्रवास पुढे शेतकऱ्यांच्या शोषणमुक्तीसाठी लढणारा आंदोलक इथपर्यंत जाऊन पोहोचला. तो शेतीत प्रचंड राबला. नांगरणी, वखरणीचे कसब त्याने प्राप्त केले. बैलांवर प्रचंड प्रेम असल्यामुळे बैलाची योग्य अशी काळजी घ्यायचा. बैलांना ऊन लागू नये म्हणून सूर्योदयापूर्वीच शेतात जाऊन नांगरणी, वखरणीची कामे तो करायचा . त्याच्या मुळे शेत नवचैतन्यात न्हावून निघायचे. एका रेषेत पेरणी करून पीक कसे उगवायचे हे साऱ्या परिसराला डेबू आपल्या कसबातून दाखवून द्यायचा. पावसाचा अंदाज घेऊन पेरणी केली तरच पीक हातात येते हे नियोजन डेबूकडे होते. “मढे झाकुनी करिती पेरणी” हा संत तुकाराम महाराजांचा संदेश त्याच्या मेंदूत कोरला गेलेला होता .
शेतीत घामाचे थेंब जिरवून आदर्श शेतकरी म्हणून डेबू ची ख्याती गावभर झाली. मात्र मामाचे भोळेपण आड आले. शेतीमध्ये अपार कष्ट उपसणाऱ्या डेबूच्या मामाची 56 एकर जमीन सावकाराने हडप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र डेबू मधील क्रांतिकारकत्व जागे झाले . शेताचा कब्जा घ्यायला आलेल्या तिडके सावकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मामाच्या शेतातून डेबूने पळवून लावले. पुढे सावकार शेतकऱ्यांना का लुटतो याची कारणमिमांसा करण्याचे त्याने ठरवले. सन १९०५ ला अवतीभवतीचा शेतकऱ्यांचे शोषण पाहून अस्वस्थ झालेल्या डेबूने गृहत्याग केला . पुढील आयुष्य शेतकऱ्यांच्या शोषण मुक्तीसाठी व्यतीत करायचे ही निश्चय केला . 1905 ते 1956 पर्यंत तब्बल 51 वर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रबोधित करण्याचं काम संत गाडगेबाबा यांनी केलं.
डेबू ते संत गाडगेबाबा हा प्रवास विलक्षण काटेरी आहे. “बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणूनी कळवळा येत असे ” ही करुणा या प्रवासात अग्रभागी होती. डेबूचा संत गाडगेबाबा झाल्यानंतर त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नावर परखड भाष्य केले. कुठलीही सांस्कृतिक पार्श्वभूमी नसणाऱ्या एका वंचित कुटुंबात जन्म झालेला डेबू पुढे आपल्या स्वयंप्रतिभेच्या बळावर महाराष्ट्राला प्रबोधित करतो ही बाब मुळातच क्रांतिकारी आहे. कीर्तनाचा वारसा नसलेल्या घरातून पुढे येऊन त्यांनी लोकांचे प्रश्न समजून घेतले आणि या प्रश्नांची योग्य अशी उत्तरे शेतकऱ्यांना दिली.
सर्वत्र अज्ञानाचा काळोख दाटून आलेला होता. त्यावेळी वऱ्हाडचा साक्षरता रेट 5.4% होता. अशा कठीण काळात त्यांनी शेतकरी वर्गाला प्रबोधनाची एक नवी दिशा देण्याचे क्रांतिकारी कार्य केलेले आहे. संत गाडगेबाबांना या दिशेने समजून घेणे गरजेचे आहे. मात्र महाराष्ट्राने संत गाडगेबाबांचे क्रांतिकारकत्व अजूनही स्वीकारल्याचे दिसत नाही. संत गाडगेबाबा केवळ गाव झाडत होते या फ्रेममध्ये आपण त्यांना बांधून ठेवल्यामुळे त्यांनी उभी केलेली लढाई ही शेतकऱ्यांच्या हिताची लढाई होती हे अजून पर्यंत लक्षात आलेले नाही. त्यांनी केलेला गृहत्याग यामागे शेती हडप करणारी सावकारशाहीच कारणीभूत होती. संत गाडगेबाबांच्या निर्वाणानंतर इतकी वर्ष उलटून गेली तरी अजूनही गाव खेड्यातील शेतकरी सावकाराच्या तावडीतून सुटल्याचे दिसत नाही. ढोपरापासून सोलून काढण्याचे निर्णय राजकीय पातळीवर घेतल्या गेले असतीलही परंतु आजही अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या ताब्यात आहेत.सावकारी पाशातून अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत.आजची ही विदारक परिस्थिती लक्षात घेता त्या काळात संत गाडगेबाबांनी उभे केलेले काम किती लाख मोलाचे होते हे आपल्या लक्षात येईल.
1 फेब्रुवारी 1905 ला गृहत्याग केल्यानंतर त्यांनी तब्बल बारा वर्ष समाजातील प्रश्न समजून घेतले . इथला शेतकरी वर्ग गरीब का आहे ? तो भटजीच्या जाळ्यामध्ये का अडकला आहे? दगड धोंड्याच्या नादी लागून तो तीर्थयात्रेमध्ये पैशाचा चुराडा का करतो ? रोगराई हे अस्वच्छतेचे मूळ आहे या ऐवजी तो कुठल्यातरी देवीचा प्रकोप आहे असा समज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा का झाला असावा ? तो शिक्षणापासून दूर का आहे? शिक्षण नाही म्हणूनच शेतकरी वर्गाचे शोषण होत आहे का? या साऱ्या प्रश्नांची त्यांनी या बारा वर्षाच्या स्टडी टूर मध्ये चिकित्सा केली आणि पुढल्या काळात यावरच त्यांनी प्रबोधन केले. त्यांचे हे काम पुढे येणे गरजेचे आहे.
संत गाडगेबाबा हे कायम प्रसिद्धीपासून दूर राहत आलेले आहे. त्यांचे चरित्र 1952 मध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले. त्यापूर्वी काही वृत्तपतत्रातील कात्रण आणि छायाचित्र संत गाडगेबाबांनी जाळून टाकले. मात्र प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या चरित्रातून एक ताकदीचा विज्ञानवादी तसेच शेतकऱ्यांना जागवणारा प्रबोधनकार म्हणून संत गाडगेबाबा आपले पुढे येतात. 8 नोव्हेंबर 1956 ला बांद्रा पोलीस स्टेशन परिसरात संत गाडगेबाबा यांचे कीर्तन झाले . या कीर्तनातून त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताची मांडणी आहे. सुदैवाने हे कीर्तन कुमार सेन समर्थ यांच्या मुळे ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. एक प्रचंड मोठा वैचारिक साठा या कीर्तनाच्या रूपाने महाराष्ट्राला लाभलेला आहे. कदाचित ते कीर्तन जर ध्वनिमुद्रित झाले नसते तर ईतक्या ताकदीच्या मांडणीला हा महाराष्ट्र मुकला असता. एक स्पष्ट अशी वैचारिक भूमिका घेऊन केलेल्या या कीर्तनात शेतकऱ्यांविषयी प्रचंड कळवळा असल्याचे आपल्याला दिसून येते .
या कीर्तनातून शेतकरी वर्गाने शिकले पाहिजे , काटकसर करून आर्थिक नियोजन केले पाहिजे ही मांडणी त्यांनी केली आहे. देवळात देव शोधण्यापेक्षा तो दरिद्रीनारायणात शोधा हा जो विचार संत गाडगेबाबांनी दिला त्यातील दरिद्री नारायण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून शेतकरीच आहे. मामाची शेती कसत असताना ऐन तारुण्यात त्यांनी प्रस्थापित जमीनदाराविरुद्ध संघर्ष उभा केला होता तर प्रबोधनाच्या काळात शेतकऱ्यांना लुटणाऱ्या धार्मिक लुटारूंच्या टोळ्या आपल्या वाणीने उध्वस्त केल्यात. 8 नोव्हेंबर 1956 चे कीर्तन जर काळजीपूर्वक वाचले तर आपल्या असे लक्षात येईल की या कीर्तनात ज्या प्रश्नांची त्यांनी चर्चा केलेली आहे ते सारेच्या सारे प्रश्न शेतीमातीशी निगडित असलेल्या वर्गाशी संबंधित आहे. मग तो शेतकरी असो अथवा शेतमजूर . इथला शेतकरी वर्ग अडाणी आहे, ज्ञानापासून दूर आहे.
धार्मिक यंत्रणेने शिकावं कोणी याचे नियोजन केलेले आहे .त्याचा फटका इथल्या शूद्र अर्थातच शेतकरी वर्गाला बसलेला आहे हे त्यांनी ओळखले होते. ” तुम्ही आम्ही गरीब का आहोत तर तुम्हा आम्हाला विद्या नाही” हे सूत्र त्यांनी मांडले . “विद्येविना मती गेली” हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेला विचार संत गाडगेबाबांनी “जेवणाचे ताट मोडा पण लेकराले शाळेत धाडा ” या पद्धतीने पुढे नेला . शेती ही कायम कर्जातच मरायला भाग पाडते हे भान त्यांना होते आणि म्हणूनच मुर्तीजापुरातील कीर्तन संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या पोरांनी शेतीबाबत त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांनी शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग जोपर्यंत उभे होणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश येणार नाही अशा पद्धतीची स्पष्ट मांडणी केली होती. शेतकऱ्यांच्या मुलाचे कारखाने का तयार होत नाही, शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे आणि त्यासाठीचे शिक्षणासोबतच आर्थिक नियोजनाचे भान शेतकरी वर्गामध्ये येणे गरजेचे आहे अशा प्रकारची मांडणी त्यांनी सातत्याने केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना अद्यावत ज्ञान मिळावे म्हणून पंढरपुरात शेतकी प्रशिक्षण शाळेचा प्रयोगही त्यांनी केलेला होता.
मुंबईत मोठाल्या इमारती कोणाच्या आहे? बंबईत रोज तुपाचा शिरा कोण खातो? तुम्ही मात्र आयुष्यभर झोपडीत राहता , वरण आमटी वर आयुष्य काढता या मागची कारणे शोधली पाहिजे ही मार्क्सवादी मांडणी त्यांनी त्या काळात केली. म्हणून आचार्य अत्रे एका लेखात म्हणाले होते की, संत गाडगेबाबानी 50 वर्ष या महाराष्ट्राला मार्क्सवादाची शिकवण देण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ ठरतात . प्रबोधनकार ठाकरे सुद्धा त्यांचा गौरव समाजवादी सत्यशोधक म्हणून करायचे .गरीब श्रीमंतीच्या, आर्थिक विषमतेच्या या दुष्टचक्रात फसल्या गेलेला शेतकरी त्यातून बाहेर यावा , त्याचे आर्थिक जीवन अधिक उन्नत व्हावं म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहे. शिक्षणामुळेच समाजामध्ये बदल होऊ शकतो . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंध जीवनामध्ये जो बदल झाला त्याला शिक्षणच कारणीभूत ठरलेले आहे. म्हणून आयुष्यभर दारिद्र्यात राहावयाचे नसेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि ते शिक्षण घेण्यासाठी शेतकरी वर्गाने पुढे आले पाहिजे.
शिक्षणाच्या संदर्भात ही मांडणीच करून ते थांबले नाहीत तर गावोगाव त्यांनी शाळा ,आश्रमशाळा उभ्या केल्यात. पंढरपुरात उभी केलेली चोखामेळा धर्मशाळा 14 जुलै 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे त्यांनी हस्तांतरित करीत करून या धर्मशाळातून पुढे अस्पृश्यांची मुलं शिकली पाहिजे हे स्वप्न बघितले होते . एवढेच नव्हे तर शेतकऱ्याची पोर शिकली पाहिजे म्हणून काम करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या शिवाजी शिक्षण संस्थेला सढळ हाताने मदत करण्याचं काम त्यांनी केलं. पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल, रयत शिक्षण संस्था अथवा शिवाजी शिक्षण संस्था असेल या साऱ्या संस्था शेतकऱ्यांच्या लेकरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करत आहेत याची जाणीव शाळेत न गेलेल्या संत गाडगेबाबा नावाच्या अक्षरतपस्वी संताला होती. म्हणूनच त्यांनी या संस्थांना मदत करण्याचं काम केलं .
रयत शिक्षण संस्थेची ग्रॅण्ट मुंबई राज्य सरकारने बंद केल्यानंतर मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना विनंती करून त्यांनी ही ग्रँट नव्याने सुरू केली होती . शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजेत ही भावना , तळमळ यामागे होती. त्यांनी शेतकरी वर्गाचे केलेले प्रबोधन हे अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये होते. शेतकऱ्यांसोबत त्यांचा एक सहजसुलभ संवाद कीर्तनाच्या माध्यमातून होत होता . काटकसर करा , दशक्रिया साध्या वरण भाकरीवर करा . तेरव्या ,लग्न , जत्रा, नवस, ज्योतिष्य आदी रूढी परंपरा यातून बाहेर पडा. जास्त खर्च करू नका . तीर्थात देव नसतो तर केवळ पैशाची धूळधाण असते ही मांडणी करीत असताना संत कबीराचा “जत्रा मे फत्रा बिठाया तीरथ बनाया पाणी” हा विचार त्यांनी शेतकऱ्यांच्या गळी उतरवला. तीर्थयात्रा या ज्ञानयात्रा झाल्या पाहिजे आणि त्यासाठीच मग त्यांनी तीर्थयात्रेत जाऊन प्रबोधन केले. कर्ज काढून सण साजरे करू नका. कर्ज काढून तीर्थयात्रा करू नका हा जो विचार आहे या विचारामागे शेतकऱ्यांच्या हिताची व्यापक अशी दृष्टी आपणास दिसून येते.
शेतीमातीशी संबंधित असलेल्या प्रत्येक घटकावर त्यांचे प्रचंड प्रेम होते . याचाच एक भाग म्हणून त्यांनी पशुहत्या बंदीचे एक व्यापक आंदोलन या महाराष्ट्र मध्ये उभे केले. वेगवेगळ्या यात्रांमध्ये दिल्या जाणारे पशुबळी थांबावे म्हणून अनेकदा त्यांनी जीव धोक्यात घातलेला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे हजारो जनावरांचे प्राण वाचले. यज्ञ संस्कृती नाकारून पशू पक्ष्याना अभय देणारी ही करुणा आहे . याची बीजं बालपणातच त्यांच्यामध्ये रुजलेली होती . मामाच्या घरचा म्हातारा बैल विकायच्या वेळी त्यांनी आजोबाला प्रश्न केला की बैल म्हातारा झाला म्हणून विकायचा तर माणसं म्हातारी झाल्यावर का विकत नाही. हा जो प्रश्न त्यांनी लहानपणी विचारला त्यातच त्यांच्या भविष्यातील आंदोलनाची बीजं आपल्याला दिसतात . त्यांनी केवळ पशुहत्याच थांबवल्या नाहीत तर त्यांनी गावोगावचे जे शंकरपट आहे ज्यामध्ये बैलांची शर्यत लावल्या जाते ते बंद केले. पुराणीने बैलांना रक्तबंबाळ केल्या जाते हे दृश्य बघून त्यांनी सगळेच्या सगळे शंकर पट बंद करण्याचा मुलगामी प्रयत्न केलेला आहे.
बैल हेच जगातले खरे साधु संत आहेत ही मांडणी करणारा हा महानायक शेतीमातीशी संबंधित असलेल्या घटकांची सुद्धा या पद्धतीने काळजी घेत होता. जनावरांसाठी पाणपोया निर्माण करीत असताना गोरक्षणाची एक प्रचंड मोठी चळवळ त्यांनी या महाराष्ट्रात उभी केली. गाय शेतीला बैल देते आणि बैल असल्यामुळेच शेती व्यवस्था टिकून आहे. त्यामुळेच त्यांनी गावोगाव गोरक्षण उभी केलीत. आजचे भोंदू गोभक्त आणि संत गाडगेबाबांची गोरक्षणाबाबतची भूमिका यामध्ये प्रचंड तफावत आहे. शेती व्यवस्था टिकली पाहिजे म्हणून उभी केलेली गोरक्षण ही क्रांतिकारी चळवळ होती. शेतकरी वर्ग आर्थिक धोरणात कमकुवत आहे याचे भान त्यांना होते. लग्ना सारख्या परंपरांवर अधिक खर्च करण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग त्यांनी सांगितला. स्वतः च्या दोन मुली अन् एक मुलगा यांचे विवाह अत्यंत कमी खर्चात
केले. या लग्नात जनावरांच्या चाऱ्याची त्यांनी सोय कली. 1952 ला पंढरपूरच्या धर्मशाळेत सर्व धर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे केलेले आयोजन हा त्याचाच एक भाग आहे. लग्नासारख्या परंपरांवर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून शेतकरी वर्ग रसातळाला जातो आहे त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी 1952 सालात घेतलेली भूमिका किती योग्य होती ते आजच्या स्थितीवरून आपल्या लक्षात येईल.
संत गाडगेबाबांची वाणी पांडित्यपूर्ण नव्हती. बोली भाषेमध्येच ते लोकांशी सहज आणि तितक्याच कठोरपणे संवाद साधत होते. अमोघ असं वक्तृत्व त्यांच्याकडे होतं. त्यांच्या वक्तृत्वात पुराणातील कपोलकल्पित भामटेपणा नव्हता. संस्कृतचे शब्दप्रयोग अजिबात नव्हते. ज्ञानोबा, तुकोबाच्या ओव्या होत्या. कबीराचे दोहे होते. त्यांच्या कीर्तनामध्ये इहलोकीच्या शोषणाची कारण होती. जटेतून गंगा निघाली . माणसाचा जन्म तोंडातून होतो, बाहूतून होतो, मांड्यातून होतो, पायातून होतो अशा फालतू गोष्टीचा समावेश त्यांच्या वाणीत नसायचा .म्हणूनच प्र.के.अत्रे यांनी “जनतेची भाषा बोलणारा असा प्रभावी वक्ता या महाराष्ट्रात दुसरा नाही ” या पद्धतीने संत गाडगेबाबांची वर्णन करायचे. आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या बळावर संत गाडगेबाबानी इथल्या शेतकरी वर्गाला ज्ञानाची एक नवी प्रज्ञा वाट उपलब्ध करून दिली.पंढरपूरला जाऊन ही विठोबाचं दर्शन न घेणारा हा संत विज्ञानवादी ,चिकित्सक तथा डोळस होता. तुमच्या माझ्या शोषणाची बीजं कशात आहे याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण त्यांनी केलं.
शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या मुलांसाठी ईबीसी सवलत सुरू व्हावी म्हणून तत्कालीन शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई यांना विनंती करणाऱ्या या आधुनिक तुकारामामध्ये केवळ आणि केवळ शेतकऱ्यांचे हित व्हावे हा अंतरीचा कळवळा होता.संत गाडगेबाबा हे महाराष्ट्राच्या वारकरी आणि सत्यशोधक चळवळीचे खरे वारसदार होते .त्यांना त्या पद्धतीने समजून घेणे गरजेचे आहे. वारकरी चळवळीतील बहुतांश संतांनी वंचित घटकाची बाजू घेतली आहे. सत्यशोधक चळवळ चळवळ सुद्धा शेतकरी शोषणाविरुद्ध पेटून उठली होती .वारकरी आणि सत्यशोधक चळवळीचे पुढचे ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे संत गाडगेबाबा होय. शेतकरी लुटला जाऊ नये.तो विज्ञाननिष्ठ व्हावा, म्हणजे बुवा, बापू महाराज आणि सावकार त्याला लुटणार नाही. या अत्यंत कळवळ्यापोटी मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा महानायक लढत होता. शेतकऱ्यांच्या शोषणमुक्तीचे प्रबोधन पीठ म्हणजे संत गाडगेबाबा होय. संत गाडगेबाबा यांना खराट्यातून बाहेर काढून शेतकऱ्यांच्या डोक्यात नेवून ठेवले तरच त्यांच्या विचारांची खरी उपासना शेतकरी वर्ग करायला लागेल.
– संतोष अरसोड,
नेर ,जिल्हा यवतमाळ
9623191923