- पुजनीय बाबा,
पुजनीय हे विशेषण तुमच्या विचारात बसणारे नाही व तुम्हाला आवडणारेही नाही याची आम्हाला पुरेपुर जाणीव आहे.परंतु ज्यांना पुजनीय म्हणावे आणि मानावे अशी माणसे सध्या शोधूनही सापडत नाही.त्यामुळे तुमच्या नावालाच ते विशेषण शोभून दिसते.क्षमा असावी.बाबा, विषय फार गंभीर आहे.म्हणून तुमच्यासोबत बोलण्याची इच्छा झाली.कदाचित तुमच्या दृष्टीने ती एक दुर्लक्षित करण्याजोगी घटना असेल.परंतु ज्या माणसाने या महाराष्ट्राच्या मातीला वैचारिकदृष्ट्या सुपीक बनविण्यासाठी स्वतःच्या शरीराची माती केली, त्या गाडगेबाबांच्या संदर्भात ही संतापजनक घटना घडली म्हणून बोलत आहे. महाराष्ट्र ही संत विचारांची पवित्र भूमी म्हणून आम्ही नेहमी फुशारकी मारत असतो.परंतु या महाराष्ट्रातच संतविचारांना वेळोवेळी पायदळी तुडविण्याचे घृणास्पद प्रकार घडत आहे.आताही तुमची समाजसेवी व समाजमान्य विचारांची *दशसूत्री* मंत्रालयाच्या प्रवेशद्वारातून काही कुत्सित व विकृत विचाराच्या लोकांनी निर्दयपणे उखडून टाकली आहे.त्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन सुन्न झाले आहे.आम्हीसुध्दा तुमच्या विचारांचे रक्षण करण्यात कमी पडलो आहे.त्यामुळे आम्हाला माफ करा बाबा !
वंदनीय बाबा,दशसूत्री हटविणाऱ्यांबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही.कारण त्यांना आधीही तुमचे विचार मान्य नव्हते व आजही नाही.परंतु जे लोक उठता-बसता तुमचे नाव घेतात,ते मात्र तोंड शिवून चूपचाप बसले आहे याचा खेद वाटतो.तुमचा आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा खूप जवळचा संबंध होता.तोच धागा माजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या रुपाने मंत्रालयाच्या प्रवेशव्दारावर तुमच्या समाजसेवी विचारांची पेरणी करण्यात कामी आला.परंतु त्यांना तुम्ही जसे चालत नाही तसेच प्रबोधनकार ठाकरे सुध्दा चालत नाही.कारण प्रबोधकारांनीच तुमचे पहिले जीवनचरित्र लिहून पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला मराठी माणसाच्या घरात आणि ह्दयात पोहचविले.प्रबोधनकार आणि तुम्ही, दोघेही अंधश्रध्देचे,बुवाबाजीचे,पुरोहितशाहीचे आणि पंचांगवाल्यांचे कर्दनकाळ ! तुम्ही किर्तनातून आणि प्रबोधकारांनी लेखनीतून येथील ऐतखाऊ आणि लबाड पुरोहितशाहीची लक्तरे वेशीवर टांगली होती.तुम्ही दोघांनीही आपल्या परिवर्तनवादी विचारांनी लोकांना जागृत करुन शिक्षणाची कास धरण्याचा पवित्र मंत्र दिला.त्यामुळे भटशाहीने तुम्हाला जीवंतपणी तर त्रास दिलाच पण मृत्यूनंतरही तुमचे विचार त्यांना काट्यासारखे बोचतात, रुततात आणि रक्तबंबाळ करतात.
● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!
म्हणूनच ज्या प्रबोधनकारांनी तुमचे चरित्र लिहिले,त्याच प्रबोधनकारांचा नातू या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे जसे त्यांना रुचले नाही,तसेच प्रबोधनकारांच्या नातवाने मंत्रालयाच्या दर्शनी भागावरच तुमच्या विचारांची लागवड करणे म्हणजे त्यांच्या मर्मावर केलेला वार होता व तो वार त्यांच्या खूपच जिव्हारी लागला होता.म्हणून आधी मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटविणे गरजेचे होते.कारण त्यांना हटविल्याशिवाय तुमची दशसूत्री हटविता येणे शक्य नव्हते.त्यामुळेच मागील काही महिन्यांपासून सर्व सरकारी यंत्रणांना हाताशी धरुन महाराष्ट्रात काही खूनशी लोकांनी आपल्या विकृतीचा कळस गाठलेला आहे.कारण तुमच्या दशसूत्री नुसार भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यानागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींचे शिक्षण आणि निराधारांना आधार देणे क्रमप्राप्त होते. त्यांना यातील कोणतीच गोष्ट करायची नसल्यामुळे तुमची दशसूत्री त्यांच्यासाठी अडथळा आणि आडकाठी बनली होती.त्यामुळे काहीही करुन तिला हटविणे गरजेचे होते.म्हणूनच काहीही कारण नसतांना तिला हटवून आम्हाला गाडगेबाबांचे विचार मान्य नाही व आमच्या लेखी गाडगेबाबांची काहीच किंमत नाही हे शिंदे-फडणवीस सरकारला दाखवून द्यायचे होते.त्यामुळेच या संत भूमीत या महाराष्ट्र व्देषी जोडीने ही नालायकी केली आहे.
वैराग्यमूर्ती बाबा, तुमचे आयुष्य हे वाहत्या पाण्याप्रमाणे निर्मळ,पवित्र आणि निष्कलंक होते. गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, कामकरी, अनाथ, अपंग, निराश्रीत लोकांच्या कल्याणाचा एकच ध्यास आयुष्यभर तुम्ही बाळगला होता.म्हणूनच तुम्ही कामचुकार आणि ऐतखाऊ लोकांच्या उदरनिर्वाहाची साधने असलेली धार्मिक स्थळे उभारण्याऐवजी धर्मशाळा, आश्रमशाळा, दवाखान्यात लोकांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून मुंबईसारख्या ठिकाणी धर्मशाळा बांधून लोकांची सोय केली. मंदिरात न जाता मंदिराच्या बाहेर बसलेल्या अनाथ, अपंग, निराधार, महारोगी यांच्या अंगावर आपल्या प्रेमाची झुल पांघरूण त्यांच्या खाण्यापिण्याची,औषधांची,निवाऱ्याची व्यवस्था केली आणि देव हा मंदिरात नसतो तर तो माणसात असतो हे अतिशय साध्या, सोप्या लोकभाषेत आम्हाला समजावून सांगितले.मुक्या जनावरांच्याही खाण्यापिण्याची सोय करणारे तुमच्यासारखे कर्मयोगी कुठे आणि पाण्याच्या माठाला विद्यार्थ्याने स्पर्श केला म्हणून त्याला मरेपर्यंत मारणारे आमच्यासारखे तथाकथित सुशिक्षित कुठे ? आम्ही तुमच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही बाबा ! कोट्यावधी रुपये घेवून स्वतःला विकणारे राजकीय पुढारी कुठे आणि लोकांनी दान दिलेल्या कोट्यावधींच्या संपत्तीमधील एक कवडीही आपल्या व आपल्या कुटूंबाच्या नावे करु नका असे मृत्यूपत्रात जाहीरपणे लिहून ठेवणारे तुमच्यासारखे निष्काम कर्मयोगी संत कुठे ? म्हणूनच तुमचा विचार या भ्रष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना पटला नाही व जनतेसाठी सनद असलेली तुमची दशसूत्री जनतेच्याच सर्वोच्च केंद्रातून काढून टाकण्यात आली.
प्रिय बाबा, त्यांना तुम्ही आवडूच शकत नाही. कारण तुमची विचारधारा पोषणवादाची तर त्यांची शोषणवादाची आहे.तुम्ही माणसं शिकली पाहिजे या उदात्त विचारांचे, तर ते माणसं अडाणी-अशिक्षित राहिली पाहिजे या घाणेरड्या विचारांचे ! तुम्ही सांगितले होते की,मंदिरात देव नसते तर पुजाऱ्याचे पोट असते आणि इथेच त्यांच्या दुखऱ्या आणि दुभत्या नसीवर तुम्ही लाथ दिली. तेव्हापासूनच ते तुमच्या विरोधात आहे. त्यांना व्यभिचारी आसाराम चालतो, पण सुसंस्कारी तुकाराम चालत नाही. त्यांना बलात्कारी रामरहीम चालतो!, पण सेवाधारी गाडगेबाबा-तुकडोजी महाराज चालत नाही.त्यांना धर्माचा धंदा करणारे व्यापारी वृत्तीचे तथाकथित संत चालतात, पण तुमच्यासारखे जगाला मानवता धर्माची शिकवण देणारे खरे लोकसंत चालत नाही. म्हणूनच तुमची दशसूत्री सुध्दा त्यांना चालणे शक्यच नाही.पण आम्ही या महाराष्ट्रात तुमचा विचार पराभूत होवू देणार नाही.आम्ही पूर्वीही परिवर्तनवादी विचारांसाठी लढत होतो आणि आताही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू ! तुमची हिंमत आणि आशिर्वाद आमच्या पाठीशी असू द्या बाबा ! लाचार, लोचट व पोचट लोकांसाठी तुकोबा-तुकडोजी-गाडगेबाबा ही विचारधारा पचविणे एवढे सोपे नाही. त्यासाठी स्वतःच्या डोक्यात स्वतःचा मेंदू आणि त्यावर स्वतःचे नियंत्रण असणे गरजेचे असते. परंतु ज्यांच्या मेंदूचा ताबा दुसऱ्यांच्या हातात असतो,ते नेहमी दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत असतात.म्हणूनच तुमची दशसूत्री हटविणारे मेंदू वेगळे आहेत आणि हात वेगळे आहेत. परंतु महाराष्ट्राची जनता तुमच्या अपमानाचा टिच्चून बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हे सुध्दा तेवढेच सत्य आहे बाबा ! फक्त थोडी वाट पहा !
- -प्रेमकुमार बोके
- अंजनगाव सुर्जी
- ९५२७९१२७०६
- १ ऑक्टोंबर २०२२
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- – बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन