पर्यावरण व वसुंधरेच्या रक्षणाविषयी विचार करायला लावणारा काव्यसंग्रह : उद्याच्या श्वासासाठी…
नुकताच कविवर्य रामदास पुजारी यांचा ‘उद्याच्या श्वासासाठी’ हा काव्यसंग्रह वाचनात आला. कवी पुजारी हे निवृत्त सहायक वनसंरक्षक असून माता आणि माती यांचेशी त्यांचे अतूट नाते आहे. आई, माता वसुंधरा व इतर विषयांवरील कवितांचा समावेश असलेला त्यांचा ‘आई माझं जग ‘ हा सुंदर कवितासंग्रह यापूर्वी प्रसिध्द झाला आहे. बालपणी ओढ्यांतून, नद्यांतून बारमाही स्वच्छ पाणी वाहताना पाहिलेला, पर्यावरणसमृद्ध बालपण जगलेला हा कवी रानावनांत, निसर्गाच्या सानिध्यात रमताना दिसतो.
संवेदनशील मन असणाऱ्या या कवीला, आपणा सर्वांना सुंदर जीवन पुरविणाऱ्या माता वसुंधरेची आपण सदैव काळजी घ्यायला हवी, तिला सदाहरित ठेवलं पाहिजे असं वाटतं. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपण झाडे लावली नाही तर या वाढत्या लोकसंख्येच्या उद्याच्या श्वासांसाठी प्राणवायूची कमतरता भासल्याशिवाय राहणार नाही असं कवीला वाटतं. म्हणूनच जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची निर्मिती करणाऱ्या, ऑक्सिजन निर्मितीचे कारखाने असलेल्या वृक्षांची जास्तीत जास्त लागवड करून, पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबून जीवसृष्टीची देणगी लाभलेल्या आपल्या माता वसुंधरेचं प्रत्येकाने रक्षण केलं पाहिजे असं कवीला वाटतं. या विचारांतून तसेच पशुपक्षी, वृक्षवेली, डोंगरदऱ्या, शेत-शिवार, हवा, पाणी, माती, जंगल, या साऱ्या निसर्गरुपांशी सातत्याने झालेल्या संवादातून पर्यावरणविषयक कविता होत गेल्या आणि त्यातूनच ‘उद्याच्या श्वासासाठी ‘ या कवितासंग्रहाची निर्मिती झाल्याचे कवी आपल्या मनोगतात म्हणतो. साडेसातशे वर्षांपूर्वी ग्रंथराज ज्ञानेश्वरीने आपल्याला
‘नगरेचि रचावी, जलाशये निर्मावी।
महावने लावावी, नानाविधे।’
या ओवीच्या माध्यमातून वृक्षलागवडीचा तसेच जल संधारणाचा संदेश दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातूनही वृक्ष लागवड,वनांच्या रक्षणाचा, वन व्यवस्थापनाचा सुंदर संदेश आपल्याला मिळतो. परंतु आजपुरतेच आणि आपल्यापुरतेच पाहणाऱ्या, स्वार्थाने अंध बनलेल्या मानवाने विकासाच्या नावाखाली निसर्गाला अक्षरशः ओरबाडलंय, समृद्ध वनसंपदा नष्ट केलीय. वायुप्रदूषण वाढलंय. पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अकाली पाऊस,गारपीट, महापूर या समस्याही अलीकडे सारख्या उद्भवत आहेत. या साऱ्यांचा परिणाम मानव, प्राणी, पशु-पक्षी या सर्वांनाच आज जरी फारसा जाणवत नसला तरी नजीकच्या भविष्यात निश्चितच जाणवेल. पुरेशा वृक्षसंपदेअभावी भविष्यात श्वास घेणं मुश्किल होऊ शकतं.भावी पिढ्यांच्या श्वासासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षसंपदा जपणे, वसुंधरेचं रक्षण करणं किती आवश्यक आहे याची जाणीव कवीला प्रकर्षाने असल्याने, ‘ सुंदर अपुली वसुंधरा ‘ या कवितेत कवी म्हणतात..
जग हे सुंदर, सुंदर जीवन
सुंदर आपली वसुंधरा
बनवू तिजला आणिक सुंदर
ऐक माणसा मंत्र खरा
आपुली वसुंधरा…
कवीच्या कवितेला निसर्गाची, शेत-शिवाराची, वृक्षवेलींची विलक्षण ओढ आहे. वसुंधरा ही आपली सर्वांचीच आई असून तिच आपल्या सर्वांचं भरण-पोषण करते याबद्दल कवीच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. आपल्या बालपणातील निसर्ग कवीला साद घालतो आहे. ‘ वसुंधरेची मुलं ‘ या कवितेत कवी म्हणतो,
पावसात भिजायची
खळखळ वाहणारं पाणी पाहून
आनंदायची, वसुंधरेची ही मुलं..
बालपणीचा तो आनंद केव्हाच संपलाय.प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावून आपल्या उद्याच्या श्वासाची तरतूद केली पाहिजे यासाठी कवी आग्रही आहे. त्यासाठी कवी त्याच्या झाडाला रक्षणाचं व संगोपणाचं वचन देत आहे. आपण आपल्या झाडाचे रक्षण केलं तर आपलं झाडसुद्धा आपल्याला श्वसनासाठी ऑक्सिजन पुरविण्याची नक्कीच हमी देतं. ‘ एक मूल-एक झाड ‘ या कवितेत कवी म्हणतो,
‘वचन माझं माझ्या झाडाला
त्याच्या रक्षणाचं,त्याच्या संगोपनाचं
वचन मला माझ्या झाडाचं
श्वासासाठी ऑक्सिजन पुरविण्याचं..
झाड हे मानवाच्या अस्तित्वाचा आधार आहे. वनश्री हिरवीगार,थंड, टवटवीत ठेवून सावली, फुले,फळे,औषधे, जीवनोपयोगी वस्तू देण्याचं काम झाडं करतात. म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावलंच पाहिजे अशी प्रामाणिक भावना कवी व्यक्त करतो. कवीचे विचार आशादायी व सकारात्मक आहेत.
‘ आता रुजावं लागेल ‘ या कवितेत कवी म्हणतो,
उन्हाळा संपेल नि
श्रावणसरी येतील
तृणपाती फुलतील
रानं हिरवी होतील…
डोंगरदरीत खळखळ वाहणाऱ्या नितळ निर्मळ झऱ्याप्रमाणे कवीचे विचारही अगदी निरागस आहेत. प्रत्येकाचं जीवन असंच नितळ व सुंदर व्हावं हा कवीचा विचार मानवतेची सुंदर देण आहे. मनःशांती व आत्मानंदाच्या शोधात असलेल्या मानवाचा खरा जीवनसाथी श्वास आहे. मनुष्याच्या जन्मापासून त्याचं आणि प्राणवायुचं असलेलं घट्ट नातं कवी ‘जीवनसाथी’ या कवितेतून व्यक्त करतो.
तूच आहेस माझा खरा
जीवनसाथी
श्वास माझा तू..
वृक्षांप्रमाणे पाणीसुद्धा ईश्वराचं प्रतिरूप असून समृद्ध वने व पर्जन्य यांचा अन्योन्य संबंध कवी अधोरेखित करतो.
‘ पाणी ईश्वराचं रूप ‘ या कवितेत कवी म्हणतो,
पाणी हवे उद्यासाठी
वृक्ष लावावे,राखावे अगणित
स्वच्छ, शुद्ध पाण्यासाठी
उद्याच्या श्वासासाठी..
कवीचे चिंतन हे मानवजातीच्या भल्यासाठी मूलभूत चिंतन आहे. वाढते शहरीकरण,औद्योगिकरण,धूर ओकणारी कारखानदारी व वाहने यामुळे होणारे हवा प्रदूषण हासुद्धा कवीच्या चिंतनाचा विषय आहे. छोट्या छोट्या पर्यावरणपूरक गोष्टींचा अवलंब करून, आपण पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने छान काम करू शकतो हे ‘ पर्यावरणस्नेही बना ‘ या कवितेतून कवीने अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. सायकलचा जास्तीत जास्त वापर हेही पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने एक छोटसं पाऊल आहे हे कवीने ‘ दिसत नाही फारशी ‘ या कवितेतून खूप रंजकपणे मांडलं आहे.
देशभर, जगभर
फिरून संदेश देऊ
सायकल चालवा नी
आरोग्य तुमचं राखा..
जिच्या उदरात आपण जन्म घेतो ती माता आणि जिच्या उदरात अखेरचा श्वास घेतो ती माती या दोन्हींचाही विलक्षण जिव्हाळा कवीला आहे. एकाहून एक सरस अशा ५५ काव्य पुष्पांचा हा अप्रतिम काव्यसंग्रह आहे. पर्यावरण रक्षण, जलसंधारण, मृदसंधारण, प्रदूषणमुक्ती यांसारख्या क्षेत्रात निरलसपणे सेवा करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
सुप्रसिध्द चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे. उगवत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर झाडाच्या खोडावर बसलेला मुलगा आणि घरट्यातील, फांदीवरील पक्षी हे जणू उद्याच्या श्वासासाठी चिंतातूर असून आपणा सर्वांना पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहेत.
पुण्याच्या साहित्य विश्व प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाची छपाई अतिशय सुबक असून बांधणी उत्कृष्ट आहे.
आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेचे राज्याचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांची सुंदर पाठराखण कवितासंग्रहास लाभली आहे.
८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना सोन्याच्या कोंदणात जडवलेल्या हिऱ्याप्रमाणे आहे. ती वाचल्यानंतर हृदयातून आनंदलहरी उचंबळून आल्याचा भास काव्यरसिकांना झाल्याशिवाय राहणार नाही. या पुस्तकास लाभलेली डॉ.श्रीपाल सबनीस यांची ही ४२२ क्रमांकाची प्रस्तावना आहे. ” वसुंधरेच्या संरक्षणासाठी समर्पित भावनेने या कविता जन्माला घालण्याचा पराक्रम कवी रामदास पुजारी यांच्या नावावर सन्मानित आहे. अथांग मानवी कळवळा, वैज्ञानिक दृष्टी, नैतिक विचारांची पेरणी आणि भूमिकेची उदारता व व्यापकता या गुणांमुळे कवी पुजारींची कविता मराठी काव्यप्रवाहात लक्ष वेधून घेते ,” असे गौरवोद्गार डॉ.श्रीपाल सबनीस आपल्या प्रस्तावनेत काढतात.
कवी हल्ली कुंडल वन प्रबोधिनी येथे व्याख्याता या पदावर सेवारत आहेत. या प्रबोधिनीचे महासंचालक जे.पी.त्रिपाठी यांचा शुभसंदेश तसेच महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. अरविंदकुमार झा यांचे कौतुकाचे शब्द, वसुंधरेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरक आहेत, कवीच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे आहेत.
एकंदरीतच कवी रामदास पुजारी यांचा ‘उद्याच्या श्वासासाठी’ हा काव्यसंग्रह अप्रतिम असून प्रत्येकाने संग्रही ठेवावा, वाचून त्यावर चिंतन-मनन करावे असा आहे.’ आपला उद्धार आपणच करावा ‘ या श्रुतीच्या वचनाप्रमाणे हा काव्यसंग्रह म्हणजे मानव जातीच्या उद्धाराची गुरुकिल्लीच आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही!
* डॉ.बाळासाहेब शिंगोटे
खडकवाडी, ता.पारनेर, जिल्हा अहिल्यानगर मो.नं.९९२२५९२३०१
(लेखक हे दुष्काळ या विषयावर पीएचडी प्राप्त असून शिवचरित्र, व्यसनमुक्ती या विषयांवर प्रबोधन करणारे चिंतनशील कवी व लेखक आहेत.)
* काव्यसंग्रह: उद्याच्या श्वासासाठी
* कवी: रामदास पुजारी
* प्रकाशक : साहित्यविश्व प्रकाशन, पुणे
* प्रथमावृत्ती: २२ डिसेंबर २०२३
* किंमत : २००/-रु