धम्म :नव्या परिवर्तनाची महाऊर्जा
आज जग विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन उभे ठाकले आहे. माणसाने स्वतःच्या स्वार्थाच्या उद्देशाने माणसालाच विनाशाच्या गर्गेत टाकलेले आहे. जगात काही भागावर सातत्याने युद्धजन्य वातावरण निर्माण झाले आहे. युक्रेन- रशिया, इसराइल- पॅलेस्टाईन या देशातील युद्धज्वर सातत्याने वाढत आहे .देशाच्या प्रमुखांनी स्वतःच्या अहंकारापाई देशातील नागरिकांना लढाईच्या खाईत लोटले आहे. अनेक निरपराध लोक, स्त्री व मुले यांचे शोषण होत आहेत.
जग तंत्रज्ञानाच्या राक्षसी बळावर आपल्याच माणसाचे शोषण करत आहे. तेव्हा तथागत बुद्धा यांचा विचारच जगाला वाचवू शकते.
जग हे दुःखाने भरलेले आहे. जगातील दुःखाला काहीतरी कारण आहे. काही कारणे नैसर्गिक तर काही कारणे मानवनिर्मित आहेत. पण आजची बहुतेक कारणे मानवनिर्मित आहेत .या मानवनिर्मित कारणावर मात करता येते ती बुद्धाच्या तत्त्वज्ञाने. प्रज्ञा, शील, करुणा या विचारावर जग उभे आहे. प्रत्येक माणसाला जोपर्यंत हे विचार आत्मसाद करता येणार नाही तोपर्यंत जगात शांती प्रस्थापित होऊ शकत नाही. म्हणून आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या
महातत्त्वज्ञानी समाजसुधारकांने भारताला नवी संहिता दिली ती म्हणजे भारतीय संविधान होय.भारतीय संविधानाचा पाया हा तथागत गौतम बुद्धाचा धम्म आहे. धम्माचे चार आर्यसत्य,अष्टांग मार्ग व पंचशील हाच संविधानाचा गाभा आहे. 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरला लाखो बांधवांना धम्माची दीक्षा दिली. व जगातील सर्वात मोठे धर्मांतर घडवून आणले. जो धर्म विज्ञानावर आधारित तो धर्म म्हणजे बुद्ध धम्म होय. भविष्यातील जगाचा धर्म हा बुद्ध विचारातूनच स्फुरलेला असेल असे त्याचे मत होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या नंतर ज्या लोकांना धम्म स्वीकारला. त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय उन्नती अत्यंत वेगाने झालेली आहे. बौद्ध बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिका..! संघटित व्हा…!! व संघर्ष करा …!! हा विचार स्वतःची ऊर्जा बनवली. आपल्या मुलांना खेड्यातील नरकयातना भोगणाऱ्या कोंडवाड्यातून सुटून शहराच्या उत्तुंग माणसासोबत स्पर्धा करण्यासाठी घेऊन आला .आज बौद्ध बांधवांच्या प्रगतीचे मूळ कारण आरक्षण हे नसून बुद्ध धम्माची दीक्षा हेच आहे. देशातील अनेक लोक त्या प्रगतीला आरक्षण हेच कारणीभूत आहे असे म्हणतात ते अर्धसत्य आहे. जोपर्यंत माणसात आत्मभान जागृत होत नाही तोपर्यंत तो प्रगती करू शकत नाही. बौद्ध बांधवात बुद्ध धम्माने नवे आत्मभान जागृत केले. नवी संस्कृती निर्माण केली. विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण केला. शिक्षणालाच आपले शस्त्र बनवले. आणि त्यांनी दैदिप्यमान प्रगती केली. त्यांची प्रगती पाहून जग विस्मयचकित झाले आहे. हे सत्य आपण स्वीकारले पाहिजेत.
पण आज भारतातील बदलत्या वातावरणात धम्म बांधवाने नव्याने विचार करायला हवा. आपल्यातील काही स्वार्थी नेत्यांनी व स्वार्थी लोकांना आपण ओळखले पाहिजे. धम्माला ग्लानी येऊ नये यासाठी आपण डोळ्यात तेल घालून सदोदीत जागृत राहायला हवे.
बुद्धाला विष्णूचा अवतार मानणारी विकृत डोके वर काढत आहेत. सत्तेच्या नशेत बुद्धाला गिळकृत करण्याचा मोहिमा येथे सुरू झालेले आहेत. धम्मात अनेक नकली भंते तयार झाले आहेत. आपल्या पोटार्थी स्वार्थासाठी ते धम्माला बाजूला ठेवत आहेत. अशा स्वार्थी भंतेना आपण ओळखले पाहिजेत. रोज वंदना केली म्हणजे बुद्ध धम्म समजला असे होत नाही. तर बुद्धाचा खरा वैज्ञानिक विचार समजला पाहिजेत .धम्माच्या आचरणातून धम्मचक्राला आपण गतिमान करू शकतो. धम्म हा आपल्या कृतीतून दिसून आला पाहिजे. धम्म आपला आचारधम्म आहे. आपली भावी पिढी अत्यंत नैराश्यात वावरत आहे. धम्माची शिकवण मागे पडत असल्याने तरुणाईचा उत्साह कमी होत आहे. धम्मातील वैज्ञानिक दृष्टिकोन आज मागे पडताना दिसतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा ह्याच आपल्या जगण्याची दिशा असावी. बुद्ध धम्माचा प्रतित्यसमुत्पाद हा सिद्धांत जगाला प्रेरणा देणारा आहे. देशातील बुद्ध धम्माच्या विचारांची मोडतोड होत आहे. बुद्धाला अनेक देवाची लेबल लावले जात आहे. बुद्ध दिसत असताना त्यांना अनेक नावाने संबोधले जात आहे . पाखंडी विचारावर आपण प्रभावीपणे व्यक्त झाले पाहिजे. बुद्धाचा मूळ सिद्धांत हा मानवतावाद आहे. आणि हा मानवतावाद हाच जगाचा खरा न्याय मार्ग आहे. धम्माची नीतीतत्वे हीच आपली खरी ताकद आहे. बुद्धांनी दाखवलेला मार्ग हाच नव्या परिवर्तनाचा महाऊर्जावान सम्यक मार्ग आहे. साऱ्या जगाच्या कल्याणाचा तो दीपस्तंभ आहे. म्हणून धम्म हा नव्या परिवर्तनाची महाऊर्जा आहे असे मला वाटते.
मानव के जीवन को धम्मने जगाया है।
बुद्ध तत्त्वज्ञान ने संसार को संजोया है।
बुद्ध ही बुद्ध है जग में इसको ध्यान मे रखना है ।
अपने देश की धम्मपथ को आगे ही बढाना है।।
संदीप गायकवाड
नागपूर
9637357400