वनक्षेत्रामध्ये वाहने सावकाश चालविण्याचे वनविभागाचे आवाहन
गौरव प्रकाशन अमरावती, (प्रतिनिधी) : अमरावती वनविभागांतर्गत वडाळी वर्तुळातील उत्तर वडाळी बिट मधील एस.आर.पी.एफ. कॅम्प परिसरांतर्गत अमरावती ते चांदूररेल्वे रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादी गुरुवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजेदरम्यान मृत झालेली आहे. प्राप्त माहितीनुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन व पाहणी करुन वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक तसेच वनपाल यांनी घटनास्थळाचा पंचनामा नोंदविला असल्याची माहिती अमरावती वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांनी दिली.
मृत बिबट मादीचे शव वन्यप्राणी प्रथमोपचार केंद्र वडाळी येथे आणण्यात आले आहे. व त्या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी डॉ. ए.जे. मोहोड तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर ठोसर यांनी बिबट मादी मृतदेहाची प्राथमिक तपासणी केली असता मादी बिबट अंदाजे 3 ते 4 वर्ष वयाची असल्याचे दिसून आले. त्यानंतर बांबू गार्डन परिसरातील नियोजित ठिकाणी उपवनसंरक्षक मेळघाट परतवाडा विभाग, परतवाडा, कॅम्प व वन्यजीव विभागचे सहायक वनसंरक्षक, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर, वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक, वनपाल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प वाईल्ड क्राईम सेलचे कर्मचारी व दोन पंच समक्ष प्रयोगशाळेचे पशुधन विकास अधिकारी डॉ. ए.जे. मोहोड व शल्य चिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर ठोसर यांनी बिबट मादी या मृत वन्यजीवाचे शवविच्छेदन केले असता वाहनाच्या धडकेमुळे छाती जवळील भागात अंतर्गत अति रक्तस्त्राव झाल्यामुळे मादी बिबट मृत झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर मादी बिबटाचा मृतदेह लाकडी थप्पीवर ठेवून सर्वां समक्ष नियमानुसार दहन करुन विल्हेवाट पंचनामा नोंदविण्यात आला.
हा अपघात एसआरपीएफ कॅम्प परिसर येथील रस्त्यावर घडला असल्यामुळे परिसरात उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजव्दारे धडक दिलेल्या अज्ञात वाहनाचा व आरोपीचा तपास घेण्याचा प्रयत्न वनविभागाव्दारे करण्यात येत आहे. अमरावती सभोवताल वनक्षेत्रामध्ये वन्यजीवांचे अस्तित्व असल्यामुळे रस्त्यावरुन जातांना वाहने सावकाश चालविण्याबाबत नागरिकांना अमरावती वनविभागामार्फत कळविण्यात आले आहे.
छाया : संग्रहित