आरोग्य विभागामुळे मेळघाटातील साथ आटोक्यात
गौरव प्रकाशन अमरावती, (प्रतिनिधी) : मेळघाटातील जामली येथे अतिसाराची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झाली. आरोग्य विभागाने केलेल्या तातडीच्या प्रतिसादाने येथील साथ आटोक्यात आली आहे.
स्थानिक मोहन गायन यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांना अतिसाराची लागण झाल्याची माहिती दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र टेम्ब्रुसोंडाच्या अंतर्गत जामली उपकेंद्रातील जामली गावामध्ये अतिसाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याचे निदर्शनास येताच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या जिल्हास्तरीय शिघ्र प्रतिसाद पथकातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. सुभाष ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी आणि पथकातील सदस्यांनी गावाला तातडीने भेट दिली. तसेच सखोल चौकशी करून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या.
गावात दोन सार्वजनिक विहिरी असून एका विहिरीच्या आजुबाजूला नाली असल्याने पाणी साचून ते पाणी विहिरीत झिरपते. तसेच दुसरी विहिर नदीकाठी असून नदीचे गढुळ पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. या विहिरीचे पाणी नमुने दुषित आढळुन आलेले आहे. गावात 2 पाण्याच्या टाक्या असून 1 टाकी 50 हजार लिटर, तर दुसरी 30 हजार लिटर क्षमतेची आहे. नळ योजनेमार्फत घरोघरी पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु गावामध्ये ठिकठिकाणी नळजोडणी फुटल्याचे आढळून आले आहे. गावात खताचे ढिगारे, तुडुंब भरलेल्या नाल्या, तसेच सर्वत्र अस्वच्छता असल्याने डासांच्या घनतेत वाढ झाली आहे. त्यामुळे तापाच्या रुग्णात वाढ झाली आहे.
जामली येथील जिल्हा परिषद शाळेत रुग्णांसाठी उपचारार्थ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. याठिकाणी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच रुग्णांना संदर्भीत करण्यासाठी दोन रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी 436 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
गावात 9 चमूकडून घरोघरी साथरोग सर्वेक्षण करण्यात येत आहे. दररोज पाणी नमुन्यांची ओटी चाचणी करण्यात येत आहे. तसेच आरोग्य पथकाद्वारे दररोज किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. गावात डासनाशक औषधांद्वारे धुरफवारणी करण्यात आली आहे. नाल्यांमध्ये टेमीफोस अॅक्टीव्हीटी राबविण्यात आली. डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्यात आले आहे. घरोघरी पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी मेडीक्लोरचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या उपायायोजनांमुळे याठिकाणीच परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्हास्तरीय साथरोग नियंत्रण कक्षातील अधिकारी जामली येथे नियमित भेटी देत आहे. तसेच तेथील परिस्थतीचा नियमित आढावा घेत आहे. सध्या साथरोग परिस्थिती नियंत्रणात आहे