बाप आणायचा
Contents
hide
बाप आणायचा
लपवून क्वाटर
सावरा सावर झाल्यावर…!
फाड़ फाड़ बोलत
दात खात
बोटं मोडीत
स्टीलचा ग्लास आदळायची
बापासमोर आई…!
आम्ही असायचो पुस्तकात
शरीराने
मात्र मन बापाच्या बाटलीत
आधीच जाऊन बसायचं…!
हाता सहित
ग्लास थरथरताना
ओठा जवळ गेलेला ग्लास
डोळे गच्च मिटून संपायचा
क्षणार्धात
आणि
घामाच्या धारा ओघळायच्या
कपाळावरुन…!
आई तेव्हा गहिवरुन जायची
पदराला सावरत म्हणायची
बाटली फेकू नका
अंधार पडायला लागताना…!
आणि
पडायचा अंधार दिशाहीन होऊन
त्याच बाटलीत
रॉकेल ओतून
वात लावताना
किती प्रखर उजड़ायचं…?
मग करायचो अभ्यास
त्याच बाटलीच्या उजेडाखाली
रॉकेलच्या वासाला वेगळा फिल आणत…!
सकाळ झाली की
बाप झड़प घालायचा वाती वर
काजळी गंधाळून जायची
पुन्हा प्रकाश शोधत..!
– हृदयमानव अशोक
9921083640