अक्षरांचे अक्षय देणे : अवकाळी विळखा
अवकाळी विळखा हा कथासंग्रह हाती घेतला आणि शिर्षकावरूनच लक्षात आले की, शेतकऱ्यांशी निगडीत कथाविषय असावेत. मुखपृष्ठ पाहून तर खोल काळजात कुठेतरी जखम उमटली. मनोगत वाचताना प्रत्येक वाक्यागणिक, शब्दागणिक मी निशब्द होत गेले. सचिन वसंत पाटील यांच्या असामान्य, धैर्यशील आयुष्याला सॅल्युट करावा वाटतो. कथासंग्रह संपूर्ण वाचून झाल्यानंतर लिहावे, व्यक्त व्हावे वाटले. जे भावलं… पटलं… उमजलं आणि खटकलं ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या संग्रहातील ‘टांगती तलवार’ ही कथा मला सर्वाधिक भावली. काळ्याकुट्ट आभाळासहीत दाटून राहिलेला, अधीर, बेभरवशी पाऊस आणि ते पाहून शेतातल्या धान्याच्या मळणीसाठी जीव टांगणीला लागलेला कथानायक नामा..! कथेच्या शेवटापर्यंत श्वास घशातच अडकुन रहातो. ऐन कामाच्या वेळी सगळीकडूनच हतबल झालेला नामा बायकोच्या साथीने थेट पावसालाच आव्हान देतो. कथेच्या शेवटी नामाच्या शिरावरील टांगती तलवार वाचकाच्या डोक्यावर तशीच लोंबकळत रहाते… पण कथा संपल्यावर मात्र त्या उभयतांच्या कष्टाचा सार्थकतेसाठी काळजाच्या काठोकाठ शुभेच्छा भरून येतात… अगदी ओथंबलेल्या आभाळासारख्या..!
‘सुर्यास्त’ ही कथा अक्षरश: हृदयाला पिळ पाडणारी… हतबल म्हातारपण आणि त्यामुळे आपल्या माणसांपासुनचे तुटलेपण… आपण नकोसे झालोय ही जिवघेणी वेदना… त्या वेदनेसोबत कसाबसा जीव तगवून जगणारा म्हातारा… त्याची भुकेची कासाविशी आपल्याही कंठाशी प्राण आणते. ‘आपणच म्हैस झालोय’ हे वाक्य तर अंगाचा थरकाप उडविणारे. मानवी जिवनाच्या सुर्यास्ताचं हे बिभत्स दर्शन कोणत्याही संवेदनशील मनाला गोठवून टाकणारं आहे.
प्रत्येक बाबतित शेतकऱ्यांना नाडणारी आपली समाजयंत्रणा आणि त्या विरोधात शेतकरी बांधवांचा झालेला ‘उद्रेक’ प्रभावीपणे कथेत मांडला गेला आहे. जगाच्या पोशिंद्याच्या पोटावर पाय आणणार्याविरूद्ध हा असाच एल्गार केला पाहिजे ही भावना या कथेचे वाचन करताना अधिकाधिक अधोरेखित होत जाते.
‘तुपातली वांगी’ कथेत शेतीला कमी दर्जाचे ठरवून, स्वतःला शेतकरी म्हणवून घेण्यात कमीपणा मानणाऱ्या आजच्या तरूण पिढीसाठी नारायणची ‘तुपातली वांगी’ ही कथा नक्कीच एक सकारात्म उर्जा देऊन जाते. स्वतः बाजारात बसून वांगी विकुन नारायणाने शेतकऱ्यांच्या कष्टावर मस्तवाल होणाऱ्या बाजार दलालांना दिलेली ही चपराक आणि त्याच्या शेतीतील चढता आलेख नवतरूणांना शेतीकडे वळण्यास नक्कीच प्रवृत्त करेल… ही आशा या कथेतून जागती रहाते.
‘घुसमट’ ही पहिलीच कथा भुईशी इमान सांगणाऱ्या पण बदललेल्या सामाजिक परिस्थितीशी, नव्या पिढीच्या बदलत्या मानसिकतेशी संघर्ष करता-करता स्वतःची घुसमट करून घेणाऱ्या विलास नावाच्या शेतकऱ्याची. रान विकणं म्हणजे महापाप माणनारा विलास, झाडांचा बक्कळ पैसा कमावणाऱ्या बज्याच्या भपक्याने क्षणभर का होईना चलबिचल होतो. मुलाच्या मोटरसायकलीच्या मागणीने हबकुन जातो. बज्याने केलेली रानाची मागणी म्हणजे कुणीतरी काळजाचा तुकडाच मागावा इतकी वेदना उरामनाशी उमटून जाते त्याच्या… मातीशी जोडलेली नाळ इतक्या सहजासहजी तुटायची नाही आणि बदलत्या परिस्थितीत आपला निभाव ही लागायचा नाही या द्वद्वात अडकलेला त्याचा ‘शेतकरी जीव’.. विलास या कथानायकाची घुसमट वाचून आपल्याही मनाची कालवाकालव झाल्याशिवाय रहात नाही, हे मात्र खरे.
‘वाट’ ही कथा वाचताना पांडबाची हतबल., अगतिक परिस्थिती आणि त्याही स्थितीत त्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी टपलेली समाजातील विकृती हे वाचताना घशाशी आवंढा अडकुन रहातो. कथेच्या शेवटी तर पेटलेल्या ऊसाच्या ठिकाणी पोटच्या पोरालाच जणू आगीनं विळखा घातलाय… ही त्याची करून भावना, त्यासाठीचा मूक आक्रोश काळजाच्या गाभ्यापर्यंत पोहचतो. आणि दाटून आलेला गहिवर डोळ्यावाटे बाहेर पडल्याशिवाय रहात नाही. ‘दिवसमान’ कथेत सर्रास आढळणारा दोन पिढ्यामधील जागतिक संघर्ष रेखाटलाय. आपल्या मुलाविषयीच्या, त्याच्या बद्दलच्या स्वप्नांविषयीच्या भल्यामोठ्या अपेक्षाभंगाचं दु:ख पदरात घेऊन जगणारा म्हातारा… स्वतःच्या उच्चशिक्षित मुलाविषयी अभिमान बाळगण्याऐवजी त्याने केलेली अवहेलना त्याच्यासाठी लाजिरवानी ठरावी हे जगरहाटीमधील बदललेल्या दिवसमानाचे ‘ओंगळवाणे’ दर्शन या कथेतून समोर येते.
‘करणी’ ही मात्र अगदी एखाद्या कजाग, तरीही स्वतःच्या गाई गुरांवर पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम करणार्या स्त्रिच्या मानसिकतेचे गमतीदार दर्शन घडविते… म्हशिला वाचविण्यासाठी धडपडणारी, आक्रोश करणारी विठाआई, शेजारणीला पाहून मात्र आकसाने, पोटतिडकीने शिव्यांची बरसात सुरू करते… एक मिष्कील हसू उमटते कथा वाचता वाचता. ‘कष्टाची भाकरी’ ही नावाप्रमाणेच कष्टाचे महत्व अधोरेखित करणारी, आशेचा किरण जागविणारी कथा आहे.
नाना पैलवानाची आयुष्याशी चाललेली करूण ‘लढत’ मात्र ह्रदयाला जावून भिडते. बदलत्या काळात दैवगतीने हतबल एका पैलवानाच्या लढतिचे वर्णन वाचताना त्या शब्दांगणिक लढतीत आपण सामील होत जातो आणि नानाच्या जगण्याच्या अस्तित्वाची ही लढत त्याने जिंकलीच पाहीजे म्हणून मनापासून आळवणी सुरू होते.
‘मैत्री’ कथेतील मैत्रीचं बिभत्स रूपडं पाहून मन थिजून जाते. भोळ्याभाबड्या नामदेवाच्या मैत्रीची जाण आणि अप्पलपोट्या सुधाकरचे कृतघ्न वागणे ही दोन टोके मानवी स्वभावाची प्रातिनिधीक उदाहरणे ठरावित. कथेच्या शेवटी आलेला पुस्तकांच्या घट्ट मैत्रीचा उल्लेख मात्र नवी दिशा दाखवणारा. या कथेचे लेखन स्वानुभवातुन घडले असावे असे वाटते.
‘बुजगावणं’ ही सुद्धा एक काळजाचा ठाव घेणारी कथा. औद्योगिकरणाच्या चक्रव्यूहात फसणारा शेतकरी, झटपट पैशाच्या मोहात अडकुन ‘पोरानं आपल्या बापाचं काळीजच विकुन टाकलं ‘ हे भयान वास्तव खूपच अंगावर येते. आज सर्वत्र दिसणारी हि परिस्थिती, त्यातून उफाळणाऱ्या दोन पिढ्यातील संघर्षाची अगदी सुक्ष्म मांडणी केली गेली आहे. शामुआण्णाचे रानासाठी तुटणारे काळीज… काळ्या मातीचे रूणाईत असणारे त्याचे आयुष्य आणि त्यापायी होणारी त्याची तगमग आपल्याही काळजाचा ठाव घेते. ‘वेडगळ अडगळ’ ठरलेल्या शामुआण्णासाठी वापरलेली ‘बिनकाळजाचे निर्जीव बुजगावणे’ ही उपमा आपलेही काळीज चिरून टाकते.
काळ्या मातीची जाण विसरून त्याकडे पाठ फिरविनारी तरूणाई बऱ्याच कथांमधून दिसत असताना ‘रान’ कथेतील मातीची ओढ मनात जपणारा सखाराम मात्र अगदीच आपलासा वाटून जातो. पहिल्या पावसाच्या मृदगंधाने धुंद होऊन गावच्या चिंब होणाऱ्या शहरी माणसाचे प्रतिबिंब या कथेत रेखाटले आहे. पावसाच्या वलीवर रान पेरायचं सखारामचे स्वप्न नकळत आपल्याही डोळ्यात फूलून येते.
दगडाचा देव नाकारणाऱ्या व्यक्तीसाठी ‘सांभाळ रे’ ही कथा स्वतःच्या विचारांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास पूरक ठरते. आपली सर्व तिर्थस्थानं ,भक्तीस्थानं म्हणजे धर्माच्या दलालांचा अड्डा बनलीत. याचा अनुभव आपण तिथे प्रवेश केल्या क्षणापासूनच घेत असतो. बडव्यांच्या गर्दीत हरवलेला विठोबा खऱ्या भक्तांच्या कधी दृष्टीसच पडत नाही. किळस वाटावी इतकी अस्वच्छता, चंद्रभागेची दुर्दशा आणि स्वतःला पांडूरंगाचे भक्त म्हणवून घेणा-यांची टोकाची असंवेदनशिलता, दक्षिणेसाठी प्रत्येक पायरीवर उघडलेली नवनव्या देवांची दुकाने आणि पैशाच्या तालावर तोलली जाणारी भक्ती, हे सर्व विषण्ण करणारे वास्तव खूपच उघडं होऊन या कथेमधून समोर आलं आहे.
‘कांदा, मुळा, भाजी… अवघी विठाई माझी’ या अभंगाची यथार्थ जाणीव विकाला उमगते आणि विठ्ठलाकडे पाठ फिरवुन स्वतःच्या खऱ्या पंढरीकडे चालू लागलेल्या विकाच्या वारीत आपणही वारकरी बनून त्याची साथसंगत करावी असे वाटते.
सद्यस्थितीत ओरबाडले जाणारे पर्यावरण आणि त्या अनुषंगाने होणारी लोकजागृती या विषयावरील प्रबोधनाच्या अंगाने जाणारी कथा म्हणजे ‘अवकाळी विळखा’. काळोखात चाचपडना-यांना दिशा दाखविणारी अशी ही कथा आहे.
या संग्रहातील प्रत्येक कथा वाचनिय झाली आहे. बहूतेक कथा ‘शेतकऱ्यांच्या व्यथा’ या विषयावर केंद्रीत असल्या तरी ती व्यथा इतक्या विविध अंगाने सचिन पाटील यांच्या कथांमधून समोर येते की, एकच विषय असूनही कोणत्याही कथेमध्ये एकसूरीपणा वाटत नाही. ग्रामीण बोलीचा वापर जास्त परिणामकारक झाला आहे. सर्वच कथांचा शेवट त्या कथेला एक वेगळीच उंची प्राप्त करून देणारा… कधी उत्कंठावर्धक… श्वास रोखून धरायला लावणारा तर कधी अगदी जीवाला चटका लावून जाणारा… अगदी छोटी छोटी मानसिक आंदोलने टिपली गेली आहेत. नात्यांचा खरेपणा… शेतकऱ्यांच्या जगण्याचा अगदी खराखुरा संघर्ष रेखाटला गेलाय… कुठेही अतिरंजितपणा नाही. अक्षरांचे हे अक्षय देणे जपून ठेवावे असेच.
‘आपणच म्हैस झालोय’, ‘पोटच्या पोरालाच जणू आगीने विळखा घातलाय’, ‘पोरानं आपल्या बापाचं काळीजच विकून टाकलंय’, ‘बिनकाळजाचे निर्जीव बुजगावणे ‘, अशी विविध वाक्ये थेट काळजाचा ठाव घेतात.
मात्र कित्येक कथांमधून समोर आलेला दोन पिढ्यातील संघर्ष प्रत्येक वेळी नविन पिढीलाच ‘खलनायक’ बनवून गेलाय. जुनं ते सोनं म्हणून प्रत्येकवेळी जुन्यालाच चिकटून राहणारी मागील पिढी आणि नवं ते हवं या मानसिकतेनुसार स्वतःमध्ये बदल घडविणारी आजची पिढी या संघर्षामध्ये कुठेतरी सुवर्णमध्य निघतो असा सकारात्म विचार देणारी एखादी कथा यात असायला हवी होती. कारण नाविण्याची ओढ, बदलता सामाजिक प्रवाह, भपका यांचं अप्रूप असलं तरीही आजची तरूणाई अजूनही आपल्या काळजात संवेदनशीलता जागी ठेवून आहे. त्याचं प्रतिबिंब, त्याचं दर्शन एखाद्या कथेतून वाचायला नक्कीच आवडले असते.
● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!
कथातील स्त्री व्यक्तिरेखा विषयी बोलायचं झालं तर ‘टांगती तलवार’ या कथेत नामाची बायको नामाला धीर देऊन स्वतः मळणी करायला राजी करते. आभाळ पेलण्याची ताकत तीच त्याच्यात निर्माण करते… वाचकांच्याही मनावर दाटून आलेलं आभाळ… अंधारून आलेलं मळभ कथेतील तिच्या उपस्थितीमुळे विरळ होत जाते… सर्व कुटूंबासह तिने तोललेले ते आभाळ… आपल्याही डोक्यावरील टांगत्या तलवारीचा भार कमी करते.
त्यानंतर उल्लेखनिय स्त्री-व्यक्तीरेखा म्हणून विठाआईचा उल्लेख करावा लागेल. घरात पेटणार्या चुलीचा आधार असलेल्या म्हशीवर पोटच्या गोळ्याप्रमाणे प्रेम करणारी विठाआई… किसनाबाई प्रति असलेला व्देष आणि असूया व्यक्त करणारी तिच्यातील ग्रामीण, कजाग बाई… तिची शिवराळ भाषा… म्हैस बरी व्हावी म्हणून तिची लेकराप्रमाणं काळजी घेणारं तिच्यातलं वत्सल मातृत्व… सर्व काही वाचकाला खिळवून ठेवणारं…
परंतु इतर कथांचा विचार करता कोणत्याही कथेमध्ये स्त्री पात्र ठसठशीतपणे साकार झालेलं दिसत नाही. प्रसंगानुरूप, प्रसंगाची मागणी म्हणून एखादं स्त्री-पात्र कथेत डोकावून जातं तितकंच… पण शेतकऱ्यांच्या व्यथाशी तर स्त्रीचा अगदीच जवळून संबंध… घराचा डोलारा संभाळून आपल्या कारभाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबणारी शेतकरी स्त्री आपण शेतकरी कुटूंबात पाहातो. नवऱ्याच्या मागे तर संसाराचा सारा डोलारा एकट्याच्या हिंमतीवर पेलणाऱ्या स्त्रियांचे कर्तुत्व वादातीतच. शेतकऱ्यांच्या सुख दु:खाशी निगडीत या सर्व कथांमध्ये या एका गोष्टीची उणीव प्रकर्षाने जाणवली.
सचिन वसंत पाटील यांनी आपल्या संघर्षमय आयुष्यात पुस्तक वाचनाच्या साथ-संगतीने आपल्या आयुष्याला एक वेगळा अर्थ मिळवून दिला आहे. शून्यातून विश्व निर्माण केलं आहे… त्या अक्षरांचं देणं… त्या शब्दांचं पांग ते आपल्या लेखणीतून पुरेपूर फेडित आहेत… हे मात्र इथे आवर्जून नमूद करावे वाटते. आपल्या पुढील लेखनकार्यास आणि साहित्यप्रवासास खूप खूप शुभेच्छा..!
– सरिता पवार
कणकवली, सिंधुदूर्ग
***
कथासंग्रह : अवकाळी विळखा (तिसरी आवृत्ती)
लेखक : सचिन वसंत पाटील
प्रकाशन : तेजश्री प्रकाशन
पृष्ठे : १७६ किंमत : ३०० रुपये
सवलतीत : २०० रूपये