मेळघाट येथे इको टुरिझम निर्माण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासदरामध्ये अमरावती जिल्ह्याची टक्केवारी अधिक वाढावी यादृष्टीने येथील विकास कामांना गतीने चालना द्यावी. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मेळघाट येथे इको टुरिझम निर्माण करा. यातून जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री (नियोजन) अजित पवार यांनी आज केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी विदर्भातील नागपूर व अमरावती विभागातील अकरा जिल्ह्यांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. या बैठकीला ऑनलाईन पध्दतीने राज्याचे उच्च तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय उपस्थित होते. तसेच अमरावती जिल्हा नियोजन भवन येथून खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार देवेंद्र भुयार, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधीच्या खर्चाची जबाबदारी प्रशासकीय विभागांकडे असून येणाऱ्या निवडणूका व आचारसंहिता लक्षात घेता तातडीने निधी विकास कामांवर खर्च करावा. निधी वेळच्यावेळी खर्च करतानाच विकास कामे दर्जेदारपणे पूर्ण करावीत. नागपूरच्या धर्तीवर नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत मेळघाट, चिखलदरा या भागामध्ये इको टुरिझम संकल्पना विकसित करा. यासाठी त्वरित कृती आराखडा तयार करा. चिखलदरा येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्काय वॉकची निर्मिती करण्यात येत आहे. या प्रकल्पाला समांतर विकास प्रकल्प येथे निर्माण करा. येथील पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा विकसित करा. येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकास कामांवर भर द्या. तसेच येथे ॲडव्हेंचर टुरिझम निर्माण व्हावे, या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. यासाठी लोकप्रतिनीधींनी पाठपुरावा करावा. धारणी, चिखलदरा या आकांक्षित तालुक्याच्या निर्देशांकात वाढ करण्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री (नियोजन) अजित पवार यांनी यावेळी दिली. अमरावती विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नागपूर येथील इको टुरिझम संकल्पनेची प्रत्यक्ष पाहणी करुन आराखडा सादर करावा, असेही ते यावेळी म्हणाले.