आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी समन्वयाने उपाययोजना राबवा- सौरभ कटियार
गौरव प्रकाशन
अमरावती, (प्रतिनिधी): कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेची दखल घेऊन जिल्ह्यात अशा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आरोग्य कर्मचारी व पोलीस यंत्रणेने आपसी समन्वय ठेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी आवश्यक ते उपाययोजना राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे कोलकत्ता येथील घटनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील परिस्थिती व उपाययोजना संदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक ग्रामिण विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पोलीस उपायुक्त सागर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रिती मोरे तसेच विविध विभागाचे कार्यालय प्रमुख, खाजगी व शासकीय वैद्यकीय आस्थापना व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.