रुग्णांना सर्वोत्तम सेवा द्या- जिल्हाधिकारी सौरभ कटियार
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्या. रुग्णालय व्यवस्थापनाने सर्तकता बाळगत नियमित रुग्णांना भेट देऊन त्यांना दिल्या जाणाऱ्या उपचार, सेवा-सुविधेबाबत विचारणा करावी. रुग्णालयात स्वच्छता, साफसफाई आदी मुलभूत सर्वोत्तम सेवा रुग्णांना पुरवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी आज सुपर स्पेशलिटी हॉस्पीटल येथे भेट देऊन येथील आरोग्य सोयीसुविधांची पाहणी केली. तसेच रुग्णालयातील औषधांचा साठा, वैद्यकीय उपचार यंत्र, संसाधन, बाह्य व आंतर रुग्ण कक्षातील(ओपीडी-आयपीडी) रुग्ण संख्या, वैद्यकीय उपकरणांची सद्यस्थिती, डॉक्टर्स व परिचारिकांची संख्या, सुरक्षा रक्षक, वार्डातील रुग्णांची सद्यस्थिती, प्रसुती व शिशू अतिदक्षता व ओपीडी कक्षातील सोयीसुविधेबाबत सविस्तर आढावा घेतला. आयसीयु व ओपीडीतील रुग्णांशी संवाद साधून उपचार व सोयीसुविधेबाबत श्री. कटियार यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, सुपर स्पेशलिटी हॉस्पीटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव ढोपरे, डॉ.सुनिता हिवसे, डॉ. उज्ज्वला मोढोळे, डॉ. माधवी कासदेकर आदी उपस्थित होते.
श्री. कटियार म्हणाले की, रुग्णांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनामार्फत सर्तकता बाळगण्यात यावी. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, संबधित विभागाने नियमित रुग्णांना भेट देऊन त्यांना दिल्या जाणाऱ्या उपचार, सेवा-सुविधेबाबत विचारणा करावी. रुग्णांना औषधे व उपचाराअभावी त्रास होणार नाही याची रुग्णालय प्रशासनाने दक्षता घ्यावी. डॉक्टर तसेच परिचारकांचे रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करावी. रुग्णालय व रुग्णालयाचा परिसरात स्वच्छतेबाबत हयगय होता कामा नये. यासाठी नियमितपणे स्वच्छता मोहिम राबवावी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन गरजूंना त्याचा लाभ मिळवून द्यावा. रुग्ण व त्यांच्या नातेवाईंकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे. उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता रुग्णालय प्रशासनाने घ्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.