मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Contents
hide
माणूस जन्माला येतो तेव्हा तो एक पवित्र जीव असतो. त्या पवित्र जीवावर लहान वयात सर्वच जाती धर्माचे प्रेम करतात. जेव्हा सर्व धर्माचे जातीचे त्या पवित्र लहान जीवाचे लाड पुरवतात तेव्हा त्या पवित्र जीवाला हे संपूर्ण विश्व किती चांगले आहे आणि किती चांगले लोकं आहेत हे त्याला वाटू लागतं. परंतु तो जसा जसा मोठा होतो तस तसे त्यावर समाजाचे संस्कार होत असतात. त्याला लहानपणीचा अनुभव व मोठे होण्याचा अनुभव हा वेगळा जाणवत असतो. अशाच ह्या माणसाच्या जीवन चक्रातून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्मा पासूनच जातीय व्यवस्थेचे चटके सोसावे लागले. वर्गाच्या बाहेर शिक्षण घ्यावे लागले. काय वाटले असेल त्या कोमल जीवाला. एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय. परंतु शिकवण ही झाली होती की सर्व लेकरं देवा समान. सर्व लेकरं देवा घरची फुल. मग ह्या देवा घरच्या सर्व समान लेकरांना हा वेग वेगळा न्याय का ? किती द्वंद्व चालले असेल ह्या लहानशा डॉ. बाबासाहेबांच्या मनामध्ये.
आपण संपुर्ण डॉ. बाबासाहेबांचे जीवन बघितले तर त्यांनी हाल व अपमान सहन केले. एव्हडी विद्वत्ता असून सुद्धा का अपमान सहन करायचा ? ह्या विचाराने किती त्यांना त्रास झाला असेल. ह्या समाजातील एव्हढी विदरक्ता बघून किती त्यांना त्रास झाला असेल. परंतु हा बदल झाला पाहिजे माणूस म्हणून माणसाला माणूसपण मिळाले पाहिजे केव्हढा मोठा विचार. हा समाज जरी माझ्या सोबत वाईट वागला तरी मी ह्या समाजाचे कल्याण करीन. त्यांनी द्वेषाचे उत्तर प्रेमाने दिले. किती मोठे तत्त्वज्ञान. तुम्ही आम्हाला कुचला, तरी आम्ही उभारी मारू, किती मोठी जिद्द, किती मोठा आत्मविश्वास. अनुकूल परिस्थिती असताना प्रगती करणे वेगळे परंतु प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून समाजासाठी जीवन जगणे वेगळे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षना शिवाय काही दुसरा प्रगतीचा मार्ग नाही हे ओळखले होते. म्हणून त्यांनी अहोरात्र अभ्यास केला. एकदा तर इंग्लंडच्या ग्रंथालयात ते अभ्यास करीत असताना ग्रंथपाल एक दिवस त्यांना ग्रंथालय बंद करतांना सांगायचे विसरून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा ग्रंथालय उघडले तर आश्चर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचण्यात मग्न होते.ते जेव्हा पुस्तक वाचत तेव्हा दिवस रात्र विसरून जात. केव्हढी ही अभ्यासाविषयी गोडी. सर्व विद्यार्थ्यांना ही प्रेरणादायी ठरणारी आहे.
डॉ. बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने मानवतावादी होते. अगोदरचा काळ तर जाऊच द्या ह्या तंत्रज्ञाच्या युगात सुद्धा मणिपूर सारख्या घटना घडतात. स्त्रियांना अपमानित केले जाते. २४ फेब्रुवारी १९४९ ला संसदेत हिंदू कोड बिल मांडले. काय होते हे हिंदू कोड बिल ? तर ह्या हिंदू कोड बिलामुळे स्त्रियांना सन्मान मिळणार होता. ह्यात बहुपत्नीला नकार, घटास्पोटा नंतर पोटगीचा अधिकार, स्त्रियांना समान वारसा हक्क. हे हिंदू कोड बिल काही विशिष्ट समाजासाठी नाही तर भारतातील संपूर्ण स्त्रियांसाठी होते. केव्हढी ही मानवता.
सर्व कामगारांना योग्य न्याय मिळाला पाहिजे म्हणून कामाचे तास ठराऊन देणे. सर्वांना बोनस मिळावा यासाठी कायद्यात तरतूद. पी. एफ., ग्रॅच्युइटी चा अधिकार प्राप्त करून दिला. सर्व कामगारांना ह्यामुळे न्याय मिळाला व त्यांचे जीवन सुरळीतपणे पार पडले व पडत आहे. केव्हढी ही महानता व मानवता. स्त्रियांना भर पगारी प्रसूती रजा मिळऊन दिली. ह्याचा अगोदर कोणी विचार सुद्धा केला नाही. केव्हढी ही महानता. परंतु दुःख ह्याचे आहे की, स्त्रियांना याची जाणीव नाही आणि आपणहून जाणीव करून घेण्याचा कोणी प्रयत्न सुद्धा करून घेत नाही.
शेतकरी जो देशाचा कणा असतो. कृषी उत्पन्नावर त्या देशाची प्रगती ठरत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळावा म्हणून आंदोलन केले. शेतकऱ्यांचा संप करणारे ते पाहिले पुढारी ठरले. शेतकरी हे सर्व धर्माचे व जातीचे असतात यांच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी ते लढले.
ह्या जगा मध्ये सर्वात जास्त संघर्ष व जीवितहानी झाली असेल तर ती म्हणजे धर्माच्या नावावर. जगामध्ये लाखो जणांचे प्राण ह्या धर्मासाठी गेले. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा अभ्यास केला एव्हढेच नाही तर त्यांना सगळ्याच धर्माचे निमंत्रण सुद्धा होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शांतीचा मार्ग देणारा मुळ भारतीय बौद्ध धर्म स्वीकारला. ज्यामध्ये भगवान बुध्दांनी वैज्ञानिकदृष्टिकोन मार्गाचा उपदेश सुद्धा दिला. किती मोठी ही मानवता. धर्म परिवर्तन म्हणजे सोपे नाही. ते ही त्याकाळी ज्यावेळी सगळे समाज बांधव हे जास्त प्रमाणात सुशिक्षित नव्हते. त्यांना योग्य दिशा देणे, धर्म परिवर्तन हे काही सोपे काम नाही. धर्मासाठी रक्ताचे पाट वाहिले आहेत. किती जणांना विश्वात आहुती मिळाली आहे. गुदमरून चेंबर मध्ये त्यांना प्राण द्यावे लागले. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एक थेंब ही ना सांडवता एव्हढे मोठे धर्म परिवर्तन केले. कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ दिली नाही. केव्हढी मोठी ही मानवता.
सर्वात मोठे उपकार डॉ. बाबासाहेबांचे आपल्या भारतीयांवर आहे ते म्हणजे त्यांनी लिहिलेली राज्य घटने मध्ये सर्वांना समान अधिकार देण्यात आला आहे. खरी लोकशाही जिवंत ठेवण्याचे व रुजविण्याचे काम संविधानाने केले आहे. ह्यात अभियक्ती स्वतंत्र आहे. आपण आपले म्हणणे, विचार व्यक्त करू शकतो. आपल्या न्याय हक्कासाठी झगडू शकतो. हे अभियक्तती स्वतंत्र व न्याय हक्क हे सर्व भारतीयांसाठी आहेत. कोणीही आपली मनमानी करू शकत नाही. केव्हढी मोठी ही मानवता सर्वांना समान न्याय देणे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा नद्या जोडण्याचा ठराव मांडला होता. उद्देश हाच होता की, सर्वांना व शेतीला मुबलक पाणी मिळावे. आज पाण्याची कमतरता काही भागा मध्ये आपल्या देशात भासू लागली हा विचार त्यांनी त्याकाळी केला होता केव्हढी ही महानता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानव हा संपुर्ण विश्वाचा केंद्र बिंदू आहे हे समजले होते. मानवाचा विकास होणे, त्याला संपुर्ण संधी देणे, त्याला न्याय देणे हा मूलमंत्र दिला. आपसा आपसातील वैर संपविणे व गुण्या गोविंदाने सर्व देशवासीयांनी राहणे हा मूलमंत्र संविधानाने दिला. गरज ही होती की हा मूलमंत्र रुजविणे, लोकशाही अधिक मजबूत करणे. परंतु आज ह्यावर आक्रमण होतांना दिसत आहे. आपण वेळीच जागे झाले पाहिजे नाही तर डॉ. बाबासाहेबांनी जे हक्क आपण सर्वांना संविधान द्वारे मिळऊन दिले ते आपण गमावून बसू.
मानव कल्याणासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेबांचा विचार सर्वांपर्यंत पोहचू या.!जय भीम जय भारत.
अरविंद मोरे,
नवीन पनवेल
मो. 9820822882.