या झोपडीत सुद्धा माणूस राहतो : वेदनेच्या कल्लोळाचे आक्रंदन
गझलकार प्रकाश बनसोड यांचा *या झोपडीत सुद्धा माणूस राहतो* हा गजलसंग्रह अत्यंत प्रभावी व तरल मनाचा भावगर्भ उलघडणारा आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.या गझलसंग्रहाचे वाचन केले. पण समीक्षा लेखन केले नव्हते. आज काही कामे हातावेगळी ठेवून यावर समीक्षा लेखन केलेले आहे.
गझल ही मानवाच्या भावस्पंदनाच्या उत्कृष्टतेचा मुक्त आविष्कार असतो. ती सत्यनिष्ठ असावी अनेक गझलकार फक्त कल्पना करून गझलरचना करतात, त्यामुळे त्यांची गजलजाणिवा अस्सल वाटत नाही. पण प्रकाश बनसोड हे समाजाला नवा प्रकाश देणारे स्तोत्र वाटतात .कारण त्यांच्या गझल मधून माणुसकी, प्रेम ,सहानभूती, बांधीलकी, बंधुभाव ,न्याय, सामाजिक परिवर्तन अशा विविध प्रक्रियेतून त्यांची गझल संपृक्त झालेली आहे. ते आपल्या मनोगतात लिहितात की,*माझ्या लिखाणाचा पिंडा हा वास्तविक, सामाजिक व आंबेडकरी विचारांशी जोडला असल्याने जे भोगले अन पाहिले तेच अपसूकच उमटत राहिले. मानवी मनोभावेतील जिवंतपणा जपण्याचा प्रयत्न मी केला आहे. स्वतः चांगले जगणे व दुसऱ्यांना चांगले जगवावे हा सुद्धा ज्या गझलचा संदेश आहे. हे विचारच कवीची मोठी ताकद आहे.
सब्बे सत्ता सुखी होंन्तू असा बुद्ध विचार त्यांनी या गझलमधून मांडलेला आहे ते आपल्या गझलमधून व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारत आहेत. यशवंत मनोहर सत्याचा आग्रह धरताना लिहितात की, माणसाचा आणि मानवी जीवनाचा पराभव कवी मान्य करीत नाही. माणसाच्या सप्नांना कितीही मारले तरी माणसाला स्वप्नशून्य करणे आजवर जगात कोणालाही शक्य झाले नाही. सर्व प्रकारच्या शोषणसत्ताकांचा इतिहास स्वप्ने मारण्याचा असला तरी माणसाचा इतिहास स्वप्ने जन्माला घालण्याचा इतिहास आहे. मरणाच्या पावसातही हा माणूसच सप्नांची पुन्हः पुन्हा लागवड करतो . महाअरीस्टांच्या गर्दीत त्याच्या उमेदीला अंकुरेने येणे कधी थांबले नाही. आजवर माणसाने आपली स्वप्न जिवंत ठेवली आणि या सप्नांनानेही माणूस जिवंत ठेवला .स्वप्नांची हत्या आणि स्वप्नांची जन्मजिद्द हा खरा मानवी जीवनातला संघर्ष आहे. या स्वप्नांनी माणसाला आणि त्याच्या माणुसकीलाही झगडत निरंतर जिवंत ठेवले आहे. हे सत्य जीवनाचे सर्वश्रेष्ठ सत्य आहे. ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
मराठी गझलकरांनी ही भूमिका आपल्या प्रतिकृतीमध्ये नक्कीच वापरली पाहिजेत .आणि हीच भूमिका *या झोपडीत सुद्धा माणूस राहतो* या गझलसंग्रहामध्ये प्रकाश बनसोड यांनी वापरलेली आहे. त्यामुळे त्यांची गझल ही मानवतेचा आग्रह धरणारी आहे . हे म्हणणे वावगे ठरणार नाही.
या गझलसंग्रहाला विद्यानंद विश्वेश्वर हाडके यांनी आपली प्रस्तावना दिलेली आहे. ते प्रस्तावनेत लिहितात की ,सर्वसामान्य माणसाचं जगणं प्रभावीपणे मांडण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांची गझल आशावाद जगवणारी आणि प्रश्नांमधून उत्तर देणारी ही आहे. ही भूमिका गजलकारांच्या गझलमध्ये अत्यंत प्रभावीपणे रेखाटली आहे. .
या झोपडीत सुद्धा माणूस राहतो या गझलसंग्रहात एकूण त्र्याऐंशी गजल आहेत. अत्यंत करूण मनाचा भावगर्भ यामधून प्रस्फोटीत झालेला आहे. पहिलीची गझल माणसाच्या जीवनातील दुःख ,वेदना, आक्रमण यांनी व्यक्त झालेली आहे. ते लिहितात ,
दररोज माल यातनांच्या भट्टीत भाजतो
या झोपडीत सुद्धा माणूस राहतो..
माझी झोपडी तुमच्या राजमहालाहून श्रेष्ठ आहे. कारण तीथे माणूस नावाचा सुंदर प्राणी राहतो. त्याला कोणतीही अभिलाषा नाही. तर मुक्त स्वच्छंद जीवनाचा आनंद घेतो. दुःखावर तो मात करतो. ही गझलच गजलकरांचे सामर्थ्य उलघडून दाखवणारी आहे.
सुरेश भट हे मराठी गझलचे एक प्रसिद्ध गझलगार होते. त्यांनी मराठी गझलला एक नवाच आकृतीबंध दिलेला आहे. त्यांच्या गझल मधून भावनास्पंदने अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झालेले असतात. त्यांनी मराठी गझलला एक बैठक दिलेली आहे. ते आपल्या एका गझल मध्ये लिहितात
इतकेच मला जाताना शरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
ही अप्रतिम अशी गझल आहे .त्याच धर्तीवर गजलकार प्रकाश बनसोड आपल्या भावनेला मुक्त करतात. *पुर* गझलमध्ये त्यांनी वस्तीची अवस्था व सैनिकांना सलाम केलेला आहे.
वस्तीत पूर आला, आता निघून गेला जाता असंख्य डोळे ओले करून गेला
आहे सलाम माझा या देश सैनिकाला धोक्यातही धिराने योद्धा लढून गेला
गझलकरांच्या मनातील खोलवर असलेले विविध धागे या गझलमधून प्रतिबिंबित झालेले आहेत.
प्रकाश बनसोड हे पेशाने शिक्षक असल्याने त्यांची भूमिका ज्ञान वाटणाची आहे. त्यांना वाटते की माझे विद्यार्थी हे या देशाचा पाया आहेत .म्हणून त्यांना आपण चांगलं शिकवलं पाहिजे. चांगले त्यांच्या संस्कार केले पाहिजेत. आणि ते संस्कार महात्मा जोतीराव फुले यांच्या शिक्षणातून ज्याप्रमाणे प्रभावीत झाले त्याच प्रकारचे माझे पण विद्यार्थी घडावे असा आशावाद त्यांनी आपल्या या गजलसंग्रहामध्ये मांडलेला आहे .
कधी आणतो गरीब मुलास पुस्तक पाटी
परिस्थितीचे मर्म जाणतो शिक्षक माझा
शिक्षक हा देशाचा आधारस्तंभ आहे. शिक्षकांमध्ये असलेला आदर्श हाच देशाला उंच शिखरावर घेऊन जाऊ शकतो. शिक्षक हा आदर्श असला पाहिजे .शिक्षकाचे संस्कार हे पुढील पिढीला नवी वाट दाखवत असतात. म्हणून शिक्षक माझा या गझल मधून त्यांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे.
प्रकाश बनसोड यांच्या मनावर तथागत गौतम बुद्धाच्या विचाराचा प्रभाव आहे. ते बुद्ध तत्त्वज्ञानाला आपला श्वास मानतात. ते मी बुद्ध कोरला पाहिजे या गझलमधून दिसून येते ,
मातीमधला, खाणीमधला दगड शोधला पाहिजे
त्या दगडावर कलाकृतीने बुद्ध कोरला पाहिजे.
आपली कलाकृती बुद्धाचा विचार करणारी असावी. मनुवाद्यांनी रचलेल्या अमानुष्येला नष्ट करणारी असावी ही त्यांची आर्जव आहे.ही अत्यंत महत्त्वाची गझल आहे. आपला देश कृषीप्रधान असताना, आज शेतकरी दैनावस्थेला पोहोचला आहे .खाजगीकरण ,उदारीकरण, जागतिकीकरण यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे .अन्नदाता हा दुःखी जीवन जगत आहे. कधी कधी तो आत्महत्या सारखा मार्ग पण निवडत आहे. यामुळे गझलकाराना दुःख आहे. ते दुःख त्यांनी अत्यंत आवेगात्मक मांडलेले आहे .
का इथे या करष्टकर्त्या माणसांचा? गाय -बैल सारखा हा जन्म सरतो
प्रश्न हा इथल्या व्यवस्थेलाच आहे बाप का माझा जहर घेऊन मरतो ?
शासनाच्या ध्येय धोरणामुळेच शेतकरी आज जहर घेऊन जीवन संपतो. पण सरकारला त्याचे काही देणंघेणं नाही. शेतकऱ्याची व्यथा गेंड्याच्या कातडी पर्यंत पोहोचत नाही. कारण राजकारणाची दिशा बदललेली आहे. आजचे राजकारणी स्वार्थहितैष झालेले आहेत. स्वतःच्या आयुष्यासाठी देशाला आणि महाराष्ट्राला विकण्याचा डाव आखत आहेत. त्याचा डाव उलठवण्यासाठी आज आपण एक झालो पाहिजेत. शेतकऱ्याच्या आंदोलनाला आपण पाठिंबा दिला पाहिजेत. आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवी वाट उगवली पाहिजेत. ही भूमिका गझलकरांची आहे. आणि गजलकरांची ही भूमिका अत्यंत प्रभावी आणि वाचकाला अंतर्मुख करणारी आहे.
या झोपडीत सुद्धा माणूस राहतो .हा गझलसंग्रहातील प्रत्येक गझल स्वतःच सामर्थ्य घेऊन व्यक्त झालेले आहे. साधे शब्द व बोलकी प्रतिमा या गझलचे वैशिष्ट्य आहे. प्रमोद वाळके याच्या बर्ल्ब मधेन गझलचे महत्व विशद केले आहे.शपथेचा घास, ठिगळ ,येथे अनेक आहे, माझी खरी कहाणी ,बोट बा भीमाचे, काय टाकू झोळीत मी , या गझला अत्यंत प्रभावीपणे रेखाटल्या आहेत.या झोपडीत सुध्दा माणूस राहतो .हा गझलसंग्रह वेदनेच्या कल्लोळाचे आक्रंदन आहे. मानवी सभ्य समाजाची निर्मिती करणारी ही गझल. माणसामाणसातील प्रेम वाढवणारी व अमानुषेला नकार देणारी आहे. गजलकराने भावलेला फक्त कल्पनेचा मुलामा दिला नाही तर वास्तव चिंतनाचा सहसंयुजबंध बांधला आहे. यातून समाजाला नवा आशावाद प्राप्त होईल हीच अपेशा व्यक्त करतो. गझलकार प्रकाश बनसोड यांना पुढील गझलसंग्रहासाठी मी मंगलकामना चिंतितो..!!
प्रा.संदीप गायकवाड,
नागपूर
9637357400