भावनिक शोषण.!
दहा वर्षे रमेश त्याच कारखान्यात क्लार्क म्हणून काम करत होता.आमदार साहेबांचा कारखाना होता तो.आमदार साहेबांवर रमेश फार प्रेम करत असायचा.साहेबांचा ही त्याच्यावर फार जीव होता.अधून मधून साहेब कारखान्यावर आले की,रमेश उठून पुढं जायचा.साहेबांच्या पाया पडायचा.साहेब त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी बोलायचे. रमेशची ओळखच साहेबांचा लाडका कार्यकर्ता अशी झालेली होती.परंतु रमेश जे काम करायचा त्याच्या कामाच्या बदल्यात त्याला मिळणारा पगार फार कमी होता.पण साहेबांच्या प्रेमाखातर त्याने ती वेदना कधीच बोलून दाखवली नाही.साहेबांच्या मर्जिमधला माणूस म्हणून त्याचा रुबाब ही होता.
रमेशला पगार वाढावा अशी अपेक्षा होती.एक दिवस साहेब कारखान्यावर आले.नेहमीप्रमाणे रमेश साहेबांच्या पाया पडला.साहेबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.रमेश फार केविलवाणा चेहरा करून म्हणाला,”साहेब दहा वर्षे झाली, या पगारात भागत नाही.जरा पगार वाढवा.” आमदार साहेब हसले, आणि त्याला म्हणाले, ” अरे रमेश खूप दिवस झाले,तुझ्या बायकोच्या हातची म्हणजे आमच्या बहिणीच्या हातची भाजी भाकरी आणि ठेचा खाल्ला नाही.जा बरं घरी आणि घेऊन ये जेवण आज इथच जेवणार आहे मी..” हे सगळं लोकांच्या समोर घडलं.रमेशला खूप आनंद झाला.साहेबांनी माझ्या घरचे जेवण आणायला सांगितले.माझ्या बायकोला साहेब बहीण म्हणाले.त्याने साहेबाना देवच मानलं. माणसातला देव माणूस अशी उपमा देत रमेश घरी जाऊन जेवण घेऊन आलासुद्धा…
साहेबांनी सगळ्यांसमोर ती भाजी भाकरी फार प्रेमाने खाल्ली.त्या जेवणाची साहेबांनी इतकी स्तुती केली की रमेशच्या डोळ्यातून पाणी वाहिले.साहेबांच्या या प्रेमात रमेश पगार विसरून गेला.आणि आयुष्यभर गावभर फुकट मध्ये साहेबांचा प्रचार करत राहिला. माणसातला देव माणूस, राजा माणूस, गरिबांचा कैवारी असल्या उपमा देत साहेबांचे कौतुक करत राहिला. साहेबांच्या रोजच्या जगण्यात असे कितीतरी रमेश साहेबांनी घडवले होते.कितीतरी लोकांच्या घरातली भाजी भाकरी खाऊन साहेब देव झाले होते.प्रसिध्दी मिळाली होती.मतदार संघात विकासावर चर्चा न होता साहेबांच्या चांगुलपणा वर लोकं फिदा झालेली होती.रस्त्यात खड्डे पडलेले सुद्धा लोकांना दिसायचे बंद झाले होते. कारण लोकांना कधी कळलंच नाही आपलं भावनिक शोषण पिढ्यान् पिढ्या होत आहे…
आता तर उमेदवार जो भेटेल त्याच्या पाया पडत आहेत.पण तो एकदा पाया पडून आपलं मत खिशात घालून निघून जातोय हे लोकांना कळत सुध्दा नाही.आमचा महाराष्ट्र या भावनिक शोषणाला कायम बळी पडत आलेला आहे.याची मला खंत वाटत राहते.परिणामी आमच्यात देव माणसे खूप वाढली.आणि विकासाची गंगा नजरेच्या पल्याडच वाहत राहिली.
दंगलकार नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
सांगली
7020909521