महाराष्ट्र सरकार नोकऱ्यांसाठी खाजगी कंपन्यांच्या दारी !
भ्रष्टाचार, महागाई, नोकरशाही आणि आरोग्य सेवा सुधारणे किंवा शिक्षणाची नवी क्षितिजे उघडणे या निःसंशयपणे आपल्या देशाच्या मूलभूत समस्या आहेत. पण त्याहूनही मोठी समस्या या तरुण देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची आहे. अर्थातच गेली दोन वर्षे महामारीच्या असामान्य परिस्थितीमुळे खूप कठीण होती. पहिल्या वर्षाची सुरुवात पूर्ण बंद किंवा लॉकडाऊनने झाली, त्यानंतर अपूर्ण शटडाऊनच्या परिस्थितीतही जनजीवन विस्कळीत झाले. कोरोना विषाणूचा रंग बदलल्यामुळे आर्थिक आणि आरोग्य परिस्थिती मृत्यूचे कारण बनली. कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे आर्थिक क्रियाकलाप विस्कळीत झाले. एके ठिकाणी विकासाच्या वाटेवर चालणारा देश उत्स्फूर्त होण्याचे स्वप्न पाहत होता, तर दुसऱ्या ठिकाणी देशाचा विकासदर शून्यापेक्षा खूपच खाली गेला होता.
येथे औद्योगिक गुंतवणूक आणि कारखान्यांचा वेग मंदावला. अंतर्गत आणि बाह्य व्यवसायावर मंदी आणि मंदीची छाया गडद झाली. देशातील तरुण पिढीला शिक्षणाप्रमाणे रोजगाराची हमी पूर्वीपासूनच नव्हती, आता गुंतवणुकीचा आणि उत्पादनाचा आलेख इतका घसरला आहे की, सध्याचा रोजगारही मोठ्या प्रमाणावर छाटणी आणि विस्थापनाच्या धोक्यात आहे. आपली जबाबदारी पार पाडण्याच्या नादात सरकारने देशवासीयांना उपाशीपोटी मरू न देण्याची हमी दिली, पण त्यांच्या शिक्षण आणि पात्रतेनुसार योग्य काम देण्याची कोणतीही हमी दिलेली नाही.शासनाच्या विविध विभागात लाखोंच्या संख्येत जागा रिक्त असून देखील केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकार देखील राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत आहे.
कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये नोकर भरती होऊ शकली नाही. त्यामुळे येत्या काही कालावधीत ही वेगवेगळ्या विभागाच्या नोकर भरती होताना पाहायला मिळतील असे सरकारने स्पष्ट केले होते . मात्र गेल्या काळात नोकर भरती करत असताना अनेक वादग्रस्त निर्णय होताना पाहायला मिळाले आहेत. आता पारदर्शकपणे ही नोकर भरती राज्य सरकार कशा पद्धतीनं करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
राज्यात शासकीय कर्मचारी यांची २ लाख ४४ हजार ४०५ जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या २३टक्के जागा रिक्त आहेत. ७५ हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.मात्र या घोषणेची अंमलबजावणी करण्या ऐवजी सरकार् तरुणांना रोजगार देण्यासाठी खाजगी कंपन्यांना साकडे घालत आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी या पद्धतीने मेळावे घेऊन खासगी कंपन्यांमध्ये सरकारमार्फत भरती करण्यात येणार आहे. यामुळे एकीकडे आरक्षणासाठी राज्यातील वातावरण तापले असताना राज्य शासनाने शासकीय प्रमाणे खासगी कंपन्यांमध्ये भरती सुरु करण्यासाठी पावले उचलली आहे.
महाराष्ट्र सरकारने मुलाखतीनंतर नोकरी देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. मुलाखत झाल्यानंतर त्याच ठिकाणी ऑफर लेटर देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात यासाठी राज्य सरकार मेळावे घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे लाखो तरुणांना नोकरी मिळणार आहे.
राज्य शासनकडे लाखो पदे रिक्त आहे. त्यातील ७५ हजार पदे भरती करण्यासाठी प्रक्रिया राज्य शासनाने सुरु केली आहे. एमपीएससी आणि सरळ सेवा भरतीने ही प्रक्रिया होत आहे. परंतु यासाठी मोठी प्रक्रिया आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया, लेखी परीक्षा त्यानंतर मुलाखती होतात. त्यात वर्षभरापेक्षा जास्त कालावधी जातो. परंतु आता चट इंटरव्ह्यू आणि पट नोकरी ही योजना सुरु केली आहे. महायुती सरकार या माध्यमातून खासगी कंपन्यांमध्ये नोकरी देणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आयोजनाची जबाबदारी दिली आहे.
उमेदवारांना कोणत्या कंपनीत कोणत्या आणि किती पदांसाठी भरती करायची आहे, त्यासाठीची शैक्षणिक योग्यता काय याची माहिती दिली जाईल. उमेदवारांच्या बायोडेटांची छाननी करून काहींना मुलाखतीनंतर तिथेच नोकऱ्या दिल्या जातील. तर काहींना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि मार्गदर्शन केले जाईल. नागपुरच्या मेळाव्यासाठी इच्छुक तरुण-तरुणींची नोंदणी या आठवड्यात सुरू होणार आहे.
सरकारी विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी नऊ खासगी संस्थांची नियुक्ती देखील करण्यात आली होती. मात्र, विरोधकांच्या विरोधानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर प्रत्येक शासकीय विभाग आपल्या पातळीवर अशी भरती करतील अशी भूमिका राज्य सरकारने जाहीर केली होती. शासन आपल्या दारी कार्यक्रमामार्फत सामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता तरुण तरुणींना खासगी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करुन महायुती सरकारने जनमानसात आपली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
– प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६
ReplyForward |