अनपेक्षितपणे असं कौतुक पदरात पडलं की म
————————————————————–पडसावल्या.. भावल्या..
कधी कधी हाती आलेलं धनं अचानक हातून निसटू पहातं, तसं काहीसं माझ्या बाबतीत , आपण त्या दिवशी मला भेटला नसतात व मला
तुम्ही तुमच्या” पडसावल्या” माझ्या हाती दिल्या नसत्यात तर तसंच घडलं असतं, एवढेच सांगते प्रतिभा ताई.
फार लवकर जग पाहिलं नि पारखलं, त्यातून तावूनसुलाखून तुम्ही निघालात असे तुमची कविता वाचून नक्की मला वाटते आहे.
जो जीवनाला अगदी खेटून डोळे फाडून अनुभवतो तोच अशी अस्सल शब्दकळा लिहू शकतो हे माझे स्पष्ट मत आहे. आपल्या प्रत्येकच अष्टाक्षरीतून जीवनाचे असे काही कटू दर्शन घडवले आहे की, मला वाटते कोणत्या कवितेची किती तारीफ करू. शिवाय आपली मुक्तछंदातील कविताही अशीच जीवनाचे अथांग दर्शन घडवणारी आहे. प्रत्येक कविता वाचून मी थक्क झाले हो..
सागर तळातले हे अस्सल पाणीदार मोती वेचता वेचता माझी दमछाकच झाली म्हणाल तरी चालेल. लक्षात ठेवा, माझा प्रत्येक शब्द खरा नि खराच आहे.
माझी लेखणी उगाच कुणालाही दाद देत नाही व जिथे द्यायला हवी तिथे ती थांबतच नाही.
“ लेकराच्या प्रेमापोटी
माय गांधारीचा जन्म
सागराला मोत्याचेही
कधी कळले ना मर्म”…
वाह वा.. अवघ्या काही शब्दात तुम्ही आईचं कर्तृत्व मांडलंय त्याला तोड नाही. जास्त भाष्य करण्याची गरजच नाही. म्हणून म्हणते, जीवन तुम्हाला फार लवकर कळले हो. . नाहीतर ८५ गोवऱ्या गेल्या तरी लोकांना उमजत नाही ते नाहीच! हॅटस् ॲाफ यू ताई….
“ कळेल का पाखरांना
तिच्या खोली उखळाची
पांभरीला टांगलेली
झोळी फाटकी बापाची”…
चारच ओळीत आईबापाचा ग्रंथ लिहिला ताई तुम्ही..इतकं मार्मिक तुम्ही लिहिता. खूप वर्षांनी इतकी तळ गाठणारी कविता माझ्या वाट्याला
आली नि नवे काही शब्द माझ्या झोळीत टाकू शकले हे मी माझे भाग्य समजते.
“एका देवाचे लेकरं
त्याने केली का फाळणी
याच लेकरांनी देवा
तुझी केलीय वाटणी”
कसं सुचतं हो इतकं छान, सोपं, मार्मिक?
कुस, कवितेत तुम्ही म्हणता…
“सुख आहे वांझ येथे
कशी भरू त्याची ओटी
तरी फुलतात कशा
ओळी कवितेच्या ओठी”…
मला वाटते, माझ्याच प्रश्नाचे उत्तर तुम्ही इथे दिले आहे. जास्त भाष्य करण्याची गरज नाही.
प्रत्येकच कवितेवर मला लिहावेसे वाटते आहे,
इतके ते अनोखे दागिने आहेत जे तुम्हालाच शोभून दिसतात. तुमची शिकवणी लावावी की काय असा क्षणभर मला मोह झाला. नाही हो नाही..” तेथे पाहिजे जातीचे”. ते तुम्हीच लिहू शकता.
म्हणूनच तर तुम्ही वेगळ्या आहात ना?
अशाच रहा व सुंदर मोत्यांचा नजराणा आमच्या ओंजळीत टाकून आम्हाला समृद्ध करा.
॥“ जीवेत शरद: शतंम्..॥
हाच माझा आशीर्वाद आहे तुमच्या साठी..
आपलीच..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २७ ॲाक्टोबर २०२४