शोभिवंत ही माणसे..
काल सहजच सुरेश भटांची प्रसिद्ध गझल
कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
ही गुणगुणत असतांना त्यातली एक ओळ मनाला खूप भावली.
जमवूनही तुझ्याशी माझे तुझे जमेना
इतका तुझ्या सारखा मी शोभिवंत नाही
माणसं खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्यातला एक प्रकार म्हणजे शोभिवंत माणसे.जी गोष्ट आपल्या जवळ नाहीच त्याचा आव आणून देखावा करणे म्हणजे शोभिवंत जगणे. काही माणसे अस्सल अशी असतात कि त्यांच्या जे पोटी तेच ओठी असतं.मग आपल्यात असलेली उणीव कबूल करायला ही त्यांना कमीपणा वाटतं नाही.या उलट काही माणसे फक्त जगाला दाखवायला जगत असतात.आपली वेल पोझिशन दाखवायला प्रसंगी कर्ज काढतील.पण आम्ही किती सुखात आहोत हे दाखवतील.भौतिक सुविधांचा देखावा दाखविणात का,पण बापडे बरीच माणसे भावनांचा ही देखावा करतात.वागण्याचा देखावा करतात.मदतीचा देखावा करतात. बापरे ! किती प्रकार हे देखाव्याचे.
आसवांना कोणता अधिकार होता
घाव जो झेलास होता,तो सुकुमार होता
आयुष्यात जी अगणित दुःखं येतात,त्यातले कोणतं दुःख अधिक देखणं हे ठरविण्याचा अधिकार जसा आसवांना नाही.तसाच एखाद्याच्या प्रति खोटी सहानुभूती दाखवायचं अधिकार तरी आपण आपल्याला का द्यावा ? समोरच्याशी प्रतारणा करतांना खोल काळजात कुठं तरी कळ उठली नाही तर आपण आपलं माणूसपण तपासून पाहायलाच हवं.म्हणून तर सुरेश भट म्हणतात कि –
मी सोडणार नाही,हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे आणिक कोणीच संत नाही
दुनिया खूप मोठी असली तरी आपल जगणं मरणं एका ठराविक परिघातच असतं.खूप खूप तर चार दोन शहरे,एक दोन खेडी इतकाच आपल्या जगण्याचा व्यास.त्यातही आपण सगळी माणसंच.संत जरी असली तरी ती ही माणसेच की.त्यात बऱ्या वाईट प्रवृत्ती असणारच.
मग निखळ मनाने का जगू नये.
माणसं आता यंत्रागत वागतात.फायदा असेल तरच मैत्री करतात.
आजूबाजूची संवेदनशिलता आता हरवून गेली आहे.
मी रंग पाहिला या मुर्दाड मैफलीचा
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही
अशीच काहीशी गत झालेली आहे.जीवनाची मैफिल मुर्दाड वाटावी इतकी माणसे कोरडी ठाक झाली आहेत. कुठेच माणुसकीचा ओलावा दिसत नाही. फक्त शब्दांची जुळवाजुळव करून मांडलेली खोटी सहानुभूती काय कामाची.याच अर्थाचा एक उर्दू शेर आठवतो तो असा –
लफ्जो मे ही पेश कीजिएगा अपनेपन की दावेदारिया,
ये शहर ए नुमाईश है, यहाँ अहसास के जौहरी नही रहते.
लोकांना तुमच्या हृदयात काय खळबळ चालली आहे याच्याशी काही देणे घेणे नसते. म्हणून तर समोरून आलेला माणूस जेव्हा आपल्याला विचारतो कि काय,कसं काय चाललंय ? तेव्हा आपण त्याला खोटं हसून म्हणतो कि हो,बरं चाललय.पण खरं काय चाललं हे सांगायला मन ही धजावलं पाहिजे.
हकीकत से सामना हुवा तो पता चला कि, लोग सिर्फ बातो से अपने थे.
मनातलं सगळंच व्यक्त करता येत नाही. म्हणूनच माणूस एकांतात रमतो आणि एक एक माणूस जणू निर्मनुष्य जंगल होऊन जगतो.म्हणूनच कि काय गमतीने असं म्हणतात कि –
लोग मरते थे,आत्मा भटकती थी
अब आत्मा मर चुकी है,लोग भटक रहे है
आजूबाजूला आत्मा आणि स्वत्व हरवलेले किती तरी पुतळे आपल्याला फिरतांना दिसतात.मला ज्या गोष्टी जमत नाही,त्या ही मी फुशारकी ने येतातच असे सांगत फिरतो.असं सांगून जग फसेल पण आत्म्याचं काय ? त्याला तर सगळं खरं माहित असतं.मग कुठवर असे मुखवटे घालून मिरवायचं ? जसे आहोत तसेच दाखविण्यात काय कमीपणा आहे ?
-सुजाता नवनाथ पुरी
अहमदनगर
8421426337