“थोडेच पाहिजे रे, ते दान दे जरासे”
“पोटास भाकरीचे., ते पान दे जरासे”
महाराष्ट्राची साहित्यिक परंपरा संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ , संत तुकाराम, संत गाडगेबाबा यासारख्या संतांनी साहित्यातून महाराष्ट्राच्या मातीत रूजवली त्यांनी आपल्या साहित्यातून समाजातील अनिष्ट रूढ़ी, अंधश्रद्धा, बुवाबाजी यावर समाज प्रबोधन केले आहे , आणि हाच वारसा अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकांकडेही परंपरेने चालत आला आहे. त्यातच कोपरगांव तालूक्यातील संत जनार्दन स्वामी महाराज, संत जंगलीदास महाराज यांच्या पदकमल स्पर्शाने पावन झालेली भूमी कोकमठाणही आज साहित्यिक वारसा जपत आहे.
संतांच्या पदकमलस्पर्शाने पावन झालेल्या मातीत कवी, गझलकार, तथा चित्रपट क्षेत्रात अभिनयाने जादूई किमया करणारे कलावंत मा राम गायकवाड़ हे साहित्याची सेवा करत आहेत. नुकतीच त्यांची आनंदकंद वृत्तातील एक ग़ज़ल वाचायला मिळाली. या गझलेचा कणा शेतकरी कष्टकरी श्रमजीवी आहे। अतिशय अर्थपूर्ण ग़ज़ल त्यानिमित्ताने वाचायला मिळाली. ती ग़झल आणि या गजलेचे रसग्रहण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ग़ज़ल याप्रमाणे
थोडेच पाहिजे रे., ते दान दे जरासे
पोटास भाकरीचे., ते पान दे जरासे
भेगाळल्या मनाला येतील चार दाणे
मातीत हिरवळीचे,, ते रान दे जरासे
आहेच या कळीचे.., सौदर्य फार मोठे
सांभाळण्या मुलीला ते भान दे जरासे
काळीज कोंडताना लाचार जीव होतो
मृत्यूस थोपण्याला.., ते प्राण दे जरासे
काबीज तू भले कर डौलात विश्व सारे
पण झोपडीस माझ्या ते मान दे जरासे
झाली सिकंदराची गर्वात ती समाधी
जिंकून हारण्याचे., ते वाण दे जरासे
गेल्या फुटून भिंती एकीतल्या घरांच्या
ऐकून टाळण्याचे., ते कान दे जरासे
-राम गायकवाड
९२८४५८०८०६
राम गायकवाड़ हे शेतकरी कुटुंबातील असून कष्टकरी जीवन त्यांच्या वाट्याला आले आहे. मातीशी दोन हात करून मातीतूनच सोन्याचे दाणे पिकवणारा हा शेतकरी. या शेतीत काय पिकते आणि किती पिकते हे जगाने अनुभवले आहे. शेतीमालाला रास्त भाव नाही. हाती आलेला सोन्याचा घास कधी दुष्काळाने होरपळून जातो, करपून जातो तर कधी पर्जन्यराजाच्या मनलहरीपणाने महापूरात सर्व वाहून जाते. शेतकरी दुःख उरात बाळून शेवटी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करतो. ही भयाण परिस्थिती पाहून गझलकार राम गायकवाड़ व्यथित होत ते या सृष्टीनिर्मात्याकडे आर्जव करतात की- “हे सृष्टीच्या निर्मात्या, आम्हाला खूप काही संपत्ती नको आहे, आमच्या ओंजळीत बसेल ईतकेच दान दे पण ते सुखाचे दान दे. स्वार्थाने बरबटलेल्या अधाशी माणसासारखे न देता टिचभर पोटाला लागेल ईतकाच भाकरीचा घास दे, आणि हा भाकरीचा घास सुखाच्या ताटात दे. आधीच दुष्काळ, महापूर, रोगराइने शेतकरी मेटाकुटीला आला आहे”. म्हणून राम गायकवाड़ आपल्या गझलेतील मतल्यात असे दान मागतात की-
थोडेच पाहिजे रे., ते दान दे जरासे
पोटास भाकरीचे., ते पान दे जरासे
जिकडे पहावे तिकडे आज स्वार्थाचा बाजार मांडला आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे तर गरिबाच्या पाजविला सटविणे टाकलेला दारिद्र्याचा टाक कितीही केला तरी बुजत नाही. यामुळे उन्हाने भूईला भेगा पडाव्यात तशा मनाला भेगा पडल्या आहेत . तरीही या भेगाळल्या भूईवर चार दाणे आनंदाचे उगवून यावे, या भेगाळलेल्या रानाप्रमाणे भेगाळलेल्या मनाला कुठेतरी सुखाचे चार दिवस पहायला मिळतील असे क्षण येऊ दे म्हणून गझलकार आपल्या पहिल्या शेरात म्हणतात की-
भेगाळल्या मनाला येतील चार दाणे
मातीत हिरवळीचे,, ते रान दे जरासे
आज समाजात महिलांवर अत्याचार , बलात्कार झाल्याचे रोज ऐकायला येते. आठ महिन्याच्या मुलीपासून तर साठ वर्षाच्या वृद्धेलाही या पाशवी नराधमांनी सोडले नाही. स्री कोणतीही असो , आजी, आई, बहिण, पत्नी, मुलगी, नात, अशा अनेकविविध नात्यांना आपण जपत आलो आहोत मात्र या नात्याला काळीमा फासण्याचं काम काही हैवान करत आहेत. या नात्यांना जपण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि तेवढी सद्सद् विवेकबुद्धी आपल्या अंगी यायला हवी म्हणून गझलकार या सृष्टीच्या निर्माण कर्त्याला विनंती करतांना आपल्या दुस-या शेरात म्हणतात की –
आहेच या कळीचे.., सौदर्य फार मोठे
सांभाळण्या मुलीला ते भान दे जरासे
माणूस हा संवेदनशील मनाचा प्राणी आहे, आपली संवेदनशीलता जपतांना कधी कधी समाजातील काही घटना मनाला अस्वस्थ करून सोडतात. या घटनांमुळे माणूस लाचार बनत जातो. ही लाचारी परिस्थितिने आलेली असते. त्यामुळे माणसाला हा जीव नकोसा होतो, उरात दडपण येते तरीही या परिस्थितीवर मात करण्यासाठी जगण्याचं बळ निर्माण झालं पाहिजे. भलेही मृत्यु समोर आला तरी या मृत्युला थांबविता आलं पाहिजे. म्हणून गझलकार पुढच्या शेरात म्हणाता की-
काळीज कोंडताना लाचार जीव होतो
मृत्यूस थोपण्याला.., ते प्राण दे जरासे
सत्ता आणि गडगंज संपत्ती मिळविण्यासाठी जो तो आज चढाओढीने प्रयत्न करताना दिसून येतो मात्र आजही समाजात गरिबी, दारिद्र्य खच्चाखच भरलेले दिसून येते. ज्यांनी प्रमाणापेक्षा गडगंज संपत्ती मिळवली त्यांना देखील ती सोबती नेता आली नाही. गरिबीची जाण ठेवली पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की राजासजी महाली, सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडित माझ्या. माणसानं कितीही श्रीमंत झाले तरी मनाने श्रीमंत व्हायला पाहिजे आणि गरिबाला तुच्छ न लेखता त्यांचाही मान-सम्मान केला पाहिजे. म्हणून गझलकार आपल्या शेरात म्हणतात की-
काबीज तू भले कर डौलात विश्व सारे
पण झोपडीस माझ्या ते मान दे जरासे
राजा सिकंदराने संपूर्ण जगावर राज्य केले, सत्ता आणि संपत्तीचा गर्व बाळगणारा , अमाप संपत्तीचा धनी असून त्याला स्वत:चा जीव वाचवता आला नाही . रिकाम्या हाताने आला आणि जातांनाही रिकाम्या हाताने गेला. जाताना त्याने सांगितले होते की, मेल्यावर माझे हात मोकळे ठेवा, जगाला दिसू द्या की ‘ मैं खाली हाथ आया था और खाली हाथ जा रहा हूं | म्हणून माणसानं श्रीमंतीचा फुकाचा गर्व करू नये. सत्ता आज आहे उद्या नसणार आहे. जगावर जरी राज्य केले तरी मृत्युपुढे तो हरला होता आणि म्हणून समाजात वावरतांना हीच हार स्वीकारण्याची दानत ठेवली पाहिजे. तसे गुण आपल्या अंगी यायला हवे. म्हणून गझलकार आपल्या शेरात म्हणतात की-
झाली सिकंदराची गर्वात ती समाधी
जिंकून हारण्याचे., ते वाण दे जरासे
समाजामध्ये आपण पाहतो की, जो तो स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतो. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे एकोपा होता. ती एक ताकद होती. मात्र आज हीच ताकद विभक्त कुटुंब पद्धतमुऴे कमकुवत होतांना दिसत आहे. घराघरात बाहेरच्या लोकांचे ऐकून भावाभावात वाद होत आहेत किंबहूना एक भाऊ दुस-या भावाचा जीव घ्यायला निघाला आहे. ज्या घरात एकी होती त्या घराच्या भिंती आज दुभंगल्या आहेत. घराघरात एकमेकांविषयी व्देषभावना निर्माण होत आहे. एकमेकांविषयी मनामनात विष कालवले जात आहे आणि रोज रोज तेच तेच ऐकून मनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. अशा ऐकण्याचं टाळता येईल का? नको त्या गोष्टी आपण जर टाळल्या तर जीवनात सुख लाभेल आणि आज जे घराघरात वैमनस्य निर्माण होत आहे त्यात बदल घडून सकारात्मक विचार येवून सलोखा अबाधित राहिल म्हणून गझलकार आपल्या शेवटच्या शेरात म्हणतात की-
गेल्या फुटून भिंती एकीतल्या घरांच्या
ऐकून टाळण्याचे., ते कान दे जरासे
अतिशय आशय संपन्न ग़ज़ल वाचायला मिळाली. मा राम गायकवाड़ यांच्याकडून यासारख्या दर्जेदार रचना निर्माण होवो ही शुभेच्छा देतो.
-प्रशांत एस वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५०००
(तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
सर
खूप खूप धन्यवाद
आपण नेहमी साहित्यिकांना प्रकाशात आणण्यासाठी प्रोत्साहन देत आहात
खूप खूप धन्यवाद