दिव्यांग मतदारांकडे दुर्लक्ष होऊ नये.!
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ८५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारांना आवश्यक असलेल्या १२डी नमुन्याचे वाटप सुरू झाले असून सदर नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
८५ वर्षे व त्यावरील वय असणारे तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना घरपोच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यासाठी नमुना १२ डी केंद्र अधिका-यांमार्फत भरून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.मात्र राज्यातील काही मतदारसंघात तहसील कार्यालयातील प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाचा फटका दिव्यांग मतदारांना बसणार आहे. काही मतदारसंघात
बीएलओंनी दिव्यांग मतदारांची फॉर्म १२ ड मध्ये नोंद केली नसल्याची बातमी समोर येत आहे. मतदानापासून कोणताही नागरिक वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला सुधारणा करत आहे.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या वृध्द आणि अपंग मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा लोकसभा निवडणुकीत प्रथमच उपलब्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्रा राज्य विधानसभा निवडणुकीत देखील दिव्यांग मतदारांची नोंद बिएलओ मार्फत फॉर्म ड मध्ये करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने तहसील कार्यालयाला दिलेल्या आहेत. मात्र काही मतदारसंघातील तहसील कार्यालयाच्या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. याचा फटका दिव्यांग मतदारांना बसणार आहे. मध्यंतरी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत ही सुविधा देण्यात आली होती. एरवी निवडणूक प्रक्रियेत सहभागी कर्मचारी आणि सैन्य दलातील मतदारांना टपाली मतदान करता येते. नव्याने समाविष्ट झालेल्या घटकांना ही सुविधा वैकल्पिक स्वरुपाची आहे. राज्य स्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) वृध्द आणि अपंग मतदारांना घरी १२ ड अर्जांचे वितरण केले जाते.मात्र विधानसभा निवडणुकीत काही मतदार संघामध्ये याबाबिकडे दुर्लक्ष झाल्याची बातमी समोर येत आहे. दिव्यांग मतदारांची नोंद फॉर्म ड मध्ये करायची आहे.
या नव्या पध्दतीच्या मतदानासाठी पाच जणांचा समावेश असणारे एक यानुसार पथकांची स्थापना केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत पाच जणांचे एक पथक तयार करण्यात आले होते. प्रत्येक पथकात मतदान केंद्राध्यक्ष दर्जाचा अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी, मदतनीस, पोलीस आणि चित्रीकरण करणारी व्यक्ती यांचा समावेश असणार आहे. यावेळी उमेदवाराचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. ‘१२ ड’ अर्जाद्वारे टपाली मतदानाचा पर्याय निवडणाऱ्या मतदाराच्या घरी हे पथक जाईल. घरातच मतदान केंद्रासदृश रचना करण्यात येईल. मतपत्रिकेवर संबंधिताने मत नोंदविल्यानंतर मतपत्रिकेची नियमानुसार घडी घालून ती पाकिटबंद केली जाईल. या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या तीन दिवस आधीच घरबसल्या मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर दोन दिवसांत कागदी मतपत्रिका तयार होते. त्यानंतर प्रत्येक मतदार संघात घरबसल्या मतदानास सुरुवात होईल.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६