अमरावती जिल्ह्यातील नम्रता ठाकरे
शेतकऱ्याची मुलगी झाली कलेक्टर
एका शेतकऱ्याच्या मुलीने मनापासून सातत्याने अविरत प्रयत्न केले तर ती देखील कलेक्टर होऊ शकते हे नम्रता ठाकरे यांनी सिद्ध करून दाखविलेले आहे. अमरावती पासून जवळपास 115 किलोमीटरवर तिचे गाव आहे . म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर.अमरावती ते वरुड आणि वरुड ते हातुर्णा असा प्रवास करावा लागतो.
नुकत्याच जाहीर झालेल्या आयएएस या परीक्षेमध्ये नम्रता ठाकरे यांनी सुयश संपादन केलेले आहे. तिच्या यशाची बातमी खासदार डॉ. अनिल बोंडे यांना कळताच त्यांनी मुंबईवरून मला फोन केला आणि माझ्या वतीने तुम्ही हातुर्णा येथे जाऊन नम्रताचे अभिनंदन करा व तिला अमरावतीला दोन तारखेला सायंकाळी पाच वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित सत्कार समारंभाचे निमंत्रण द्या असे सुचवले.
मी आमचे वरुडचे पत्रकार मित्र श्री गिरीधर देशमुख यांना फोन केला. त्यांना नम्रताबद्दल विचारले. ते अमरावतीतच होते. ते म्हणाले मी चौकशी करून सांगतो .लगेच त्यांचा फोन आला .ते म्हणाले नम्रता दिल्लीवरून कालच आलेली आहे .सध्या डॉ. मनोहर आंडे तिचा सत्कार सुरू आहे. ती आज सायंकाळपर्यंत वरुडलाच आहे. मी तिच्याशी बोललो.
मी लगेच माझी गाडी श्री गिरीधर देशमुख यांच्या अमरावती येथील घराकडे वळवली .माझ्याबरोबर माझे सहसंचालक श्री चंद्रशेखर आसोले हे होते .मी आसोले व गिरीधर देशमुख वरुडकडे निघालो . या भागात स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी खूप चांगले काम केले आहे त्यामुळे या भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रशासनात जात आहेत.
वरुडच्या नागपूर रोडवरील भागांमध्ये नम्रता काकाकडे थांबलेली होती. आम्हाला घर शोधणे गैरसोयीचे होऊ नये म्हणून दुपारी अडीच वाजताच्या कडकडीत उन्हात तिचे काका आमच्यासाठी रस्त्यावर येऊन थांबले होते. त्यांची मोटरसायकल समोर आणि आमची कार मागे असे करीत आम्ही नम्रताकडे पोहोचलो.
चहापाणी झाल्यानंतर आम्ही नम्रतांचा छत्रपती शिवराय यांचा मोठा भव्य ग्रंथ व फुलांचा बुके देऊन तिचा सन्मान केला. तिच्या आई-वडिलांचेही अभिनंदन केले. नम्रताला तिची यशोगाथा सांगण्याची विनंती केली .नम्रता म्हणाली सर मी सातव्या वर्गापर्यंत गावातच शिकले .तिचे गाव हातुर्णा हे अमरावती जिल्ह्यातील वरुड ह्या तालुक्याच्या ठिकाणा पासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. नंतर तिने वरुडच्या जागृत विद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. जागृत विद्यालय हे प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध समाजसेवक वनराईचे श्री गिरीश गांधी व वरुडचे डॉ.मनोहर आंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या जागृती विद्यालयाची वाटचाल सुरू आहे.
अकरावी बारावी साठी नम्रताने अमरावतीच्या मोर्शी रोडवरील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर ती पदवी परीक्षा प्राप्त करायला नागपूरला गेली. नागपूरच्या तीन वर्षाचा कालखंड तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. श्री सुनील जुमळे त्यांच्याकडे ती राहत होती. तिचे मामा श्री सुनील जुमळे हे माझे विद्यार्थी. हे मला नम्रताची मुलाखत घेताना कळले. श्री सुनील जुमळे यांनी हा परिचय दिला . श्री जुमडे यांनी श्री विश्वास नांगरे पाटील श्री भारत आंधळे यांच्या व्हिडिओ ऐकविल्या आणि प्रोत्साहन दिले.
या प्रोत्सानामुळे तिने आयएएस करण्याकडे निर्णय घेतला. हे सगळे करीत असताना तिला वडिलांचा विचार करावा लागत होता.कारण वडील शेतकरी होते. आयएएस साठी लागणारी कोचिंग क्लासेसची भव्य दिव्य फी ती भरू शकणार नव्हती. पण महाराष्ट्र शासनाची सारथी तिच्या मदतीला आली . तिची इच्छाशक्ती प्रबळ होती .आपली एम एस सी ची डिग्री पूर्ण झाल्यानंतर तिने काळजीपूर्वक आय ए एस चा अभ्यास सुरू केला .
तिने तीनदा ही परीक्षा दिली. पण अपयश पदरी पडले. यादरम्यान ती दिल्लीला जाऊन आली आणि दिल्लीला गेल्यानंतर तिला एक दृष्टी प्राप्त झाली. दिल्लीच्या ज्या ज्या भागात ती गेली त्या त्या भागातील स्पर्धा परीक्षेचे वातावरण दिसले. स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी खरं गरज असते ते दृष्टीची. तिला तसे वातावरण दिसले. पण दिल्लीच्या खर्च कोचिंग क्लास हा खर्च तिला झोपवणारा नव्हता .पण दिल्लीला गेल्यामुळे तिच्या आशा आकांक्षा पल्लवीत झाल्या.
आयएएसमध्ये यश प्राप्त होत नाही हे लक्षात आल्यानंतर तिने एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. तिचा आयएएसचा अभ्यास झाला होता. परंतु यश मिळत नव्हते म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तिने निवड केली होती.नेमकी ती देणार असलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली .आता काय करायचे .तोपर्यंत तिने आयएएसची पुस्तके गुंडाळून ठेवली होती .चक्क बांधून ठेवली होती .आता आय ए एस कडे वळायचे नाही .कारण की त्या परीक्षेमध्ये आपल्याला सतत अपयश येत आहे आणि आता आई-बाबांचा विचार करता आपल्याला कुठले तरी पद मग ते एमपीएससीचे का असेना मिळणे गरजेचे आहे .हे तिने ठरवले होते .पण ज्या परीक्षेला बसणार तीच परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
कुठेतरी कोणीतरी मदतीला येतो असे होते .मग ते अंतर्मन का असेना .नम्रताने विचार केला आय ए एस पुस्तके आपण गुंडाळून ठेवलेली आहेत .पण आपलाच अभ्यास झाला आहे. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे . आय ए एस ची परीक्षा तोंडावर आहे .एक वेळ परत परीक्षा द्यायला काय हरकत आहे.आणि हाच विचार तिला आयएएस होण्यासाठी कारणीभूत ठरला. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे तिने उरलेल्या दिवसांमध्ये आयएएस चा पुनरअभ्यास केला आणि परीक्षा दिली आणि चक्क ती पूर्व परीक्षा पास झाली .पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तिचा उत्साह वाढला आणि तिने मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली. त्यामध्ये तिला यश मिळाले आणि मुलाखतीमध्ये देखील ती यशस्वी होऊन आज आयएएस झालेली आहे.
काय योगायोग असतात .शेतकऱ्यांच्या वाट्याला खरं म्हणजे सातत्याने दुःख आलेले आहे. कष्टाचे जीवन झालेले आहे. पण या कष्टाला देखील कधी कधी सुखाचे अंकुर फुटतात. तसेच ठाकरे परिवारात झाले आहे .आय ए एस चा गाशा गुंडाळून ठेवलेली मुलगी आईएएस ला बसते काय आणि पास होते काय हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही .पण नम्रता या घटनेचे मूर्तीमंत उदाहरण आहे.
नम्रता गावात येत होती तर कोणी विचारले तर काय सांगायचे ? असा तिला प्रश्न पडत होता .पण नम्रता जेव्हा आय ए एस. होऊन गावात आली तर तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता .कारण गावच्या सीमेवरच तिचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. गावपासून एक किलोमीटरची रॅली तिच्या सन्मानार्थ निघाली .गावातले सहाशे सातशे लोक तिच्या मिरवणूकमध्ये सहभागी झाले .गावकऱ्यांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या आणि घराच्या बाहेर पाट टाकून ठेवलेले होते .तिच्या आरत्या केल्या जात होत्या. तिला पेढे बर्फी भरवल्या जात होते. आपल्या घरापर्यंत जायला जिथे दहा मिनिटे लागत होते तिथे आता दोन तास लागले होते. गावातला प्रत्येक माणूस प्रत्येक गावकरी प्रत्येक मुलगा मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन तसेच आपल्या दारात उभे राहून आपल्या या गावलेकीचे स्वागत करीत होता.
नम्रता आयएएस झाली हे करतात वरुडचे सुप्रसिद्ध समाजसेवक श्री मनोहर आंडे यांनी तिचा सत्कार घडवून आणला. तसेच वरुडच्या सौ प्राची ठाकरे यांनीही आपल्या महाविद्यालयात वाजत गाजत तिचे आगमन केले. शेतकऱ्याची मुलगी ग्रामीण भागातली मुलगी आता कलेक्टर झालेली होती. मी खासदार अनिल बोंडे यांच्या वतीने तिचे अभिनंदन केले .तिला अमरावतीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आणि श्री गिरीधर देशमुख यांना तिची युट्युब आणि फेसबुक साठी मुलाखत घ्यायला सांगितले
मी नम्रताला पाहत होतो .उंच पुरी मुलगी. साधी सरळ शहरीकरणाची वाफ न लागलेली ग्रामीण भागाशी आपली नाळ कायम ठेवणारी मुलगी .आज आयएएस झालेली होती. या प्रसंगी जेव्हा आम्ही सत्कार केला. तेव्हा तिला प्रोत्साहन देणारे नागपूरचे श्री सुनील केशवराव जुमडे त्यांच्या सौभाग्यवती चित्रा सुनील जोंधळे नम्रताचे वडील अनिल बळवंतराव ठाकरे तिचे काका सुनील ठाकरे त्याचबरोबर नम्रताची आई संगीता काकू रंजना कुमारी अंकिता खडतकर तिचा मामभाऊ सुरज आणि तिचा भाऊ प्रताप आणि आमचे मिशन आय ए एस चे सहसंचालक चंद्रशेखर आसोले हे हे हजर होते.
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील हातुर्णा या छोट्याशा गावातून नम्रताने जो आपला प्रवास सुरू केला तो खरोखरच प्रेरणादायी आहे. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच असल्यामुळे तिला प्रसंगी पार्ट टाइम नोकरीही करावी लागली .कुठे कोचिंग क्लास मध्ये शिकवावे लागले. पण ती म्हणाली की सर मी दिल्लीला गेली नसती तर मला आयएएसची दृष्टी प्राप्त झाली नसती .दिल्लीला गेले आणि माझं व्हिजनच बदलून गेलं .कारण तिथलं वातावरण पाहिल्यानंतर माझे डोळे उघडले .आता मी प्रशिक्षणाला जाईपर्यंत माझ्या जिल्ह्यातील विदर्भातील जिथे जिथे मला बोलावणे येईल तिथे तिथे मी जाणार आहे .मुलांना या परीक्षे विषयी सांगणार आहे .त्यांच्या मनातील भीती कमी करणार आहे .
आज एक शेतकऱ्याची मुलगी कलेक्टर झाली आहे .आणि वरुड तालुक्यासाठी ती एक अभिमानाची बाब आहे .वरुड तालुक्यामध्ये तसेच मोर्शी तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार करण्यामध्ये या भागातील माजी आमदार मा. कृषिमंत्री व विद्यमान खासदार डॉक्टर अनिल बोंडे व वसुधा बोंडे यांनी खूप पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रातील नामवंत आयएएस अधिकारी तसेच नामवंत वक्ते बोलावून त्यांनी या भागात व्यापक जनजागृती केली आहे. माझे देखील अनेक कार्यक्रम त्यांनी वरुड आणि मोर्शी तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेमध्ये घडून आणलेले आहेत. आज नम्रता आयएएस झाली. तिने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसमोर एक आदर्श ठेवलेला आहे. नम्रता तुम्हाला मार्गदर्शन करायला तुमच्याशी बोलायला सदैव तत्पर आहे. सप्टेंबरमध्ये तिचे प्रशिक्षण सुरू होणार आहे .तोपर्यंत ती आपल्या भागातच आहे .तिच्या मार्गदर्शनाचा लाभ आपण घेतला पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते .
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती .
9890967003