सांघिक खेळांमुळे खिलाडी वृत्तीसह एकोपा वृध्दिंगत-जिल्हाधिकारी सौरभ कटियार
जिल्हा महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला उत्साहात प्रारंभ;
गौरव प्रकाशन अमरावती,(प्रतिनिधी): क्रीडा, कला, सांस्कृातिक स्पर्धेमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन कामाचा ताण कमी होतो. तसेच कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहुन नवचैतन्याने काम करण्यास प्रोत्साहन मिळते. सांघिक खेळांमुळे खिलाडू वृत्तीसह एकोपा वृध्दिंगत होतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज जिल्हा महसूल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
अमरावती जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन अमरावती विभागीय क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. क्रीडा स्पर्धेचे आयोजन दर्यापूर महसूल उपविभागाव्दारे करण्यात आले असून विविध खेळांच्या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सहाय्यक जिल्हाधिकारी नरेश अकूनूरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपायुक्त संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर तसेच गटविकास अधिकारी, तहसिलदार, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, महसूल विभाग हा शासनाचे महत्वाचे अंग आहे. या विभागामार्फत शासनाचे विविध योजना, निवडणूक, कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी अशा क्रीडा स्पर्धांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा ताण कमी होतो. या क्रीडा स्पर्धेत सर्व सहकार्यांनी उत्साहाने सहभागी व्हावे तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना प्रोत्साहित करावे. स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडू अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांघिक भावना व खेळाडू वृत्तीने खेळावे. खेळीमेळीच्या वातावरणात खेळाडूंनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावे, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी यांनी खेळाडू अधिकारी व कर्मचारी यांना दिल्यात.
पोलिस आयुक्त श्री. रेड्डी म्हणाले की, महसूल व पोलिस विभागात काम करणारे अधिकारी, कर्मचारी जनतेची अहोरात्र सेवा करतात. या कामाच्या ताणतणावातून व्यावहारिक जीवनात विरंगुळा मिळावा यासाठी अशा स्पर्धा अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असतात. या क्रीडा स्पर्धेचा सर्व अधिकारी व कर्मचारी खेळाडूनी मनसोक्त आनंद घ्यावा. खेळाडूंना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याचे उत्तम संधी असून या संधीचा त्यांनी लाभ घ्यावा. खेळाडूंनी ऐक्य आणि बंधुत्वाच्या भावनेतून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ध्वजारोहण करुन मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील महसूल उपविभागनिहाय पथकाव्दारे शानदार पथसंचलन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेची सुरुवात श्री. कटियार यांनी व्हालीबॉल खेळून केली. यावेळी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी श्री. लोणारकर यांनी प्रास्ताविकेतून जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची रुपरेषा व महत्त्व विशद केल. स्पर्धेमध्ये महसूल उपविभागातील अधिकारी, कर्मचारी खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून ही स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. स्पर्धेमध्ये कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बुध्दीबळ, थ्रोबॉल, रिंग टेनिस, क्रिकेट, कॅरम आणि मैदानी खेळांची स्पर्धा होणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचाही समावेश असल्याचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी सांगितले.