गझल मंथन साहित्य संस्था पुणे विभागीय गझल संमेलन संपन्न
गौरव प्रकाशन
पुणे (प्रतिनिधी) : गझल मंथन साहित्य संस्था आयोजित पुणे विभागीय एक दिवसीय गझल संमेलन रविवारी दिनांक १६ जून २०२४ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजे पर्यंत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात, पिंपरी पुणे-१८ येथे संपन्न झाले.
संमेलनाध्यक्ष अकोल्याचे गझलकार मा.निलेश कवडेसर, स्वागताध्यक्ष पुण्याचे गझलकार मा.प्रमोद खराडे सर, प्रमुख अतिथी अहमदनगरचे गझलकार मा. डॉ.शिवाजी काळे सर होते. दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या सत्कारानंतर अध्यक्षीय भाषणात कवडे सरांनी अतिशय मुद्देसूद, गझल लेखनाच्या सर्व महत्त्वाच्या बाबीचा आढावा घेऊन नवोदितांना सुंदर मार्गदर्शन केले तसेच मा. प्रमोद खराडे सर व डॉ. शिवाजी काळे सरांनी आपल्या मोजक्या भाषणाच्या शब्दांनी श्रोत्यांना मंत्र-मुग्ध केले.
ह्या संमेलनात एकूण सात गझल मुशायरे आयोजित केले होते. त्यात जवळ जवळ ऐंशी गझलकार /गझलकारांनी ,प्रस्थापित व नवोदितांनी आपल्या स्वरचित,वेगवेगळ्या खयालांच्या गझला सादर करून संमेलन उत्कृष्ट दर्जाचे केले. सकाळचा चहा नास्ता, दुपारचे सात्विक उत्तम भोजन व संध्याकाळचा गरमा गरम चहामुळे संमेलन खूपच भावले. संमेलनात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पुणे कार्यकरणीची उत्सवमूर्ती गझलकार, हजलकार मा. प्रदीप तळेकर सर.
मी आतापर्यंत गझल मंथनची तीन संमेलने अटेंड केली.( तिन्ही पुणे कार्यकरणीची) सहज नजरेत भरणारी उत्सवमूर्ती तळेकर सर आहेत. त्यांचा उत्साह तरुणांना ही लाजवेल असाच असतो. आपल्या घरच्या कार्यासारखे ते संमेलनात खपत असतात हे अतिशय कौतुकास्पद पुणे कार्यकरणीचे सारेच सदस्य तळेकर सरांसारखेच कार्यरत होते.
सातही मुशायऱ्यांचे, अध्यक्षांची अध्यक्षीय मनोगते व सूत्रसंचालकांचे सूत्रसंचालन उत्तम झाले. प्रत्येक सहभागी गझलकार/गझलकारास सुंदर प्रमाणपत्र,गुलाब पुष्प व गझलयात्री भाग दोन गझल संग्रह देऊन सन्मानित करण्यात आले. गझलकारा वैशाली माळी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.