मतदान वाढीसाठी निवडणुक आयोगाची भन्नाट योजना
मतदार नोंदणी साठी निवडणुक आयोगाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.या उपक्रमाचा नव मतदारांनी फायदा घेवून.मतदारांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन आयोगाकडून केले जात आहे.राज्याच्या निर्णय प्रक्रियेत तरूण मतदारांना सहभागी करून घेण्यासाठी, त्यांची मतदार यादीत नोंद आवश्यक आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केल्यास राज्यातील अठरा वर्षांवरील सर्व तरुण पिढीला निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे शक्य होईल. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी १ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत मतदार यादीत आगाऊ नोंदणी करण्याची संधी आहे. या कामामध्ये महाविद्यालये चांगल्याप्रकारे भूमिका बजाऊ शकतात.या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी आणि मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे उत्कृष्ट आयोजन करणाऱ्या महाविद्यालयांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कार’ देण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अधिकाधिक महाविद्यालयांना सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कार योजनेत भाग घेण्यासाठी गुगल फॉर्मवर १५ डिसेंबरपर्यंत आवश्यक माहिती भरायची आहे. यामध्ये महाविद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या, १ जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयातील १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, मतदार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, मतदार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी, मतदार जागृतीसाठी महाविद्यालयाने राबवलेले उपक्रम तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांतर्गत मतदार जागृतीसाठी राबवलेले उपक्रम आदींची माहिती भरावयाची आहे. महाविद्यालयांनी अधिक माहितीसाठी democracybook2022@gmail.com या ई-मेल आयडीवर पत्त्यावर संपर्क साधावा, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
महाविद्यालयातील तरुणांनी निवडणुक आयोगाच्या या भन्नाट कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपले नाव नव मतदार म्हणून नोंदवून घ्यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १८ ते १९ वयोगटातील तरुणांची टक्केवारी ३.७६( ४७ लाख ८३ हजार ७०)इतकी आहे मात्र मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त ०.२७ इतकी म्हणजेच फक्त तीन लाख ४८ हजार ६९१ इतकी आहे ही स्थिती निराशा जनक आहे वीस ते २९ या वयोगटातील मतदारांच्या संख्येबाबतही थोडेफार फरकाने ही स्थिती आहे या वयोगटाची टक्केवारी फक्त १२.१९% इतकीच आहे.ही आकडेवारी मतदार नोंदणी प्रती निरुत्साह दाखविणारी आहे.म्हणून युवा मतदारांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने महाविद्यालयीन स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे तसेच गाव पातळीवर देखील १-७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे तृतीयपंथी सेक्सवर्कर दिव्यांग तसेच बंटी समाज जसे की भटके भटके विमुक्त यांच्या मतदार नोंदणीसाठी देखील विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याचा लाभ नव मतदारांनी घेवून लोकशाही व लोकशाही प्रक्रियेला बळकट केले पाहिजे.
भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. आणि म्हणूनच महाराष्ट्रासारख्या मोठ्या शहरी राज्यात कमी मतदार नोंदणी कडे भारताच्या लोकशाही चौकटीत रचनात्मक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी पुरेसे धोरणात्मक लक्ष देणे आवश्यक आहे. सर्व समावेशक आणि चैतन्यशील लोकशाहीच्या दिशेने मतदार नोंदणी ही पहिली पायरी म्हणता येईल. विशेषत: भारतातील शहरी भागातील लक्षणीय वाढ लक्षात घेता, मतदार यादीत नाव नोंदवण्याची तरुणांची, विशेषत: शहरी भागातील अनिच्छा दूर करणे आवश्यक आहे. येत्या दशकात लोकसंख्येच्या दृष्टीने जागतिक स्तरावर डेमोग्रफिक डिव्हीजनच्या फायदेशीर स्थितीबाबत बहुपक्षीय स्तरावर भारतासाठी हा मुद्दा देखील महत्त्वाचा ठरणार आहे.
-प्रा डॉ सुधीर अग्रवाल
९५६१५९४३०६