हिवरखेड रेल्वे स्थानक बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण !
खासदार डॉ अनिल बोंडे, खासदार अमर काळे यांच्या मतदार संघातील नागरिकांची गैरसोय !
तत्काळ तोडगा न निघाल्यास संतप्त नागरीक रेल रोको आंदोलनाच्या तयारीत !
गौरव प्रकाशन मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : नरखेड – अमरावती रेल्वेमार्ग सुरू झाल्यापासून मोर्शी तालुक्यातील हिवरखेड स्थानकावर थांबणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचा थांबा २५ जुन रोजी रेल्वे विभागाने पत्र काढून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर हिवरखेड परिसरातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा रेले रोको आंदोलन करण्याचा इशारा मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी रेल्वे प्रशासनाला दिला असून मोर्शी, पाळा, हिवरखेड रेल्वे स्थानकातील विवीध समस्या व मागण्या निकाली काढण्याची मागणी रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव, खासदार अमर काळे, आमदार देवेंद्र भुयार, विभागीय रेल्वे प्रबंधक यांच्याकडे करण्यात आली.
रेल्वे विभागाने मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथील रेल्वे स्थानकावरील बडनेरा नरखेड विशेष मेमु ट्रेन ०१३६९, ०१३६७, नरखेड इंटरसिटी एक्स्प्रेस १७६४१, काचीगुडा इंटरसिटी एक्स्प्रेस १७६४२, नरखेड बडनेरा विशेष मेमू ट्रेन ०१३७०, ०१३६८ या सर्व गाड्यांनी परिसरातील विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करत होते या सर्व रेल्वे गाड्या बंद केल्यामुळे सदर गाड्यांनी परिसरातील २५ हजार लोकसंख्या असलेल्या हिवरखेड रेल्वे स्थानकावरील रेल्वे गाड्यांच्या थांब्यामुळे हिवरखेड आणि परिसरातील १० गावांतील नागरिक आणि प्रवासी आपल्या कामासाठी या गाड्यांचा उपयोग करत असतात. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रवाशांना अंधारात ठेवून रेल्वे विभागाने हिवरखेड गावांचा थांबा रद्द करण्याचा घाट घातला आहे.
हिवरखेड रेल्वे स्थानक सुरू न झाल्यास शेकडो विद्यार्थ्यांना अनेक प्रवाशांना त्यांच्या शासकीय कामकाज, उपचार आणि नोकरीधंद्यासाठी नागपूर, अमरावती, अकोला शेगाव तसेच राज्यातील अनेक शहरांना जाण्याचा पर्याय बंद होणार आहे. मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून ऑरेंज सिटी म्हणून ओळख बनत असतांना थांबा बंद झाल्यास अन्यायकारक होईल. त्यामुळे रेल्वे विभागाने तातडीने आपला निर्णय बदलावा, नाही तर रेल रोकोसारख्या तीव्र आंदोलनाला सुरुवात करावी लागणार असल्याचे या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी यावेळी सांगितले असून मोर्शी वरूड तालुक्यातील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर सर्व सोई सुविधा निर्माण करून नरखेड अमरावती मार्गावरील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर तीकीट सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून या गंभीर समस्येचा तातडीने विचार करावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाला करण्यात आली.